संरक्षण मंत्रालय

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 17 सप्टेंबर रोजी राज्यसभेत केलेले निवेदन

Posted On: 17 SEP 2020 10:18PM by PIB Mumbai

 

 “ माननीय अध्यक्ष,

1.   गेल्या काही महिन्यात लडाखच्या सीमेवर झालेल्या घडामोडींची माहिती या सभागृहाच्या माननीय सदस्यांना देण्यासाठी मी उभा राहिलो आहे. आपल्या महान राष्ट्राच्या उभारणीसाठी अनेक देशवासीयांनी बलिदान दिले आहे. आपल्या सीमांच्या रक्षणासाठी सर्वोच्च त्याग करण्याकरता स्वतंत्र भारताच्या सशस्त्र दलांनी कधीही मागेपुढे पाहिले नाही. तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की 15 जून 2020 रोजी कर्नल संतोष बाबू आणि इतर 19 शूर सैनिकांनी गलवान खोऱ्यात आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लडाखला भेट दिली आणि आपल्या शूर सैनिकांचे मनोधैर्य उंचावले. या सैनिकांची भेट घेतल्यावर मी देखील त्यांची जिद्द आणि असीम साहस यांचा अनुभव घेतला आहे. गलवान खोऱ्यात हौतात्म्य पत्करलेल्या आपल्या वीस वीरांना या सभागृहाने देखील या अधिवेशनाच्या सुरुवातील दोन मिनिटे मौन राखून आदरांजली वाहिली आहे.    

2.   सर्वप्रथम चीनसोबत असलेल्या सीमावादाशी संबंधित काही तपशीलांची मी थोडक्यात माहिती देतो. भारत आणि चीन यांच्यात सीमेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नाचे निराकरण झालेले नाही, याची या सभागृहाला जाणीव आहे. भारत आणि चीन यांच्यात आखलेली पारंपरिक सीमारेषा चीनला मान्य नाही. ही आखणी या संदर्भातील समझोते आणि करारानुसार, तसेच अनेक शतकांपासून दोन्ही बाजूंना ज्ञात असलेला ऐतिहासिक वापर आणि रिवाजांद्वारे सुयोग्य पद्धतीने प्रस्थापित भौगौलिक सिद्धांतांवर आधारित असल्याचे आपण मानतो. याबाबत चीनची भूमिका मात्र वेगळी आहे. दोन्ही देशांदरम्यानच्या सीमेची औपचारिक आखणी झालेली नाही आणि त्यांच्या दाव्यानुसार दोन्ही देश ऐतिहासिक कालखंडापासून ज्या सीमेचा वापर करत होते अशी एक पारंपरिक औपचारिक सीमारेषा अस्तित्वात आहे आणि या सीमारेषेच्या स्थितीबाबत दोन्ही देशांची धारणा वेगवेगळी आहे. 1950-60 च्या दशकात दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी झाल्या होत्या मात्र, परस्परांना मान्य होईल असा तोडगा त्यातून निघू शकला नाही.

3.     लडाख या केंद्रशासित प्रदेशाचा सुमारे 38,000 चौरस किलोमीटरचा भूभाग चीनने अवैध रित्या बळकावलेला आहे, याची सभागृहाला माहिती आहे. त्याशिवाय तथाकथित चीन-पाकिस्तान सीमा करार 1963 अंतर्गत पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील 5180 चौरस किलोमीटरचा भारतीय भूभाग अवैध पद्धतीने चीनला दिला आहे. अरुणाल प्रदेशमध्ये भारत-चीन सीमेवरील पूर्वेकडील सुमारे 90,000 चौरस किलोमीटरच्या भारतीय प्रदेशावरही चीनने दावा केला आहे.

