इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित रेझ- 2020 या 5 दिवसीय जागतिक परिषदेचे उद्घाटन, भारताला जागतिक पातळीवर कृत्रिम बुद्धिमत्तेसाठीचे केंद्र बनविण्याचा पंतप्रधानांचा निर्धार
भारताचा कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित राष्ट्रीय कार्यक्रम सामाजिक समस्या सोडविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या योग्य वापराशी संबंधित असेल-नरेंद्र मोदी
देशातील नागरिकांची बौद्धिक संपत्ती कुशल व्यावसायिकांची फळी निर्माण करण्याला प्रोत्साहित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल आणि देशातील कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित प्रणालींना पुढे जायला मदत करेल: रविशंकर प्रसाद
जेव्हा 1अब्ज 30कोटी भारतीय डिजिटली सक्षम होतील तेव्हा ते देशाचा गतीने विकास करून जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि अधिक उत्तम संधींसाठी मोठ्या प्रमाणावर डिजिटल उद्योगांच्या वाढीला प्रोत्साहित करतील : मुकेश अंबानी
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने 2030 पर्यंत देशाच्या उत्पादकतेत 15.7 ट्रीलियन अमेरिकी डॉलर्सची भर पडेल: आय बी एम या कंपनीचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अरविंद कृष्णा
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भाषांचे अडसर दूर होण्यास मदत होईल : प्रा.राज रेड्डी
5 ते 9ऑक्टोबर या कालावधीत चालणाऱ्या या मोठ्या डिजिटल परिषदेत 140 देशांमधील 61 हजार नागरिक सहभागी होणार आहेत
जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ डिजिटल मंचाना
Posted On:
06 OCT 2020 1:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2020
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी काल उशिरा “रेझ - 2020” अर्थात सामाजिक सक्षमीकरणासाठी जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या जागतिक परिषदेचे आभासी उद्घाटन केले. याप्रसंगी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार तसेच कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद, अमेरिकी अध्यक्षांच्या माहिती तंत्रज्ञान सल्लागार समितीचे माजी सदस्य, पद्मभूषण प्रा.राज रेड्डी, रिलायन्स उद्योगाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, आयबीएम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अरविंद कृष्णा, नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 5 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत चालणाऱ्या या परिषदेत शिक्षण, उद्योग आणि सरकारी क्षेत्रातील सुमारे 300 वक्ते सहभागी होणार आहेत.
या प्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर भारताने ज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रात जगाचे नेतृत्व केले आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात देखील भारताने उल्लेखनीय सहभाग नोंदविला आहे. भारताला जागतिक पातळीवर कृत्रिम बुद्धिमत्तेसाठीचे केंद्र बनविण्याच्या निर्धाराचा देखील पंतप्रधानांनी यावेळी ठळक उल्लेख केला.
देशाने स्वतःला जागतिक माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रात उर्जा केंद्र म्हणून सिध्द केले आहे, यापुढेही आम्ही डिजिटल क्षेत्रात उत्तम कामगिरी करू आणि जगाला प्रभावित करू असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. अनेक भारतीय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात उत्तम कार्य करीत असून आम्ही भारताला जगातील पातळीवर कृत्रिम बुद्धिमत्तेसाठीचे केंद्र बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे ते म्हणाले. येत्या काळात संघभावना, विश्वास,सहकार्य,जबाबदारी आणि समावेशकता या तत्वांच्या बळावर आम्ही हे लक्ष्य साध्य करण्याचा दृष्टीकोन ठेवला आहे असे त्यांनी सांगितले. भारताचा कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित राष्ट्रीय कार्यक्रम सामाजिक समस्या सोडविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या योग्य वापराशी संबंधित असेल असे ते म्हणाले. अर्थात मानवी बुद्धिमत्तेने नेहमीच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एक पाऊल पुढे असायला हवे यावर त्यांनी भर दिला. मानवी सर्जनशीलता आणि मानवी भावभावना ह्या नेहमीच आपल्या मोठ्या शक्ती असतील, यंत्रांच्या तुलनेत या क्षमता हे आपले वैशिष्ट्य आहे, सर्वात बुद्धिमान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली देखील मानवी विचारशक्तीशिवाय मानवजातीच्या समस्या सोडवू शकत नाही असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी या वेळी केले.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी भारत सरकार देशात कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक क्षमतांच्या विकासासाठी करीत असलेल्या विशेष प्रयत्नांची माहिती दिली.सरकारने युवकांना या क्षेत्राचे प्रशिक्षण देण्यासाठी उत्कृष्ट दर्जाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रांची स्थापना केली असून आणखी अनेक केंद्रांची स्थापना होणार आहे असे ते म्हणाले. देशातील नागरिकांची बौद्धिक संपत्ती कुशल व्यावसायिकांची फळी निर्माण करण्याला प्रोत्साहित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल आणि देशातील कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित प्रणालींना पुढे जायला मदत करेल असा विश्वास रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केला.
जेव्हा 1 अब्ज 30कोटी भारतीय डिजिटली सक्षम होतील तेव्हा ते देशाचा गतीने विकास करून जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि अधिक उत्तम संधींसाठी मोठ्या प्रमाणावर डिजिटल उद्योगांच्या वाढीला प्रोत्साहित करतील असे मत मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने 2030 पर्यंत देशाच्या उत्पादकतेत 15.7 ट्रीलियन अमेरिकी डॉलर्सची भर पडेल अशी आशा आयबीएम या कंपनीचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अरविंद कृष्णा यांनी व्यक्त केली.
भाषांचे अडसर दूर करण्यासाठी आणि सद्यस्थितीतील जागतिक महामारीच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मोठी मदत होईल, असे मत प्रा.राज रेड्डी यांनी नोंदविले.
U.Ujgare/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661989)
Visitor Counter : 237