आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आरोग्य मंत्रालयाच्या ई- संजीवनी टेलिमेडिसीन सेवेने महत्त्वाचा टप्पा ओलांडला


डॉक्टर- रुग्ण टेलिमार्गदर्शनाच्या 4 लाख सत्रांची नोंद

तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशात प्रत्येकी एक लाख टेलिमार्गदर्शन सत्रांची नोंद

Posted On: 26 SEP 2020 5:34PM by PIB Mumbai

 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ई-संजीवनी या बाह्यरुग्ण मंचाने चार लाख टेलिमार्गदर्शन सत्रांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश आघाडीवर असून या राज्यांमध्ये अनुक्रमे 1,33,167 आणि 1,00,124 मार्गदर्शन सत्रांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल हिमाचल प्रदेश (36,527), केरळ (33,340), आंध्र प्रदेश (31,034), उत्तराखंड (11,526), गुजरात (8914), मध्य प्रदेश (8904), कर्नाटक (7684) आणि महाराष्ट्र (7103) या राज्यांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.या सेवेच्या वापराचा कल लक्षात घेतला तर तमिळनाडूमधील विलुपुरमसारख्या लहान जिल्ह्यांकडून या सेवेचा तातडीने लाभ घेतला जात असल्याचे दिसत आहे. विलुपुरममध्ये 16,000 पेक्षा जास्त संभाषणांची नोंद झाली आहे. टेलिमार्गदर्शनाचा लाभ घेणारे सर्वात जास्त लाभार्थी असलेला हा जिल्हा ठरला आहे.

या सेवेचा लाभ घेणारे पहिल्या दहा क्रमांकाचे जिल्हे खालीलप्रमाणे आहेत:

ईसंजीवनी ओपीडी ( वापर करणारे जिल्हे)

अनु. क्र.

जिल्हा

राज्य

मार्गदर्शन संख्या

1

विलुपुरम

तमिळनाडू

16368

2

मदुराई

तमिळनाडू

12866

3

मीरत

यूपी

10795

4

तिरुवनामलाई

तमिळनाडू

9765

5

नागापट्टिनम

तमिळनाडू

9135

6

तिरुनेलवेली

तमिळनाडू

7321

7

माईलाडुथुराई

तमिळनाडू

7131

8

बहराईच

यूपी

6641

9

विरुद्धनगर

तमिळनाडू

6514

10

तिरुवनंतपुरम

केरळ

6351

 

 

राष्ट्रीय पातळीवर ई-संजीवनी मंचाचा वापर 26 राज्यांकडून केला जात आहे आणि विविध राज्य सरकारांच्या आरोग्य विभागातील 12,000 वैद्यकीय व्यावसायिक ई-संजीवनीवर उपलब्ध आहेत आणि देशातील 510 जिल्ह्यातील लोक त्यांची सेवा घेत आहेत.

यात नोंद झालेली सर्वात ताजी 1,00,000 मार्गदर्शन सत्रे गेल्या 18 दिवसात झाली आहेत तर पहिली 1,00,000 सत्रे तीन महिन्यात झाली होती. कोविड-19 महामारीच्या काळात ई- संजीवनी ओपीडी सेवेमुळे रुग्ण-डॉक्टर यांच्या दरम्यान टेलिमेडिसीन संवाद होत आहेत. त्यामुळे सुरक्षित अंतर राखण्याच्या निकषांची पूर्तता होऊन कोविडच्या फैलावाला प्रतिबंध करण्यास मदत मिळत आहे आणि बिगर कोविड रुग्णांना देखील आवश्यक आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होत आहेत.

ई-संजीवनीच्या माध्यमातून सुमारे 20% रुग्णांनी एकापेक्षा जास्त वेळा आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे. हा कल असे दाखवत आहे की दूर अंतरावरून आरोग्य सेवा देणाऱ्या या मंचाचा वापर सेवा पुरवठादार आणि लाभार्थी या दोघांकडून केला जात आहे.