4.     सीमाप्रश्न हा अतिशय गुंतागुंतीचा मुद्दा आहे आणि त्याच्या निराकरणासाठी संयमाची आवश्यकता आहे याबाबत भारत आणि चीन या दोघांनीही सहमती व्यक्त केली आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी एक न्याय्य, व्यवहार्य आणि परस्परांना मान्य होईल असा तोडगा चर्चा आणि शांततामय वाटाघाटींच्या माध्यमातून काढण्यासाठी ते वचनबद्ध आहेत. द्विपक्षीय संबंधांमध्ये आणखी सुधारणा होण्यासाठी सीमा भागात शांतता आणि स्थैर्य टिकवणे अत्यावश्यक असल्याबाबतही दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली आहे.

5.    मी या ठिकाणी हे सांगेन की भारत आणि चीन यांच्यात सीमावर्ती भागात अद्याप सामाईक आरेखित अशी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा नाही आणि संपूर्ण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत सामाईक दृष्टीकोन नाही. म्हणूनच सीमा भागांमध्ये विशेषतः प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी दोन्ही देशांनी अनेक करार आणि शिष्टाचार केले आहेत.

6.   या करारांनुसार दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या स्थितीबाबत आणि सीमाप्रश्नाबाबत परस्परांच्या दृष्टीकोनाचा परिणाम होऊ न देता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत शांतता आणि स्थैर्य राखण्याबाबत सहमती व्यक्त केली आहे. याच आधारावर आमच्या एकंदर संबंधांमध्ये 1988 पासून लक्षणीय प्रगती झालेली पाहायला मिळाली. सीमा प्रश्न सोडवण्याबाबत चर्चा होत असताना त्यासोबतच द्विपक्षीय संबंधांमध्ये सुधारणा होऊ लागली असताना सीमाभागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत शांतता आणि स्थैर्याला बाधा पोहोचवणारी गंभीर घटना घडल्यास आमच्यातील सकारात्मक संबंधांवर त्याचा विपरित परिणाम होईल, अशी भारताची भूमिका आहे.

7.     1993 आणि 1996 च्या करारातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन्ही बाजू प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आपापल्या भागात लष्कराच्या कमीत कमी तुकड्या ठेवतील. सीमा प्रश्नाबाबत एक अंतिम तोडगा निघेपर्यंत दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे अतिशय कठोर पालन केले पाहिजे आणि तिचा सन्मान केला पाहिजे. त्याशिवाय या करारांनुसार भारत आणि चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या स्थितीबाबत सामाईक सहमती निर्माण करण्यासाठी स्पष्टीकरण देण्याची आणि पुष्टी करण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे. अशा प्रकारे 1990च्या उत्तरार्धात आणि 2003 पर्यंत दोन्ही बाजूंकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची पुष्टी करण्याचा आणि त्याबाबतचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. पण त्यानंतर चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या स्पष्टीकरणाबाबत फारसे स्वारस्य दाखवले नाही. परस्परांना व्यापणाऱ्या  भागांमध्ये त्याचबरोबर सीमेवरील इतर भागांमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांनी कशा प्रकारे परिचालन करावे आणि संघर्षाच्या स्थितीत शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी या स्थितीची हाताळणी कशा प्रकारे करावी याबाबतचे हे करार आहेत.

 8.  या सभागृहाला सध्याच्या घडामोडींविषयी माहिती देण्यापूर्वी मी हे सांगेन की केंद्रीय सशस्त्र पोलिस बल आणि तिन्ही संरक्षण दले यांच्या गुप्तचर यंत्रणांसह विविध गुप्तचर संस्थांसोबत सरकारचा योग्य प्रकारचा आणि काळाच्या कसोटीवर पारखलेला समन्वय आहे. अतिशय समन्वयीत पद्धतीने तांत्रिक आणि मानवी गुप्तचर माहिती सातत्याने संकलित केली जाते. संरक्षण दलांना ही माहिती पुरवली जाते ज्यामुळे त्यांना निर्णय घेण्यात मदत होते.

