गृह मंत्रालय

स्थलांतरितांना केलेले अर्थसहाय्य

Posted On: 15 SEP 2020 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  15 सप्टेंबर  2020

कोविड-19 च्या साथीच्या आजाराच्या काळात अपरिहार्यपणे लागू कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोक अत्यावश्यक सेवांच्या पुरवठ्यापासून वंचित राहू नये, याची केंद्र सरकारला पूर्ण जाणीव होती. त्यावेळच्या परिस्थितीवर राष्ट्रीय पातळीवरुन नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून 24 तास देखरेख ठेवली जात होती. बेघर आणि स्थलांतरित लोकांना, अन्न, आरोग्य सेवा आणि निवारा अशा मूलभूत सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकारने 28 मार्च 2020 रोजी, राज्य सरकारांना त्यांचा राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी, या कामासाठी वापरण्याची परवानगी दिली.

स्थलांतरित मजुरांना, निवारा, अन्न, पाणी आणि आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी, तसेच, या स्थलांतरितांना समुपदेशन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने वेळोवेळी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने, 19 एप्रिल 2020 रोजी राज्यांमध्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्थलांतरित मजुरांच्या वाहतुकीला परवानगी दिली जेणेकरुन हे मजूर, काही औद्योगिक, कृषी, बांधकाम, उत्पादन क्षेत्र आणि मनरेगा सारख्या कामांमध्ये रोजगार मिळवू शकतील. 20 एप्रिल 2020 पासून प्रतिबंधित क्षेत्रांच्या बाहेर, इतर कामे करण्यासही परवानगी देण्यात आली. त्यानंतर 29 एप्रिल आणि एक मे रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, या सर्व मजुरांच्या राज्यांतर्गत वाहतुकीला परवानगी देत, बसेस किंवा श्रमिक रेल्वेने त्यांना त्यांच्या मूळगावी जाण्याची अनुमती देण्यात आली.

कोविड-19 च्या कालावधीत आपापल्या घरी जाण्याच्या प्रयत्नात रस्ते अपघात किंवा इतर दुर्घटनेत जीव गमवाव्या लागलेल्या लोकांच्या आकडेवारीची नोंद केंद्रीय पातळीवर ठेवली जात नाही.मात्र, या काळात, स्थलांतरित मजुरांची व्यवस्था आणि वाहतूक यासाठ आवश्यक ती सर्व पावले केंद्रसरकारकडून उचलली गेली आहे.

केंद्र सरकारने 26 मार्च 2020 रोजी, ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने’ची घोषणा करत, कोविड च्या संकटकाळात गरिबांना मदत करण्यासाठी  1.70 लाख कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली. त्याअंतर्गत, 42 कोटी लोकांना 68, 820 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. त्यानंतर आपापल्या मूळ गावी परत गेलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावातच रोजगार मिळावा, यासाठी केंद्र सरकारने, 20 जून 2020 रोजी ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’ ची घोषणा केली.

केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत एका लिखित उत्तरादाखल ही माहिती दिली.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1654694) Visitor Counter : 204