सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या ठाम भूमिकेमुळे फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अॅमेझॉन, 160 बनावट खादी उत्पादनांच्या ऑनलाईन विक्रीला पायबंद
Posted On:
19 SEP 2020 5:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2020
खाडी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या (KVIC) ठाम भूमिकेमुळे, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अॅमेझॉन यांसारख्या ई-कॉमर्स वेबसाईटना “खादी’ या ब्रांड नावाने विकल्या जात असलेल्या 160 बनावट उत्पादनांची विक्री बंद करावी लागली आहे.
या संदर्भात केवीआयसी ने आज जारी केलेल्या निवेदनानुसार, आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ‘ ‘खादी इंडिया’ ब्रांड चा अवैध वापर करुन आपली उत्पादने विकणाऱ्या 1000 पेक्षा जास्त कंपन्यांना केवीआयसीने कायदेशीर नोटीस बजावली आहे. या विक्रीमुळे खादी इंडियाची प्रतिमा मलीन होण्यासोबतच, खादी वस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारागीरांच्या रोजगारावरही परिणाम होत होता.
केवीआयसीने कायदेशीर नोटीस बजावल्यानंतर, खादी गोल्बलने ही आपली वेबसाईट- www.khadiglobalstore.com बंद केली असून ट्वीटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील सोशल मिडीया पेजेस देखील काढून टाकले आहेत. त्याशिवाय, ‘खादी’ असे ब्रांड नेम वापरुन विकली जाणारी सर्व उत्पादने आणि मजकूर काढून टाकण्यासाठी दहा दिवसांची मुदत मागितली आहे. केव्हीआयसी च्या या कारवाईमुळे देशभरात, बनावट खादी विक्री करणारी अनेक दुकाने देखील बंद करण्यात आली आहेत.
या ई कॉमर्स पोर्टलवरुन, खादी मास्क, हर्बल साबणे, शाम्पू, विविध सौंदर्यप्रसाधने, हर्बल मेंदी, जाकिटे, कुर्ता आणि इतर अनेक उत्पादने ‘खादी’ हा ब्रांड नेम वापरुन विकली जात होती. यामुळे, ग्राहकांना, ही खादीची खरी उत्पादने होत असल्याचा भ्रम होऊन त्यांची फसवणूक होत होती. यापैकी अनेक उत्पादने ‘आयुष-ई-ट्रेडर्स’ या कंपनीमार्फत विकली जात होती. त्यांनी आता अशा 140 उत्पादनांच्या लिंक्स आपल्या बेवसाईट वरुन काढल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशभरात खादीची मागणी वाढल्यामुळे, खादी ट्रेडमार्क विषयक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करत खादीच्या उत्पादनांची अवैध विक्री होत असे. अशी अनेक बनावट दुकाने देखील देशभरात सुरु होती. अलीकडच्या काळात, विशेषत: कोविडच्या काळात अशा अनेक बनावट ऑनलाईन विक्रेत्यांना ऊत आला होता. मात्र, ऑनलाइन ग्राहकांना अस्सल खादी उत्पादने विकत घेता यावीत, यासाठी केवीआयसीने सुमारे 300 उत्पादनांची विक्री करण्यासाठी www.kviconline.gov.in/khadimask हे ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे.
केवीआयसी चे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी सांगितले, की अशी अवैध विक्री करणाऱ्यांना ही विक्री तात्काळ बंद करण्याचे अथवा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याचा पर्याय दिला होता. खादी उत्पादक कारागीरांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अशा विविध कंपन्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.या विविध विक्रीचा थेट विपरीत परिणाम या विणकरांच्या रोजगारावर होत आहे, असेही सक्सेना यांनी सांगितले.
‘खादी इंडिया’ ब्रांडच्या ट्रेडमार्क हक्कांचे संरक्षण आणि त्याच्या अवैध वापरावर देखरेख ठेवण्यासाठी केव्हीआयसी ने एक योजना आखली आहे. त्यानुसार, त्यांनी एक समर्पित कायदे तज्ञांची चमू नेमली असून यात माणसे आणि तंत्रज्ञान साधनांचा समावेश आहे. त्याद्वारे, खादीच्या नावाखाली होत असलेल्या सर्व अवैध विक्री आणि व्यवहारांना पायबंद घालता येणार आहे.
खादी उत्पादन क्षेत्रात असलेल्या सर्व नोंदणीकृत खादी संस्थांना देखील केव्ही आयसी ने सांगितले आहे की, केवळ या नोंदणीमुळे त्यांना इतर कोणाला, ‘खादी’ ट्रेडमार्क वापरण्याची परवानगी देण्याचा हक्क मिळत नाही. ‘खादी इंडिया’ ब्रांडचा वापर करण्याच्या परवानगीसाठी केव्हीआयसीच्या अधिकृत परवान्याची गरज असते.
गेल्या महिन्यात, केव्हीआयसी ने खादी इसेन्शियल आणि खादी ग्लोबल या दोन कंपन्यांना खादीच्या नावाखाली अवैधपणे सौंदर्यप्रसाधनांची विक्री करण्याबद्दल कायदेशीर नोटीस बजावली आहे. ‘फॅब इंडिया’ कंपनीकडूनही केव्हीआयसी ने 500 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली असून हा खटला मुंबई उच्च न्यायालयात सुरु आहे.
* * *
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1656684)
Visitor Counter : 255