9.  यावर्षी घडलेल्या घडामोडींची माहिती मी सभागृहाला देत आहे. एप्रिल महिन्यापासून पूर्व लडाखला लागून असलेल्या सीमा भागांमध्ये चीनच्या बाजूला सैन्याची जमवाजमव आणि शस्त्रसामग्रीचा साठा होत असल्याचे आढळले होते. मे महिन्याच्या सुरुवातीला चीनने गलवान खोऱ्यामध्ये  आपल्या सैन्याच्या नेहमीच्या, पारंपरिक गस्ती व्यवस्थेमध्ये अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे संघर्ष निर्माण झाला. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय करार आणि शिष्टाचार यामधील तरतुदींनुसार ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न ग्राउंड कमांडर्सकडून होत असतानाच मे महिन्याच्या मध्यावर चिनी सैन्याने पश्चिम क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन करण्याचे अनेक प्रयत्न केले. यामध्ये कोंग्का ला, गोग्रा आणि पँगाँग लेकच्या उत्तर तीराचा समावेश होता. हे प्रयत्न वेळेवर लक्षात आले आणि आपल्या संरक्षण दलांनी त्यांना ताबडतोब प्रत्युत्तर दिले

10.  अशा प्रकारच्या प्रयत्नांमधून जैसे थे स्थिती बदलण्याचा चीनकडून एकतर्फी प्रयत्न होत असल्याचे आम्ही राजनैतिक आणि लष्करी माध्यमातून चीनच्या लक्षात आणून दिले. असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, असे स्पष्टपणे कळवण्यात आले.

11.   प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव वाढत चालला असताना दोन्ही देशांच्या वरिष्ठ कमांडरची 6 जून 2020 रोजी बैठक झाली आणि परस्परांशी प्रत्यक्ष संघर्ष थांबवण्याच्या प्रक्रियेचा अवलंब करण्याबाबत सहमती व्यक्त करण्यात आली. दोन्ही बाजूंनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा सन्मान करण्याबाबत आणि तिचे पालन करण्याबाबत तसेच जैसे थे स्थितीचे उल्लंघन करणारी कोणतीही कृती न करण्याबाबत सहमती व्यक्त करण्यात आली. मात्र, चीनच्या बाजूने या सर्वांचे उल्लंघन करण्यात आले आणि गलवान खोऱ्यात 15 जून रोजी हिंसक चकमक झाली. आपल्या वीर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि त्याचवेळी मनुष्यहानीसह त्याची मोठी किंमत चीनला मोजावी लागली.

12.  या सर्व घटनांमध्ये आपल्या सशस्त्र दलांच्या वर्तनातून हे दिसून येते की त्यांनी या चिथावणीखोर घटनांमध्ये संयम राखला आणि त्याचवेळी गरज भासल्यावर भारताच्या प्रादेशिक एकात्मतेच्या रक्षणासाठी तितक्याच मोठ्या शौर्याचे दर्शन घडवले. आपल्या सर्वांना सुरक्षित आणि निश्चिंत राखण्यासाठी अतिशय विपरित परिस्थितीत अनेक प्रकारचे कष्ट झेलणाऱ्या आपल्या  सैनिकांचे हे साहस आणि शौर्य याची या सभागृहाने प्रशंसा करावी, असे मला वाटते.

