पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी तातडीने कृती करण्याची आवश्यकता: संयुक्त राष्ट्राच्या जैवविविधता शिखर परिषदेमध्ये भारताचे प्रतिपादन
Posted On:
01 OCT 2020 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2020
संयुक्त राष्ट्राच्या 75 व्या महासभेनिमित्त आयोजण्यात आलेल्या जैवविविधता शिखर परिषदेमध्ये भारताच्या वतीने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांचे भाषण झाले. 2011 ते 2020 या दशकाच्या अखेरीस होत असलेल्या या शिखर परिषदेमध्ये जैवविविधेतेच्या संवर्धनासाठी अतिशय वेगाने कृती करण्याच्या आवश्यकतेवर जावडेकर यांनी आपल्या भाषणात भर दिला.
संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये जैवविविधेवर अशा प्रकारची पहिल्यांदाच परिषद झाली आहे. या आभासी शिखर परिषदेत विविध देशाचे प्रमुख तसेच मंत्री स्तरावरील नेते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे हे देश जैविक विविधता अधिवेशनातही (सीबीडी) सहभागी होत असतात.
या परिषदेमध्ये पर्यावरण मंत्री जावडेकर यांनी केलेले भाषण पुढीलप्रमाणे आहे.
सन्माननीय, महिला आणि सज्जन हो
- संयुक्त राष्ट्राच्या 75 महासभेच्या सत्रामध्ये मी जगातल्या 17 महा जैवविविधता असलेल्या देशांचा एक प्रतिनिधी म्हणून या परिषदेत आपल्यासमोर उभा आहे.
- प्राचीन काळापासून भारतामध्ये केवळ निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन केले जाते असे नाही, तर भारतामध्ये निसर्गानुरूप जगण्याची संस्कृती आहे.
- कोविड-19 महामारीच्या उद्रेकामुळे काही गोष्टी अधोरेखित झाल्या आहेत. यामध्ये नैसर्गिक स्त्रोतांचा अनिर्बंध वापर करून निसर्गाचे शोषण केले जात आहे. शाश्वत आहार, अन्नाची सवय तसेच वापराच्या पद्धती नाहीशा होत आहेत त्यामुळे मानवी जीवनाला पाठबळ देवू शकणारी व्यवस्था नष्ट होत आहे.
- तथापि, अजून वेळ गेलेली नाही, निसर्गाचे अद्याप संरक्षण आणि संवर्धन करणे तसेच त्याचा शाश्वत वापर करणे शक्य आहे, हेही कोविड-19 दाखवून दिले आहे.
- संयुक्त राष्ट्र संघाच्या या 2011 ते 2020 या दशकाच्या अखेरच्या टप्प्यात जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी आपल्याला अतिशय वेगवान कृती करण्याची आवश्यकता आहे.
महोदय,
- आमच्या वैदिक ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की, ‘‘ प्रकृतिरक्षतिरक्षिता’’ याचा अर्थ असा आहे की, आपण जर निसर्गाचे रक्षण केले तर निसर्गही आपले रक्षण करेल.
- महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरणा घेवून, अहिंसा आणि प्राणी तसेच निसर्गाचे संरक्षण करण्याचा सिद्धांत भारतीय राज्य घटनेमध्ये नमूद करण्यात आला आहे. त्याचे प्रतिबिंब आमच्या विविध कायद्यांमध्येही दिसून येते.
- या पृथ्वीवरील केवळ 2.4 टक्के भूप्रदेशात व्याप्त असलेल्या भारतामध्ये जगातल्या विविध जातींपेकी 8 टक्के प्रजाती आढळतात.
- गेल्या दशकामध्ये भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या वन आणि वृक्षांचे क्षेत्र वाढून आता ते 24.56 टक्के झाले आहे. या दशकाच्या अखेरीला होत असलेल्या या परिषदेत ही माहिती देताना मला आनंद होत आहे.
- आता आमच्या जंगलामध्ये वाघांची संख्या वाढून ती सर्वाधिक झाली आहे. 2022 पर्यंत आम्ही वाघांच्या संख्येत दुप्पट वाढ करण्याचे ध्येय निश्चित केले होते, ते आम्ही नियोजित काळापूर्वीच गाठले आहे.अलिकडेच आम्ही सिंह आणि डाॅल्फिन संवर्धनाची योजना जाहीर केली आहे.
- भारतामध्ये असलेल्या 26 दशलक्ष हेक्टर क्षेत्रातील नापीक, पडीक जमिनीचा स्तर सुधारणे, तसेच जंगलतोड झालेल्या क्षेत्राला पुन्हा एकदा हिरवेगार करणे, जमिनीची झालेली धूप रोखणे अशी वन संवर्धनाची कामे 2030 पर्यंत करण्याचे ध्येय आम्ही निश्चित केले आहे.
- जैवविविधता लक्ष्य -11 आणि एसडीजी-15 यांच्यामध्ये योगदान देवून पर्यावरण संवर्धनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारताने याआधीच विस्तृत क्षेत्र निश्चित केले आहे.
- जैविक विविधता अधिवेशनाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी भारताने एक सर्वंकष संस्था आणि कायदेशीर प्रणाली स्थापन केली आहे.
- जैव विविधतेचे दस्तऐवजीकरणासाठी स्थानिक नागरिकांना सहभागी करून घेण्यात येत आहे. यासाठी देशामध्ये 0.17 दशलक्ष लोकांनी जैवविविधता व्यवस्थापन समितींमध्ये आपली नावे नोंदवली आहेत.
महोदय,
- सन 2020 नंतर आता सन 2021 मध्ये होणा-या 15व्या परिषदेत वैश्विक जैवविविधता आराखडा स्वीकारण्यात येईल, त्यानंतर निसर्ग संवर्धन आणि संरक्षण यासाठी करावयाचे प्रयत्न अधिक वाढविण्यासाठी चांगल्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे.
- जैवविविधता संवर्धनासाठी भारताने प्रारंभापासूनच नेतृत्व करण्याची भूमिका स्वीकारली आहे. एका वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये दोन आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन भारताने केले आहे.
- आम्ही सप्टेंबर, 2019 मध्ये नवी दिल्ली येथे यूएनसीसीडीच्या सीओपी-14चे आयोजन केले होते. त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये गुजराजमधल्या गांधीनगर येथे स्थलांतरीत प्रजातींविषयी अधिवेशन भरविण्यात आले होते.
- निसर्ग संवर्धन, शाश्वत जीवनशैली आणि हरित विकास यांच्या माध्यमातून ‘‘हवामान कृती’’ला कारणीभूत ठरणा-यांवर भारत विजयी ठरत आहे.
महोदय,
संयुक्त राष्ट्राच्या 75 व्या महासभेनिमित्त आणि शाश्वत विकासासाठी संयुक्त राष्ट्राच्या दशकासाठी कृती कार्यक्रमा निमित्त ‘निसर्गाशी सुसंवाद साधत जगण्याचा’ दृष्टिकोण साकार करण्यासाठी निसर्ग मार्गाच्या प्रवासातले सहप्रवासी होवून संयुक्त प्रयत्नांमध्ये सहभागी होवू या !!
मी आपले आभार मानतो.
* * *
B.Gokhale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1660835)