पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते ऐतिहासिक कोसी रेल महासेतू राष्ट्राप्रती समर्पित


प्रवाशांच्या सुविधेसाठी बिहारमधील नवीन रेल्वे लाईन आणि विद्युतीकरण प्रकल्पांचे उद्घाटन

कोविड काळातही अविरत कार्याबद्दल रेल्वेचे पंतप्रधानांकडून कौतुक

विद्युतीकरण, स्वच्छता उपक्रम, किसान रेल्वेची सुरुवात आणि मानव रहित रेल्वे क्रॉसिंगचे उच्चाटन केल्याबद्दल रेल्वेची प्रशंसा

कृषी सुधार विधेयकाद्वारे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य: पंतप्रधान

Posted On: 18 SEP 2020 6:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 सप्‍टेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऐतिहासिक कोसी रेल महासेतू आज राष्ट्राप्रती समर्पित करण्यात आला आणि नवीन रेल्वे लाईन आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी बिहारमधील विद्युतीकरण प्रकल्पांचे आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, बिहारमधील रेल्वे जोडणी क्षेत्रात नवीन इतिहास निर्माण झाला आहे. ते म्हणाले, 3000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे प्रकल्प जसे कोसी महासेतू आणि किऊल पुलाचे उद्घाटन, विद्युतीकरण प्रकल्प, रेल्वेत मेक इन इंडियाला प्रोत्साहन आणि रोजगारनिर्मितीचे एक डझनपेक्षा अधिक प्रकल्पांचे आज उद्घाटन करण्यात आले आहे. या प्रकल्पांमुळे बिहारचे केवळ रेल्वे जाळे बळकट होणार नाही तर पश्चिम बंगाल आणि पूर्व भारताची रेल्वे जोडणीही बळकट होईल.

पंतप्रधानांनी बिहारच्या जनतेचे नवीन सुविधांसाठी अभिनंदन केले, या सुविधांमुळे बिहारसह पूर्व भारतातील रेल्वे प्रवाशांना लाभ होईल. ते म्हणाले की, राज्यातून वाहणाऱ्या अनेक नद्यांमुळे बिहारचे बरेच भाग एकमेकांपासून विभक्त आहेत आणि यामुळे लोकांना दीर्घ प्रवास करावा लागतो. ही समस्या सोडवण्यासाठी चार वर्षांपूर्वी, पाटणा आणि मुंगेर येथे महासेतुचे काम सुरु झाले होते. आता नवीन दोन रेल्वे पूल तयार झाल्यामुळे, उत्तर आणि दक्षिण बिहारदरम्यानचा प्रवास सुलभ होईल आणि उत्तर बिहारमधील विकासाला चालना मिळेल.

पंतप्रधान म्हणाले, साडे आठ दशकांपूर्वीच्या तीव्र भूकंपामुळे मिथिला आणि कोसी वेगळे झाले होते आणि आता कोरोना महामारीच्या काळात ते पुन्हा जोडले जात आहेत, हा एक योगायोग आहे. ते म्हणाले, स्थलांतरीत मजुरांच्या परिश्रमामुळे सुपौल-आसनपूर-कुफा रेल्वेमार्ग आज सुरु झाला. ते म्हणाले की मिथिला व कोसी भागातील लोकांच्या समस्यांवर मात करण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना आणि नितीशकुमार रेल्वेमंत्री असताना 2003 मध्ये  कोसी रेल्वे मार्गाची परिकल्पना करण्यात आली होती. ते म्हणाले की, सध्याच्या सरकारच्या काळात हा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यात आला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुपौल-आसनपूर- कुफा मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.

पंतप्रधान म्हणाले, कोसी महासेतु मार्गे आज सुरु करण्यात आलेली सुपौल-आसनपूर नवीन रेल्वे सेवेचा सुपौल, अरारीया आणि सहारसा जिल्ह्यांना मोठा लाभ होईल. ईशान्येकडील लोकांसाठीसुद्धा हा पर्यायी मार्ग ठरेल. या महासेतुमुळे 300 किलोमीटरचा प्रवास 22 किलोमीटर एवढा कमी झाला आहे आणि यामुळे संपूर्ण प्रदेशातील व्यापार आणि रोजगाराला चालना मिळेल. तसेच बिहारच्या जनतेचा वेळ आणि पैसा वाचेल.