13. आपल्या सीमांच्या रक्षणासाठी आपल्या निर्धाराबाबत कोणाच्याही मनात शंका असता कामा नये. आपल्या शेजाऱ्यांशी शांततापूर्ण संबंध राखण्यासाठी परस्परांविषयी आदर आणि परस्परांबाबत संवेदनशीलता आवश्यक असल्याची भारताची धारणा आहे. आम्हाला सध्याच्या स्थितीबाबत चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची इच्छा असताना आम्ही चीनसोबत राजनैतिक आणि लष्करी माध्यमातून संपर्क कायम राखला आहे. या चर्चांमध्ये आम्ही तीन मुख्य सिद्धांतावर भर देत आमचा दृष्टीकोन स्पष्ट केला आहे: (i) दोन्ही बाजूंनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा आदर करावा आणि कठोरपणे तिचे पालन करावे; (ii) कोणत्याही बाजूने जैसे थे स्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न करू नये (iii) दोन्ही बाजूंमध्ये झालेले सर्व करार आणि सामंजस्य यांचे त्यांनी संपूर्ण पालन करावे. परिस्थितीची हाताळणी जबाबदारीने केली पाहिजे आणि द्विपक्षीय करार आणि शिष्टाचार यानुसार शांतता आणि स्थैर्य कायम राखले पाहिजे अशी भूमिका चीनने मांडली. मात्र, त्यांची भूमिका ते करत असलेल्या कारवायांशी सुंसगत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. याचा दाखला म्हणजे ज्यावेळी चर्चा सुरू होती त्यावेळी देखील चीनच्या सैन्याकडून 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री जैसे थे स्थिती बदलण्याच्या उद्देशाने पँगाँग लेकच्या दक्षिणेच्या तीरावर चिथावणीखोर लष्करी हालचाली करण्यात आल्या व त्या आपल्या लष्कराने पुन्हा हाणून पाडल्या.

14. या घटनांमधून हे स्पष्ट दिसून येते की आपल्या सोबत केलेल्या विविध द्विपक्षीय करारांचा चीन भंग करत आहे. चीनकडून होत असलेली सैन्याची जमवाजमव 1993 आणि 1996च्या करारांचे उल्लंघन आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा आदर आणि तिचे कठोर पालन हा सीमा भागात शांतता आणि स्थैर्य टिकवण्याचा पाया  आहे हे 1993 आणि 1996 या दोन्ही करारात मान्य करण्यात आले होते. एकीकडे आपल्या सशस्त्र दलांनी याचे प्रामाणिकपणे पालन केले असूनही, चीनच्या बाजूने त्यानुसार कृती होत नाही. त्यांच्या कृतींमुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत वेळोवेळी झटापटी होत आहेत आणि संघर्षाची स्थिती निर्माण होत आहे. मी यापूर्वीच उल्लेख केल्यानुसार या करारांमध्ये संघर्षाच्या स्थितीची हाताळणी करण्यासाठी अतिशय तपशीलवार प्रक्रिया आणि निकषांचा समावेश आहे. मात्र, यावर्षी अलीकडच्या काळातील घटनांमध्ये चिनी सैन्याने हिंसक वर्तन केले आहे आणि हे पूर्णपणे परस्पर सहमतीने मान्य केलेल्या निकषांचे उल्लंघन आहे.

 15. आतापर्यंत चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत आणि सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि शस्त्रांस्त्राची जमवाजमव केली आहे. पूर्व लडाखमध्ये गोग्रा, कोंग्का ला आणि पँगाँग लेकच्या उत्तर आणि दक्षिण तीरावर अनेक ठिकाणी संघर्षाचे भाग निर्माण झाले आहेत. चीनच्या या कृतीला तोंड देण्यासाठी आपल्या सशस्त्र दलांनी देखील या भागामध्ये त्यांच्या कृतीला उत्तर म्हणून भारतीय सीमांचे रक्षण करण्यासाठी योग्य प्रकारची व्यवस्था तैनात केली आहे. आपली सशस्त्र दले कोणत्याही आव्हानाला तोंड देऊन यशस्वी होतील आणि आपला अभिमान वाढवतील, याबाबत सभागृहाने विश्वास बाळगावा. सध्या ही निरंतर राहणारी स्थिती आहे आणि तिची हाताळणी अतिशय संवेदनशील पद्धतीने झाली पाहिजे. त्यामुळेच मी सार्वजनिक पद्धतीने यापेक्षा जास्त तपशील देऊ शकत नाही आणि सभागृहाला याची चांगलीच जाणीव आहे असा मला विश्वास आहे.

