पंतप्रधान कार्यालय

‘फिट इंडिया मुव्हमेंट’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी साधलेला संवाद

Posted On: 24 SEP 2020 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  24 सप्टेंबर  2020

आज देशाला प्रेरणा देणाऱ्‍या सात महनीय व्यक्तींचे मी विशेष रूपाने आभार व्यक्त करतो. याचे कारण म्हणजे आपण खास वेळ काढला आणि सर्वांना स्वानुभव सांगून तंदुरूस्तीसाठी वेगवेगळ्या पद्धतींचे आपण स्वतः अवलंबन करून, त्याचे लाभ घेतले आहेत, त्याविषयी माहिती सामाईक केलीत, त्याचा देशाच्या प्रत्येक पिढीला खूप फायदा होऊ शकेल, असे मला वाटते. आजची ही चर्चा प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींसाठी आणि वेगवेगळी रूची, आवड असलेल्या सर्वांनाच अतिशय उपयोगी पडणारी ठरणार आहे. ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व देशवासियांचे स्वास्थ्य, आरोग्य उत्तम राहावे, अशी कामना करतो.

एक वर्षाच्या आतच ही फिटनेस मुव्हमेंट आता ‘मुव्हमेंट ऑफ पीपल’ म्हणजे लोकांची चळवळ बनली आहे. आता ‘मुव्हमेंट ऑफ पॉझिटिव्ही’ म्हणजे सकारात्मकतेची चळवळही बनली आहे. देशामध्ये आरोग्य आणि तंदुरूस्ती यांच्याविषयी सातत्याने जागरूकता वाढत आहे. क्रियाशीलता वाढत आहे. योग, आसने, व्यायाम, चालणे, धावणे, पोहणे, पौष्टिक आहाराच्या सवयी अंगीकारणे, आरोग्यदायी दिनचर्या ठेवणे, हे आता आमच्यासाठी नैसर्गिक जागरूकतेचा एक हिस्सा बनले आहे, याचा मला आनंद आहे.

‘फिट इंडिया मुव्हमेंट’ ने एक वर्ष पूर्ण केले आहे. त्यामध्ये जवळ-जवळ सहा महिने आपल्याला अनेक प्रकारच्या बंधनांमध्येच राहावे लागले आहे. तरीही फिट इंडिया मुव्हमेंट’ने आपला प्रभाव आणि प्रासंगिकता या कोरोनाकाळातही सिद्ध करून दाखविली आहे. खरोखरीच फिट-तंदुरूस्त राहाणे लोकांना वाटते तितके फार काही अवधड काम अजिबात नाही. थोडे नियम आणि थोडे परिश्रम यांच्यामुळे आपण सदोदित स्वस्थ, आरोग्यदायी राहू शकतो.

‘फिटनेस की डोस, आधा घंटा रोज’ म्हणजे रोज फक्त अर्धा तास आपल्याला स्वतःच्या तंदुरूस्तीसाठी काढायचा आहे. या मंत्रामध्ये सर्वांच्या आरोग्याचे, सर्वांचे सुख लपलेले आहे. मग योग असो, अथवा बॅडमिंटन खेळणे असो, टेनिस असो किंवा फुटबॉल असो, कराटे असो किंवा कबड्डी, जे काही तुम्हाला पसंत असेल, आवडत असेल ते कमीत कमी 30 मिनिटे रोज खेळत- करत जावे. आताच आपण पाहिले, युवा मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय यांनी मिळून फिटनेस प्रोटोकॉलही जारी केला आहे.

मित्रांनो, आज संपूर्ण जगामध्ये फिटनेस या विषयावर जागरूकता आहे. जागतिक आरोग्य संघटनने ‘ग्लोबल स्ट्रॅटेजी ऑन डाएट, फिजिकल अॅक्टिव्हिटी अँड हेल्थ’ तयार केली आहे. शारीरिक हालचाली, क्रियाकलाप याविषयी वैश्विक शिफारसीही केल्या आहेत. आज अनेक देशांमध्ये तंदुरूस्ती या विषयाला लक्ष्य करून त्याविषयी अनेक आघाड्यांवर आणि अनेक प्रकारे कार्य करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, ब्रिटन, अमेरिका अशा अनेक देशांमध्ये या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर तंदुरूस्ती राखण्यासाठी अभियान चालविण्यात येत आहे. आपल्या देशातल्या जास्तीत जास्त नागरिकांनी दररोज शारीरिक कसरत, व्यायाम करावा, यासाठी हे अभियान आहे.

मित्रांनो, आपल्या आयुर्विज्ञान शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की -

सर्व प्राणि भृताम् नित्यम्

आयुः युक्तिम् अपेक्षते।

दैवे पुरुषा कारे च

स्थितम् हि अस्य बला बलम् ।।

याचा अर्थ असा आहे की, जगात श्रम, यश, भाग्य सर्वकाही आरोग्यावरच निर्भर असते. चांगले आरोग्य, तंदुरूस्ती असेल तर भाग्य आहे, तरच यशही मिळणार आहे. ज्यावेळी आपण नियमित व्यायाम करतो, त्यावेळी स्वतःला फिट आणि मजबूत ठेवू शकतो. एक भावना मनामध्ये जागृत होते की, हो- आपण स्वतःच स्वतःचे निर्माता आहोत. यामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास येतो. व्यक्तीला याच आत्मविश्वासाच्या जोरावर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळू शकते. हीच गोष्ट आपल्या परिवाराला, समाजाला आणि देशालाही लागू होते. एक परिवार जर मिळून खेळत असेल तर ते सर्व कुटुंब स्वस्थ, फिट असते.

