मंत्रिमंडळ

बिहारमध्ये दरभंगा येथे नवीन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ( एम्स) उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 15 SEP 2020 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  15 सप्टेंबर  2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज बिहारमध्ये दरभंगा येथे एक नवीन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था( एम्स) उभारण्यास मान्यता देण्यात आली. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना पीएमएसएसवाय अंतर्गत या संस्थेची उभारणी करण्यात येणार आहे. रु. 2,25,000/-(निश्चित) अधिक एनपीए( मात्र वेतन+ एनपीए रु. 2,37,500/- पेक्षा जास्त नसावे) या वेतनश्रेणीसह या संस्थेच्या संचालकाच्या एका पदाच्या निर्मितीला देखील  मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

या संस्थेच्या उभारणीसाठी एकूण 1264 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून भारत सरकारच्या मान्यतेनंतर सुमारे 48 महिन्यांमध्ये तिचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

सामान्य व्यक्तीला फायदे/ वैशिष्ट्ये:-

  • नव्या एम्समुळे100 पदवीपूर्व(एमबीबीएस) जागा आणि 60 बी. एस्सी. (परिचारिका अभ्यासक्रम) जागांची भर
  • नव्या एम्समध्ये 15-20 सुपर स्पेशालिटी विभाग असतील
  • नव्या एम्समुळे 750 रुग्णशय्यांची भ
  • सध्या कार्यरत असलेल्या एम्सच्या आकडेवारीनुसार, प्रत्येक नवीन एम्स दररोज सुमारे 2000 बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची आणि दरमहा सुमारे 1000 अंतर्रुग्ण विभागातील रुग्णांची हाताळणी करण्याची अपेक्षा आहे
  • या दरम्यान पदव्युत्तर आणि डीएम/ एम सीएच सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम देखील सुरू होणार.

प्रकल्पाचा तपशील:

नव्या एम्सच्या उभारणीमध्ये रुग्णालय, वैद्यकीय आणि परिचारिका अभ्यासक्रम शिक्षणासाठी शिक्षण केंद्र, निवासी संकुल आणि  संबंधित सुविधा/ सेवा यांचा समावेश मुख्यत्वे दिल्लीतील एम्सच्या आणि पीएमएसएसवायच्या पहिल्या टप्प्यांतर्गत तयार होणाऱ्या सहा नव्या एम्स रुग्णालयांच्या स्वरुपानुसार करण्यात येईल. या भागातील नागरिकांना दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या, वैद्यकीय शिक्षण आणि परिचारिका शिक्षण आणि संशोधन देणाऱ्या संस्थेची उभारणी करणे हा या संस्थेच्या उभारणीमागचा उद्देश आहे. या प्रस्तावित संस्थेमध्ये 750 रुग्णशय्या क्षमतेचे एक रुग्णालय असेल. ज्यामध्ये आकस्मिक/ ट्रॉमा रुग्णशय्या, अतिदक्षता रुग्णशय्या, आयुष, खाजगी रुग्णशय्या आणि स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी रुग्णशय्यांचा समावेश आहे. त्याशिवाय या संस्थेमध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय, आयुष कक्ष, सभागृह, रात्री राहण्याची सोय, अतिथी गृह, हॉटेल्स आणि निवासी सुविधा असतील. नव्या एम्सच्या उभारणीमुळे भांडवली मालमत्तांची निर्मिती होईल आणि त्यांच्या परिचालनासाठी आणि देखभालीसाठी सहा नव्या एम्सच्या स्वरुपावर आधारित तज्ञ मनुष्यबळाची नेमणूक केली जाईल. या संस्थांवर होणाऱ्या खर्चाची तरतूद आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पीएमएसएसवायच्या अंदाजपत्रकामध्ये करण्यात येईल.

परिणाम:

नव्या एम्सच्या उभारणीमुळे केवळ आरोग्य शिक्षण आणि प्रशिक्षणामध्येच परिवर्तन घडणार नसून, या भागातील आरोग्य व्यावसायिकांची उणीव देखील भरून निघणार आहे. नव्या एम्समुळे नागरिकांना अतिशय उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच या भागात डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याचे दुहेरी उद्दिष्ट साध्य होणार आहे. राष्ट्रीय आरोग्य मोहीम(एनएचएम) अंतर्गत निर्माण होत असलेल्या प्राथमिक आणि द्वितीयक पातळीच्या संस्थांमध्ये हे मनुष्यबळ उपलब्ध होईल. नव्या एम्सची उभारणी पूर्णपणे केंद्र सरकारच्या निधीच्या मदतीने होईल. त्यांचे परिचालन आणि देखभाल यांच्या खर्चाचा भार देखील केंद्र सरकारकडून उचलण्यात येईल.

रोजगार निर्मिती:

राज्यात नव्या एम्सच्या उभारणीमुळे विविध प्रकारच्या शैक्षणिक आणि बिगर शैक्षणिक पदांसाठी सुमारे 3000 व्यक्तींचे रोजगार निर्माण होणार आहेत. त्याशिवाय या एम्सच्या परिसरात उभारली जाणारी शॉपिंग सेंटर, कॅन्टीन यांसारख्या विविध प्रकारच्या सुविधा आणि सेवांच्या माध्यमातून देखील अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मिती होणार आहे. दरभंगा येथील एम्सच्या उभारणीमध्ये समाविष्ट असलेल्या पायाभूत सुविधा आणि इतर बांधकामाच्या कामांमुळे देखील या संस्थेच्या उभारणीच्या काळात बऱ्याच अंशी रोजगार निर्मिती होणार आहे. यामुळे या राज्यात आणि लगतच्या भागांमध्ये अतिशय उत्तम दर्जाच्या अत्याधुनिक आरोग्य सुविधांच्या पायाभूत सुविधांची आणि वैद्यकीय शिक्षण सुविधांची कमतरता दूर होईल. या एम्समुळे गरिबांना आणि गरजूंना आवश्यक असलेल्या सुपर स्पेशालिटी आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा परवडणाऱ्या दरात उपलब्ध होण्याबरोबरच राष्ट्रीय आरोग्य मोहीम आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या इतर आरोग्य योजनांसाठी प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ देखील उपलब्ध होणार आहे. तसेच या संस्थेच्या निर्मितीमुळे वैदयकीय शिक्षण क्षेत्रात दर्जेदार शिक्षण देणाऱ्या प्रशिक्षित अध्यापक वर्ग मोठ्या संख्येने निर्माण होणार आहे.

 

M.Iyengar/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1654536) Visitor Counter : 245