16. कोविड-19च्या आव्हानात्मक काळात आयटीबीपी सह आपल्या सशस्त्र दलांना अतिशय तातडीने तैनात करण्यात आले आहे. त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षात सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याला सरकारने मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिल्यामुळे देखील हे शक्य झाले. गेल्या अनेक दशकात चीनने सीमा भागांमध्ये पायाभूत सुविधा आणि बांधकामाची कामे हाती घेतली होती आणि सीमा भागामध्ये सैन्य तैनात करण्याच्या क्षमतेत वाढ केली होती याची सभागृहाला माहिती आहे.मात्र, आपल्या सरकारने देखील हे सर्व लक्षात घेऊन सीमा भागातील पायाभूत सुविधाच्या विकासासाठी पूर्वीच्या पातळ्यांच्या जवळपास दुप्पट खर्चाची तरतूद केली. त्याचाच परिणाम म्हणून या भागांमध्ये आता आणखी जास्त रस्ते आणि पूल पूर्ण झाले  आहेत. यामुळे या भागातील स्थानिक जनतेला आवश्यक असलेल्या दळणवळणाच्या केवळ सोयीच उपलब्ध झाल्या नाहीत तर आपल्या सशस्त्र दलांना अधिक चांगल्या वाहतुकीच्या सुविधांचे पाठबळ उपलब्ध झाले आहे. ज्यामुळे  त्यांना सीमेवर अधिक जास्त प्रमाणात दक्ष राहता येत आहे आणि गरज लागेल तिथे तातडीने कारवाई करता येत आहे. येणाऱ्या काही वर्षात देखील सरकार या उद्दिष्टासाठी वचनबद्ध आहे. देशाच्या हितासाठी कोणतेही मोठे आणि कणखर पाऊल उचलण्यासाठी आम्ही मागे हटणार नाही.

 

अध्यक्ष महोदय,

17.   सीमावर्ती भागात सध्या निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण शांततापूर्ण चर्चा आणि वाटाघाटी यांच्या माध्यमातून करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे, यावर मी भर देत आहे. याच उद्देशाने मी 4 सप्टेंबर 2020 रोजी माझ्या चिनी समपदस्थांची मॉस्को येथे भेट घेतली आणि सद्यस्थितीबाबत सखोल चर्चा केली. मोठ्या प्रमाणावर केलेली सैन्याची जमवाजमव, आक्रमक वर्तन आणि द्विपक्षीय कराराचा भंग करणारे जैसे थे स्थिती परिस्थिती बदलण्याचे एकतर्फी प्रयत्न यांसारख्या  चीनकडून उचललेल्या पावलांबाबत भारताला वाटत असलेल्या चिंतेची मी त्यांना स्पष्ट शब्दात जाणीव करून दिली. आम्हाला हा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवायचा आहे आणि चीनने आमच्या सोबत काम करावे असेही आम्हाला वाटत आहे तरीही भारताचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकात्मता यांचे रक्षण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेबाबत कोणीही शंका बाळगू नये, असे मी या बैठकीत स्पष्ट केले. माझे सहकारी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी चीनच्या परराष्ट्रमंत्र्याची मॉस्को येथे भेट घेतली. या दोघांनी एक करार केला, ज्याची अंमलबजावणी चीनकडून प्रामाणिकपणे आणि विश्वासाने झाली तर त्यामुळे दोन्ही देशांच्या सैन्यांमधील तणाव पूर्णपणे कमी होईल आणि सीमा भागांमध्ये शांतता आणि स्थैर्य निर्माण होईल.