‘ए फॅमिली दॅट प्लेज टुगेदर, स्टेज टुगेदर’

या महामारीच्या काळामध्ये अनेक परिवारांनी या प्रयोग करून पाहिला आहे. सर्वजण मिळून खेळले, सर्वांनी मिळून योग- प्राणायाम केला, व्यायाम केला, मिळून घाम गाळला. अनुभव असा आला आहे की, शारीरिक तंदुरूस्तीसाठी सर्वांना त्याचा फायदाही झाला त्याचबरोबर त्याचे आणखी एक लाभ समोर आला. ते म्हणजे- भावनिक नाते अधिक दृढ झाले, एकमेकांना चांगल्या पद्धतीने समजून घेतले जावू लागले, एकमेकांमध्ये सहकार्य, सामंजस्याची निर्माण झालेली भावना कुटुंबाची ताकद बनली. हे सगळे सहजतेने घडले गेले. सर्वसाधारणपणे असे दिसून येते की, कोणतीही चांगली सवय असते, ती आपल्याला माता-पिताच  शिकवत असतात. परंतु तंदुरूस्तीच्या बाबतीत येथे थोडे उलट घडत आहे. आता युवावर्गच पुढाकार घेत आहेत, आणि माता-पित्यांना व्यायाम करणे, खेळणे यासाठी प्रोत्साहन देत आहेत.

मित्रांनो, आपल्याकडे असे म्हणतात -

मन चंगा तो कठौती में गंगा।

हा संदेश अध्यात्मिक आणि सामाजिकदृष्टीनेही महत्वाचा आहे. परंतु, याचे आणखीही खोलवर विचार करायला प्रवृत्त करणारे अर्थ आहेत; ते आपल्या दैनंदिन जीवनासाठी खूप उपयोगी पडणारे आहेत. याचा असाही एक अर्थ आहे की, आपले मानसिक आरोग्यही खूप महत्वाचे आहे. म्हणजेच मजबूत मन असेल तर मजबूत शरीरही लाभते. याचे उलट केले तरीही तितकेच खरे आहे. ज्यावेळी आपले मन चांगले असते त्यावेळी ते स्वस्थ, शांतचित्त असते आणि त्याचबरोबर शरीरही तंदुरूस्त असते. आणि आत्ताच चर्चा केली त्याप्रमाणे मन स्वस्थ राहावे म्हणून मार्ग असा आहे की, मनोवृत्तीचा विस्तार करणे. संकुचित ‘‘मी’’ यातून बाहेर पडून ज्यावेळी व्यक्ती परिवार, समाज आणि देश यांना आपलाच विस्तार मानतो आणि त्यांच्यासाठी काम करतो त्यावेळी त्याच्यामध्ये एक आत्मविश्वास येत असतो. हे काम मानसिक पातळीवर मजबूत बनण्यासाठी जणू एकप्रकारच्या वनौषधी प्रमाणे काम करीत असते. त्याच्याकडून ते काम होतेही. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंद यांनी म्हटले होते –

स्ट्रेंथ इज लाइफ, वीकनेस इज डेथ. एक्सपान्शन इज लाइफ, कॉन्टॅक्शन इज डेथ.’’

आजकाल लोकांशी, समाजाबरोबर, देशाबरोबर जोडले जाणे आणि जोडलेले रहाणे यासाठी अनेक प्रकारची माध्यमे उपलब्ध आहेत, त्यामध्ये कसल्याही प्रकारे अभाव नाही, भरपूर संधी आहेत. आणि प्रेरणेसाठी आमच्या सभोवती अनेक उदाहरणे आहेत. आज ज्या सात महान व्यक्तिकडून आपण अनुभव ऐकले, त्याच्यापेक्षा मोठी आणखी काय प्रेरणा असू शकणार आहे. बस, आपल्याला आता इतकंच करायचे आहे की, आपल्या आवडीनुसार आपल्या ‘पॅशन’नुसार काही गोष्टी निवडायच्या आणि त्याच नियमितपणे करायच्या आहेत. देशवासियांना माझा आग्रह आहे की, प्रत्येक पिढीतल्या लोकांना मी आग्रह करतो की, त्यांनी निश्चय करावा आणि आपण एकमेकांना मदत कशी करू शकतो, काय मदत करू शकतो, आपला वेळ, आपल्याकडचे ज्ञान, आपल्याकडचे कौशल्य, शारीरिक मदत असे शक्य असेल ती मदत जरूर करावी.

मित्रांनो, मला विश्वास आहे की, देशवासी ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ मध्ये आणखी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतील सर्वजण मिळून आणखी इतर लोकांनाही सहभागी करून घेतील. फिट इंडिया मुव्हमेंट’ वास्तविक ‘हिट इंडिया मुव्हमेंट’ सुद्धा आहे. म्हणूनच जितका भारत फिट असेल, तितकाच भारत हिट ठरेल. यामध्ये आपण सर्वांनी प्रयत्न करून नेहमीप्रमाणे देशाला खूप मदत करणार आहात, असा मला विश्वास आहे.

मी, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आज फिट इंडिया मुव्हमेंट’ला एक नवीन बळ दिले आहे. नवीन संकल्पासह पुढे जाण्याचा, फिट इंडियामध्ये व्यक्ती ते समष्टीपर्यंतचे एक चक्र पूर्ण केले जाईल. या भावनेसह आपल्या सर्वांना खूप-खूप धन्यवाद!

 

S.Thakur/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1658733) Visitor Counter : 245