पंतप्रधान म्हणाले, कोसी महासेतुप्रमाणेच, किउल नदीवरील नवीन मार्गावरील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींग सुविधेमुळे रेल्वे ताशी 125 किलोमीटर एवढ्या वेगाने धावू शकेल. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमुळे हावडा-दिल्ली या मुख्य मार्गावरील रेल्वेंची वाहतूक सुलभ होईल, अनावश्यक दिरंगाई दूर होईल आणि प्रवास सुरक्षित होईल.   

पंतप्रधान म्हणाले की मागील 6 वर्षांपासून नवीन भारताच्या आकांक्षानुसार भारतीय रेल्वेला आकार देण्याचे आणि ‘आत्मनिर्भर भारत’ च्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ते म्हणाले, आज भारतीय रेल्वे पूर्वीपेक्षा स्वच्छ आहे. ब्रॉडगेज रेल्वे मार्गांमधून मानवरहित रेल्वे क्रॉसिंग हटवून भारतीय रेल्वेला पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनविण्यात आले आहे. ते म्हणाले, भारतीय रेल्वेचा वेग वाढला आहे. वंदे भारत सारख्या मेड इन इंडिया गाड्या स्वावलंबन आणि आधुनिकतेचे प्रतीक आहेत आणि रेल्वे नेटवर्कचा भाग बनत आहेत.

पंतप्रधान म्हणाले, रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांमुळे बिहारला मोठा लाभ होत आहे. गेल्या काही वर्षात, मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी, माधेपूरमध्ये इलेक्ट्रीक लोको फॅक्टरी आणि मधौरा मध्ये डिझेल लोको फॅक्टरी स्थापन केली आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये, 44000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. ते म्हणाले, भारतातील सर्वाधिक शक्तीशाली इलेक्ट्रीक लोकोमोटीव्हचा बिहारच्या जनतेला अभिमान वाटेल-12000 अश्वशक्तीचे लोकोमोटीव्ह बिहारमध्ये उत्पादित आहे. बिहारमधील पहिला लोकोशेड कार्यरत झाले आहे यामुळे इलेक्ट्रीक लोकोमोटीव्हजची देखभाल होईल.

पंतप्रधान म्हणाले, आज बिहारमधील 90% रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. बिहारमध्ये गेल्या 6 वर्षात, 3000 किलोमीटरपेक्षा अधिक रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. 2014 पूर्वीच्या 5 वर्षात बिहारमध्ये केवळ 325 कि.मी. नवीन रेल्वेमार्गाचे काम झाले होते, तर 2014 नंतरच्या 5 वर्षात बिहारमध्ये सुमारे 700 कि.मी. नवीन रेल्वेमार्गाचे काम सुरू झाले जे यापूर्वी बांधण्यात आलेल्या रेल्वेमार्गांपेक्षा दुप्पट आहे. ते म्हणाले, 1000 किलोमीटर नवीन रेल्वे मार्गाचे काम निर्माणाधीन आहे.      

पंतप्रधान म्हणाले, हाजीपूर-घोसवर-वैशाली मार्ग कार्यरत झाल्यामुळे, दिल्ली आणि पाटणा थेट रेल्वे सेवेने जोडले जाईल. यामुळे वैशाली येथील पर्यटनाला चालना मिळेल आणि रोजगारनिर्मिती होईल. ते म्हणाले समर्पित मालवाहतूक मार्गाचे काम वेगाने सुरु आहे आणि 250 किलोमीटर लांबीचा मार्ग बिहारमधून जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासी गाड्यांमधील दिरंगाईची समस्या कमी होईल आणि माल वाहतुकीत होणारा विलंबही मोठ्या प्रमाणात कमी होईल.  

