आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ. हर्ष वर्धन यांनी  प्रयागराज येथील मोतीलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशलिटी विभागाचे समर्पित कोविड रुग्णालय  म्हणून डिजिटल पद्धतीने  उद्घाटन केले


उत्तर प्रदेशातील  पहिल्या कोबास 6800  मशीनचे केले उद्घाटन

Posted On: 05 OCT 2020 4:18PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य आणि  कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमवेत प्रयागराज मधील मोतीलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशलिटी विभागाचे (एसएसबी)  डिजीटल पद्धतीने उद्घाटन केले. 220 खाटांची ही सुविधा कोविड रुग्णालय (डीसीएच) म्हणून देशासाठी समर्पित केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशातील पहिल्या  कोबास  6800 यंत्राचेही  डिजिटल पद्धतीने  उद्घाटन केले. आयसीएमआरने आपले प्रादेशिकदृष्ट्या संतुलित कोविड चाचणी धोरण कायम राखत या मशीनची उभारणी केली आहे.

प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत (पीएमएसवायवाय) 150 कोटी रुपये गुंतवणुकीसह हा सुपर स्पेशलिटी विभाग तयार करण्यात आला आहे. यात न्यूरोलॉजी, न्यूरो सर्जरी, नेफरोलॉजी, यूरोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, एंडोक्रिनोलॉजी, सर्जिकल ऑन्कोलॉजी, कार्डिओथोरॅसिक आणि व्हस्क्यूलर सर्जरी विभाग आहेत. एसएसबीमध्ये सात ऑपरेशन थिएटर, 233 अतिविशेष खाटा, 52 आयसीयू खाटा , 13 डायलिसिस खाटा असतील. या सुविधेमध्ये 24 पदव्युत्तर  विद्यार्थ्यांची प्रशिक्षण क्षमता असेल.

कोबास 6800 मशीनचा शुभारंभ करताना डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, कोविड -19 साठी रिअल टाईम पीसीआर चाचणी करण्यासाठी पूर्ण स्वयंचलित, उच्च तंत्रज्ञानाने युक्त कोबास 6800 हे मशीन 24 तासांत 1200  नमुन्यांची चाचणी प्रदान करेल.  कोबास  6800 हेपॅटिटिस  बी आणि सी, एचआयव्ही, एमटीबी (रिफाम्पिसिन आणि आयसोनियाझाइड प्रतिरोध ), पॅपिलोमा, सायटोमेगालव्हायरस, क्लॅमिडीया, निसेरिया सारख्या इतर रोगजनकांना देखील शोधू शकतो. "हे मर्यादित मानवी हस्तक्षेपासह  लांबून वापरता येऊ शकते, असेही ते म्हणाले.

डॉ हर्ष वर्धन म्हणाले, “पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वप्न साकारायला सुरुवात केली आहे.  एम्सची संख्या 6 वरून  22 पर्यंत वाढवण्यात आली. तर अन्य 75 विद्यमान संस्थांचे  एम्सप्रमाणे सेवा पुरवण्यासाठी उन्नतीकरण  करण्याची कल्पना आहे.

डॉ. हर्ष वर्धन यांनी उत्तर प्रदेशातील पीएमएसएसवायच्या कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले, “प्रादेशिक असमतोल रोखण्यासाठी उत्तर प्रदेश आणि बिहारला दोन नवीन एम्स देण्यात आले. दोन्ही एम्सचे काम प्रगतीपथावर असून लवकरच पूर्ण केले जाईल.असे ते म्हणाले.

 

M.Iyangar/S.Kane/P.Kor




(Release ID: 1661753) Visitor Counter : 206