सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

आयएसएलआरटीसी आणि एनसीईआरटी शैक्षणिक साहित्याचे सांकेतिक भाषेत रुपांतर करण्यासाठीच्या ऐतिहासिक करारावर उद्या स्वाक्षऱ्या करणार

Posted On: 05 OCT 2020 8:46PM by PIB Mumbai

 

भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, आयएसएलआरटीसी (सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अधीन डीईपीडब्ल्युची राष्ट्रीय संस्था) आणि एनसीईआरटी (शिक्षण मंत्रालयाची राष्ट्रीय संस्था) कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी शैक्षणिक साहित्याचे भारतीय सांकेतिक भाषेत रुपांतर करण्याच्या ऐतिहासिक परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करणार आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ थावरचंद गेहलोत, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांची आभासी पद्धतीने या कार्यक्रमासाठी उपस्थिती असणार आहे. 

सामंजस्य करारांतर्गत, एनसीईआरटीची क्रमिक पुस्तके, शिक्षकांसाठीचे हँडबूक आणि इतर पूरक साहित्य आणि इयत्ता I ते XII वी पर्यंतचे इंग्रजी आणि हिंदी भाषेतील साहित्याचे भारतीय सांकेतिक भाषेत डिजीटल रुपांतरण करण्यात येणार आहे. 

हा करार म्हणजे कर्णबधीर मुलांना शैक्षणिक साहित्य भारतीय सांकेतिक भाषेत उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल आहे. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकांचे मार्गदर्शक, पालक आणि एकूणच कर्णबधीर समुदायाला याचा लाभ होऊन देशातील कर्णबधीर मुलांच्या शिक्षणावर याचा मोठा प्रभाव पडणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण (एनईपी), 2020 मध्ये भारतीय सांकेतिक भाषा अत्यावश्यक केल्या आहेत, त्यानुसार या शैक्षणिक साहित्याचे प्रमाणीकरण सुनिश्चित केले जाईल. 

भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (ISLRTC) ही सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत असलेल्या डीईपीडब्ल्युडी विभागांतर्गत असलेली स्वायत्त राष्ट्रीय संस्था आहे, जी भारतीय सांकेतिक भाषेच्या वापरास लोकप्रिय करण्यासाठी मनुष्यबळ विकसित करण्याचे कार्य करते आणि भारतीय सांकेतिक भाषेत संशोधन करते.

एनसीईआरटी ही शिक्षण मंत्रालयांतर्गत असलेली स्वायत्त संस्था आहे, जी शालेय शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात संशोधन करुन त्यांना प्रोत्साहन देऊन शालेय शिक्षणामध्ये गुणात्मक सुधारणा सुनिश्चित करते. आदर्श क्रमिक पुस्तके तयार करुन प्रकाशित करणे, पूरक साहित्य, पत्रके, जर्नल्स प्रकाशित करते आणि शैक्षणिक साहित्य, मल्टीमिडिया डिजीटल साहित्य विकसित करते. अभिनव शैक्षणिक तंत्र आणि पद्धतींचा प्रसार करते, आणि प्राथमिक शिक्षणाच्या जागतिकीकरणाची उद्दीष्टे साध्य करण्यासाठीची शीर्ष संस्था म्हणून कार्य करते.  

*****

M.Chopade/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1661856) Visitor Counter : 124