आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड सद्यस्थिती


केंद्राकडून उच्चस्तरीय केंद्रीय पथक जम्मूकडे रवाना

प्रतिबंधित क्षेत्र, टेहळणी, चाचणी आणि कार्यक्षम वैद्यकीय व्यवस्थापन बळकट करण्यासाठी केंद्रीय पथक मदत करणार

Posted On: 18 SEP 2020 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 सप्‍टेंबर 2020


आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने उच्चस्तरीय केंद्रीय पथक जम्मूला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात अलिकडच्या काळात नवीन कोविडच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

या पथकात नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल (एनसीडीसी) चे संचालक डॉ. एस. के. सिंह आणि एम्स, नवी दिल्लीचे सहायक प्राध्यापक डॉ. विजय हड्डा यांचा समावेश आहे.

अलीकडेच एक विशेष पथकाने श्रीनगर खोऱ्यात भेट दिली होती. दोन सदस्यीय उच्चस्तरीय पथकाचे नेतृत्व नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल आणि एनसीडीसीचे संचालक डॉ. एस. के. सिंह यांनी केले. या पथकाने जिल्हाधिकाऱ्यांसमवेत कोविड व्यवस्थापनाच्या तयारीच्या स्थितीचा आढावा घेतला. आता रवाना झालेले केंद्रीय पथक जम्मूचे जिल्हाधिकारी व आरोग्य अधिकारी यांच्याशी संवाद साधेल. ते बक्षीनगर आणि गांधीनगरमधील रुग्णालयांनाही भेट देईल.

हे पथक, प्रतिबंधित क्षेत्र, नियंत्रण, पाळत ठेवणे, कोविड चाचण्या आणि कोरोनाबाधित रुग्णांसंदर्भात कार्यक्षम वैद्यकीय व्यवस्थापन याबाबत राज्य सरकारच्या प्रयत्नांना साहाय्य करेल. वेळेवर निदान आणि पाठपुरावा यासंबंधित आव्हानांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय पथक मार्गदर्शन करेल.

जम्मूमध्ये एकूण 9428 कोविड रुग्ण आहेत. यातील 3196 रुग्ण बरे झाले आहेत. 117 कोविड मृत्यू झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात 6115 सक्रिय रुग्ण आहेत. एका आठवड्यापूर्वी जिल्ह्यात एकूण 6878 रुग्णसंख्या होती. जम्मूमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 15.4 दिवस आहे तर रुग्ण बरे होण्याचा दर 33.9 टक्के आणि मृत्यू दर 1.24 टक्के नोंदविला जात आहे.

कोविड व्यवस्थापनासाठी विविध राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या प्रयत्नांना बळकट करण्यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी विविध राज्य / केंद्रशासित प्रदेशांना भेटी देण्यासाठी केंद्रीय पथकाची नेमणूक करीत आहे.

ही पथके राज्य/केंद्रशासित प्रदेशातील अधिकाऱ्यांशी संवाद साधतात आणि त्यांना सामना कराव्या लागत असलेल्या आव्हानांविषयी आणि त्यांच्या समस्यांविषयी सर्वप्रथम समजून घेऊन त्यांच्याद्वारे सुरू असलेल्या प्रयत्नांना बळकट करण्यासाठी तसेच काही अडथळे असतील तर ते दूर करण्यासाठी मदत करतात.


* * *

B.Gokhale/S.Tupe/D.Rane
 



(Release ID: 1656252) Visitor Counter : 151