18.  यापूर्वी देखील चीनसोबत सीमेवर प्रदीर्घ काळ तणाव निर्माण होण्याचे प्रसंग घडले होते आणि त्यांचे शांततेने निराकरण करण्यात आले याची सदस्यांना जाणीव आहे. जरी यावर्षी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेला संघर्ष आणि तणाव निर्माण होणाऱ्या स्थानांची संख्या यांचा विचार करता परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती तरी देखील सद्यस्थितीवर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. या सभागृहाच्या माध्यमातून मी देशाच्या 130 कोटी जनतेला हे विश्वासाने सांगेन की आम्ही कधीही देशाचा सन्मान कमी होऊ देणार नाही. आमच्या देशासाठी हा आमचा खंबीर निर्धार आहे.

19. अध्यक्ष महोदय,ज्या ज्या वेळी देशासमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली त्या त्या वेळी या सभागृहाने आपल्या सशस्त्र दलांचा निर्धार आणि मनोधैर्य उंचावण्यासाठी आपल्या सामर्थ्याचे आणि एकजुटीचे दर्शन घडवल्याची या सभागृहाची गौरवशाली परंपरा आहे. या सभागृहाने आपल्या सीमांवर तैनात असलेल्या आपल्या सशस्त्र दलांची दुर्दम्य इच्छाशक्ती शौर्य, साहस आणि पराक्रम यावर नेहमीच विश्वास दाखवला आहे.

20.  महोदय तुमच्या माध्यमातून मला आपल्या देशाच्या जनतेला विश्वासाने सांगायचे आहे की आपल्या सशस्त्र दलांचे मनोधैर्य आणि प्रेरक शक्ती अतिशय उच्च आहे आणि कोणत्याही आव्हानावर मात करण्यासाठी ते वचनबद्ध आहेत. यावेळी देखील आपल्या सैनिकांनी संयमाचे दर्शन घडवले आणि आक्रमकतेला शौर्याने तोंड दिले. आपल्याकडे संस्कृतात एक वचन आहे– “‘साहसे खलु श्री वसति’” म्हणजेच शौर्यामध्ये विजय वास करत असतो. आपले सैनिक संयम, साहस आणि शौर्याचे जिवंत प्रतीक आहेत. महोदय, सैनिकांमध्ये विश्वास वाढवणाऱ्या आपल्या पंतप्रधानांच्या भेटीमुळे देशाची 130 कोटी जनता आपल्या पाठिशी असल्याचा विश्वास आपले कमांडर आणि सैनिक यांच्यात निर्माण झाला आहे. अतिशय प्रतिकूल हवामानात, उपयुक्त ठरणारे उबदार कपडे, विशेष तंबू आणि शस्त्र आणि दारुगोळा यांची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. महोदय आपल्या सैनिकांचे मनोबल उच्च पातळीवर आहे. अतिशय उंचावर विरळ हवामानात कमी प्राणवायू असलेल्या आणि कडाक्याची थंडी असलेल्या भागांमध्ये काम करण्यासाठी ते सक्षम आहेत. सियाचीन आणि कारगीलमध्ये अनेक वर्षांपूर्वी त्यांनी ते अतिशय सहजपणे सिद्ध करून दाखवले आहे.

21.  अध्यक्ष महोदय, लडाखमध्ये आपल्याला आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे हे खरे आहे पण आपला देश आणि आपले शूर सैनिक प्रत्येक आव्हानावर मात करतील असा मला ठाम विश्वास आहे. आपल्या सशस्त्र दलांचे साहस आणि शौर्य यांचा एकमताने सन्मान करावा अशी मी सभागृहाला विनंती करतो. एकजुटीचा संदेश आणि आपल्या शूर सैनिकांवर दाखवलेला विश्वास याचा नाद केवळ देशातच घुमणार नाही तर संपूर्ण जगामध्ये घुमेल आणि आपल्या दलांमध्ये एक नवा आत्मविश्वास, नवी उर्जा आणि अमर्याद उत्साह निर्माण होईल.

 जय हिंद

M.Chopade/S.Patil/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1655909) Visitor Counter : 233