उपराष्ट्रपती कार्यालय

सर्व भारतीय भाषांना समान सन्मान मिळायला हवा- उपराष्ट्रपती


हिंदी दिवस-2020 निमित्त आयोजित वेबिनारमध्ये भाषण

Posted On: 14 SEP 2020 4:44PM by PIB Mumbai

 

देशातील सर्व भाषांना समान सन्मान द्यायला हवा, मात्रकुठेही कोणत्याही भाषेचे सक्ती केली जाऊ नये अथवा तिला विरोधही केला जाऊ नये, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केले  आहे.

हिंदी दिवस-2020 निमित्त मधुबन एज्युकेशनल बुक्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. आपल्या सर्व भारतीय भाषांना समृद्ध इतिहास आणि परंपरा असून आपल्याला भाषिक वैविध्याचा तसेच सांस्कृतिक वारशाचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा, असे श्री नायडू यावेळी म्हणाले.

महात्मा गांधी यांनी 1918 साली दक्षिण भारत हिंदी प्रचारसभेची स्थापना केली होती, याचा उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणात उल्लेख केला.हिंदी आणि इतर भारतीय भाषा परस्परांना पूरक आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.

नागरिकांमध्ये, परस्पर सद्भावना, स्नेह आणि आपुलकी निर्माण व्हावी, यासाठी, बिगर-हिंदी राज्यातील विद्यार्थ्यांनी हिंदी भाषा शिकावी आणि हिंदी भाषक राज्यातील विद्यार्थ्यांनी आणखी एक भारतीय भाषा, जसे तामिळ, तेलुगु, कन्नड इत्यादी भाषा शिकाव्यात, असा सल्ला उप राष्ट्रपतींनी दिला.

राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 मध्ये मातृभाषेला महत्व देण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त करत श्री नायडू म्हणाले की, सर्वसमावेशक शिक्षणासाठी मातृभाषेतून शिक्षण देणे गरजेचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजून घेणे सुलभ होते आणि ते आपल्या भावना किंवा विचार अधिक प्रभावीपणे मांडू शकतात.

मातृभाषेतून शिक्षण दिल्यास हिंदी आणि इअतर भारतीय भाषांमधील उत्तम पुस्तके सहज उपलब्ध होऊ शकतील, असेही ते म्हणाले. यात प्रकाशन संस्थांची भूमिका देखील महत्वाची ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सर्व भारतीय भाषांनी एकमेकींसोबत समृध्द होण्याची गरज असून, आपल्या भाषांमधला परस्परसंवाद वाढवण्यासाठी प्रकाशक आणि शिक्षणतज्ञांनी पुढाकार घेऊन उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

 

M.Iyangar/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1654061) Visitor Counter : 220