पंचायती राज मंत्रालय

पंचायती राज  मंत्रालयाच्यावतीने 1 ते 15 ऑक्टोबर 2020 या काळात स्वच्छता पंधरवड्याचे पालन

Posted On: 02 OCT 2020 8:29PM by PIB Mumbai

 

पंचायती राज  मंत्रालयाच्यावतीने 1 ते 15 ऑक्टोबर 2020 या काळात स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या काळामध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच स्वच्छता हा सर्वांच्या जीवनशैलीचा भाग बनला पाहिजे, अशा पद्धतीने वर्तनामध्ये सुधारणा घडविण्यासाठी प्रोत्साहन देणे, सध्याच्या कोविड-19 महामारीच्या काळामध्ये सर्वत्र स्वच्छता असणे किती महत्वाचे आहे, हे लक्षात घेवून स्वच्छतेच्या संदेशाचा प्रसार करणे, यावर विशेष भर देण्यात येत आहे.

स्वच्छता पंधरवाड्याचे उद्घाटन पंचायती राज मंत्रालयाचे सचिव सुनिल कुमार यांच्या हस्ते झाले. त्यांनी  कृषी भवन येथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली. ही शपथ हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमधून घेण्यात आली. सध्या मंत्रालयाचे कामकाज इतरही ठिकाणी चालते, त्या विभागांमधील कर्मचा-यांनी अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन जीवन प्रकाश आणि जीवन भारती  या इमारतींमध्येही करण्यात आले.

 

यावेळी इमारत आणि परिसरामध्ये श्रमदान करण्यात आले. यामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. स्वच्छता पंधरवड्याची माहिती देताना सर्वांनी प्लास्टिकचा वापर अजिबात करू नये, असे आवाहन करण्यात आले. तसेच कोविड-19 महामारी उद्रेकामुळे स्वच्छता राखणे किती आवश्यक आहे, हे सर्वांच्याच लक्षात आले आहे, त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचवणार नाही, आणि कच-याची विल्हेवाट लागू शकेल, असेच साहित्य वापरण्यात यावे, असे यावेळी सांगण्यात आले. स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणारे फलक मंत्रालयात लावण्यात आले. तसेच स्वच्छता कर्मचा-यांना यावेळी मास्क आणि हातमोजे वितरीत करण्यात आले.

स्वच्छता पंधरवड्यामध्ये सर्व राज्यांनी सक्रिय होवून सामाजिक स्वच्छतेसाठी तसेच सकारात्मक वर्तन बदलांसाठी विविध कार्यक्रम करून जागृती करण्याचे आवाहन यावेळी केले. कोविड-19 चा धोका ओळखून सर्वांनी मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतराचे नियम पाळावेत तसेच प्लास्टिकचा वापर थांबविण्यात यावा, कचरा कमी करावा, यासाठी सर्व पंचायतींनी एकत्रित, सामूहिक प्रयत्न करावेत, असे केले तरच देशामध्ये स्वच्छतेचा प्रसार होईल आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, असे यावेळी सांगण्यात आले.

---

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1661129) Visitor Counter : 150