आयुष मंत्रालय
‘‘प्रतिकारशक्तीसाठी आयुष’’ अभियानाचा भाग म्हणून अभिनव ई- मॅरेथॉनला आयुष मंत्रालयाच्यावतीने पाठिंबा
Posted On:
24 SEP 2020 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर 2020
आयुष मंत्रालयाच्यावतीने कोची इथल्या राजागिरी सामाजिक विज्ञान महाविद्यालय आणि राजागिरी बिझनेस स्कूल यांच्यातर्फे तीन महिने राबविण्यात येणाऱ्या अभिनव ‘‘प्रतिकारशक्तीसाठी आयुष’’ अभियानाला पाठिंबा देण्यात येणार आहे. या नाविन्यपूर्ण अभियानामध्ये ‘ई-मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये रोग प्रतिबंधात्मक पावले उचलून निरोगी राहण्यावर भर दिला जावा यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार असून धावणे, निरोगीपणासाठी कार्यक्रमांची जोड दिली जाणार आहे. या ई-कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्यांना सकारात्मकता आणि चांगल्या आरोग्याचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे.
या अभियानाचे आयोजन कोविड-19 बाधितांच्या मुलांच्या शिक्षणाला मदत करण्यासाठी करण्यात आले आहे. तसेच सध्या सर्वत्र महामारीचा उद्रेक झाला आहे, त्यामुळे लोकांच्या आरोग्य कल्याणासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. कोविड महामारीच्या काळात ‘मानसिक आरोग्य सुदृढ’ ठेवण्यात यावे, या संकल्पनेवर कार्यक्रम तयार केला आहे.
राजागिरी ई-मॅरेथॉन अभियानाची संकल्पना सर्व वयोगटातल्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या कल्याणाचा विचार करून तयार करण्यात आली आहे. तसेच या उपक्रमामध्ये सहभागी होवू इच्छिणाऱ्यांना कोणतीही बंधने नाहीत. त्यांच्या सोईच्या वेळेत आणि त्यांना योग्य आणि सुरक्षित वाटेल, अशा स्थानी राहून सहभागी होता येणार आहे. ई-मॅरेथॉनमध्ये त्यांना धावण्याचे दिलेले आव्हान पूर्ण करण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी असणार आहे. यासाठी एक ‘वेलनेस अॅप’ तयार केले असून सहभागी होणाऱ्यांनी आपला धावण्याचा तपशील त्या अॅपमध्ये भरल्यानंतर मध्यवर्ती संगणकाकडे पाठवला जाईल.
या अभियानाअंतर्गत ई-मॅरेथॉनमध्ये सहभागी होवू इच्छिणाऱ्यांनी आपली नावे emarathon.rajagiri.edu या संकेतस्थळावर नोंदवायची आहेत. सहभागींना फिटनेस ॲप खरेदी करण्याची आवश्यकता नाही. मात्र धावताना आपला स्मार्ट मोबाईल फोन बरोबर ठेवावा लागेल किंवा फिटनेस बँड घालावा लागेल.
या कार्यक्रमाचा प्रारंभ दि. 28 सप्टेंबर 2020 रोजी होणार आहे. दि. 10 ऑक्टोबर,2020 रोजी (15 दिवस) कार्यक्रमाची सांगता होणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये ‘‘प्रतिकारशक्तीसाठी आयुष’’ अभियान सर्वत्र राबविण्यात येणार आहे. त्याच्याशी संलग्न ‘विहार’ कार्यक्रमावर भर देण्यात आला आहे.
या कार्यक्रमामध्ये सर्व सहभागीतांनी सामाजिक अंतराचे बंधन पाळून योग, प्राणायाम वेबिनार तसेच इतर मनोरंजनाचे कार्यक्रम करून आरोग्य कल्याणाचा संदेश देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी दिलेले शुल्क कोविड-19 मुळे प्राण गमवावा लागलेल्या पालकांच्या मुंबईतल्या 50 मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. चाइल्डलाइन इंडिया फौंडेशनच्यावतीने या मुलांना शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणार आहे. या अभिनव ई-मॅरेथॉन कार्यक्रमामध्ये देशातले तसेच परदेशातले मिळून जवळपास 8000 स्पर्धक सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.
B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1658840)
Visitor Counter : 158