पंतप्रधानांनी कोरोना काळातही निरंतर कार्य केल्याबद्दल रेल्वेचे कौतुक केले. ते म्हणाले, प्रवासी मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आणि श्रमिक स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून त्यांना परत आणण्यात रेल्वेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. देशातील पहिली किसान रेल्वे कोरोना काळात बिहार आणि महाराष्ट्रादरम्यान सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.  

पंतप्रधान म्हणाले, पूर्वी बिहारमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या फार कमी होती. यामुळे बिहारमध्ये रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागत होते, बिहारमधील गुणवंत विद्यार्थ्यालासुद्धा वैद्यकीय शिक्षणासाठी राज्याबाहेर जावे लागत होते. आज बिहारमध्ये 15 पेक्षा अधिक वैद्यकीय महाविद्यालये आहेत, यातील बरीच महाविद्यालये गेल्या काही वर्षांमध्ये उभारली आहेत. काही दिवसांपूर्वीच दरभंगामध्ये एम्सला मंजुरी देण्यात आली आहे आणि यामुळे हजारोंच्या संख्येने रोजगारनिर्मिती होईल.

 

कृषी सुधारणा विधेयक

पंतप्रधान म्हणाले, देशातील कृषी सुधारणांसाठी कालचा दिवस ऐतिहासिक होता. कृषी सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे, ज्यात आपल्या शेतकऱ्यांना अनेक निर्बंधांपासून मुक्त केले आहे. त्यांनी देशभरातील शेतकर्‍यांना शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले की या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी  अधिक पर्याय मिळतील. ते म्हणाले, या सुधारणांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील मोठा वाटा घेणाऱ्या मध्यस्थांपासून शेतकऱ्यांचे रक्षण होईल.  

कृषी सुधार विधेयकाबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्या विरोधकांवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, अनेक दशकांपासून या देशात राज्य करणारे काही लोक या विषयावर शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते म्हणाले की, एपीएमसी कायद्यातील कृषी बाजारपेठांच्या तरतुदीतील बदलांचे आश्वासन विरोधी पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यात देण्यात आले होते जे आता सुधारणांना विरोध करीत आहेत. ते म्हणाले, किमान आधारभूत किंमतीनुसार (एमएसपी) खरेदीप्रक्रीया पूर्वीप्रमाणेच सुरु राहिल, सरकार शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यासाठी कटिबद्ध आहे.

ते पुढे म्हणाले की नव्या तरतुदी अंमलात आल्यामुळे शेतकरी आपले कृषी उत्पादन देशातील कोणत्याही बाजारपेठेत इच्छित किंमतीवर विकू शकतील. एपीएमसी कायद्यामुळे होणारे नुकसान पाहता बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी बिहारमध्ये हा कायदा रद्द केला आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली, प्रधानमंत्री शेतकरी कल्याण योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कडुलिंबयुक्त युरिया, कोल्ड स्टोअरजचे नेटवर्क देशात मोठ्या प्रमाणावर उभे करण्यात आले आहे, अन्न प्रक्रिया उद्योग आणि कृषी पायाभूत सुविधा कोष निर्माण करण्यासाठी गुंतवणूक करण्यात आली आहे.  

पंतप्रधान म्हणाले, सरकार सातत्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजारांपासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी देशव्यापी मोहीम राबवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना स्पष्टपणे संदेश देताना त्यांनी सांगितले की, दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहा. हे लोक शेतकऱ्यांच्या रक्षणाविषयी मोठ्या गोष्टी करत आहेत, पण प्रत्यक्षात त्यांना शेतकऱ्यांना अनेक बंधनात बांधून ठेवायचे आहे. ते दलालांना मदत करीत आहेत आणि शेतकऱ्यांची कमाई लुटणाऱ्यांना पाठिंबा देत आहेत. ही देशाची गरज आणि काळाची मागणी आहे.

 

* * *

M.Chopade/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1656327) Visitor Counter : 180