सुरुवातीला ई-संजीवनी ओपीडी सामान्य ओपीडी सेवा देण्यासाठी एक ऑनलाईन मंच म्हणून सुरू करण्यात आली होती. मात्र, त्याचा उपयोग आणि लोकांकडून होणारा वापर लक्षात घेऊन राज्यांच्या आरोग्य विभागांनी विशेष ओपीडी देखील सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ई संजीवनी ओपीडीमध्ये विविध प्रकारच्या विशेष आणि अतिविशेष सुविधा उपलब्ध करून त्याची व्याप्ती वाढवण्यात आली. आज ई-संजीवनी ओपीडी 196 ऑनलाईन ओपीडी चालवत असून त्यामध्ये 27 सामान्य ओपीडी आणि 169 विशेष आणि 24 राज्यात अतिविशेष ओपीडी चालवले जात आहेत. एम्स, भटिंडा, एम्स, ऋषिकेश, एम्स बिबीनगर, लेडी हार्डिंज मेडिकल कॉलेज अँड असोसिएटेड हॉस्पिटल्स, रिजनल कॅन्सर सेंटर( तिरुवनंतपुरम), कोचीन कॅन्सर सेंटर (एर्नाकुलम) यांसारख्या नामवंत संस्था देखील रुग्णांना विशेष सेवा देण्यासाठी ई- संजीवनीचा वापर करत आहेत. केंद्र सरकारी आरोग्य योजनेने देखील नवी दिल्लीतील त्यांच्या लाभार्थ्यांसाठी ई संजीवनीवर चार विशेष ओपीडी सुरू केले आहेत. राज्यांनी देखील या टेलिमेडिसीन मंचावर नावीन्यपूर्ण ऍप्लिकेशन्स तयार केले आहेत. केरळमध्ये ई- संजीवनी मंचाचा वापर पलक्कड जिल्हा कारागृहातील कैद्यांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी केला जात आहे. तमिळनाडूमध्ये वैद्यकीय व्यावसायिकांना ई-संजीवनीमुळे रुग्णांना घरच्या घरीच जीवरक्षक उपाययोजना सुचवता आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ई- संजीवनी मंचाची निर्मिती मोहालीमध्ये सेंटर फॉर डेव्हलपमेंड ऑफ ऍडव्हान्स्ड कंप्युटिंगने केली आहे. आरोग्य सेवा देणारा हा एक जागतिक पातळीवरील मंच असून त्याची निर्मिती देशातील सरकारने केली आहे. ई- संजीवनी दोन प्रकारच्या टेलिमेडिसीन सेवांना पाठबळ देतो. डॉक्टर टू डॉक्टर(ईसंजीवनी) आणि पेशंट टू डॉक्टर( ईसंजीवनी ओपीडी) टेलिमार्गदर्शन या त्या सेवा आहेत. यातील पहिली सेवा आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर कार्यक्रमाचा महत्त्वाचा स्तंभ आहे. ही सेवा नोव्हेंबर 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. सर्वच्या सर्व 1.5 लाख आरोग्य आणि वेलनेस केंद्रांमध्ये हब अँड स्पोक मॉडेल अंतर्गत डिसेंबर 2020 पर्यंत टेलिमार्गदर्शन प्रणालीची अंमलबजावणी करण्याचे तिचे उद्दिष्ट आहे. वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये राज्यांनी समर्पित हब्ज निर्धारित करणे आणि त्यांची उभारणी करण्याची गरज आहे आणि सेंकडरी हेल्थ सेंटर आणि प्रायमरी हेल्थ सेंटर या स्पोकना टेलिमेडिसीन सेवा देण्याची गरज आहे. आरोग्य मंत्रालयाने ई-संजीवनी ओपीडी ही डॉक्टर ते रुग्ण यांच्या दरम्यानची दुसरी टेलिमार्गदर्शन सेवा यावर्षी कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर 13 एप्रिलला सुरू केली.

****

B.Gokhale/S.Patil/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1659334) Visitor Counter : 254