पंतप्रधान कार्यालय
आज बिहारमध्ये पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित तीन महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
13 SEP 2020 8:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 सप्टेंबर 2020
कार्यक्रमाच्या प्रारंभीच मला आपल्याबरोबर एक दुःखद बातमी सामायिक करायची आहे. बिहारचे दिग्गज नेते रघुवंश प्रसाद सिंह आता आपल्यामध्ये नाहीत. त्यांना मी वंदन करतो. रघुवंशबाबू यांच्या जाण्याने बिहार आणि देशाच्या राजकीय क्षेत्रामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. अगदी तळागाळातल्या समाजाशी जोडले गेलेले व्यक्तिमत्व, गरीबी म्हणजे नेमके काय हे समजणारे व्यक्त्वि, त्यांनी संपूर्ण जीवन बिहारसाठी संघर्ष करण्यामध्ये घालवले. ज्या विचारधारेमध्ये ते वाढले- मोठे झाले, जीवनभर त्याच तत्वांनुसार जगाण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
ज्यावेळी मी भारतीय जनता पार्टीचा संघटन कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो, त्या काळामध्ये माझा आणि त्यांचा खूप चांगला परिचय झाला. अनेक टी.व्ही कार्यक्रमांमध्ये आम्ही चर्चा, वाद-विवाद करीत असायचो. त्यानंतर ते केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये होते, मी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणूनही कार्यरत होतो, त्यावेळीही मी त्यांच्याशी सातत्याने संपर्कात होतो. विकास कामांची माहिती त्यांच्याकडून घेत होतो. आता गेल्या तीन-चार दिवसांपासून ते चर्चेमध्ये आले होते. त्यांच्या प्रकृतीविषयी मलाही चिंता वाटत होती. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची वारंवार चैकशी मी करीत होतो. आणि मला वाटत होतं की, ते लवकरच चांगले बरे होतील आणि बिहारच्या सेवाकार्यामध्ये पुन्हा स्वतःला झोकून देतील. त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचे मंथनही सुरू होते.
ज्या आदर्शांना उराशी बाळगून, ज्यांच्या बरोबर आपण चाललो होतो, त्यांच्याबरोबर यापुढे वाटचाल करणे आता शक्य होईल, असे त्यांना वाटत नव्हते. त्यामुळे त्यांचे मन संपूर्णपणे अस्वस्थ झाले होते. तीन-चार दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या मनातल्या भावना एका पत्राव्दारे लिहून प्रकटही केल्या होत्या. परंतु त्याचबरोबर आपल्या भागाच्या, राज्याच्या विकासाविषयी त्यांना तितकीच चिंता होती. त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या विकासकामांची एक सूची पाठवून दिली. बिहारच्या लोकांची चिंता, बिहारच्या विकासाची चिंता, त्या पत्रातून प्रकट होत आहे.
रघुवंश प्रसाद यांनी आपल्या अखेरच्या पत्रामध्ये ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण मिळून सर्वतोपरी प्रयत्न करूया, असा माझा नितीश यांना आग्रह आहे. कारण त्यांनी या पत्रामध्ये बिहारच्या विकासाविषयीच सर्व काही लिहिले आहे, त्यामुळे ही कामे जरूर केली पाहिजेत. मी पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमाच्या प्रारंभीच रघुवंश सिंह प्रसाद यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांना नमन करतो.
बिहारचे राज्यपाल फागू चैहानजी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारजी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी धर्मेंद्र प्रधानजी, रविशंकरजी, गिरीराज सिंहजी, आर.के.सिंहजी, अश्विनीकुमार चौबे जी, नित्यानंद रायजी, बिहारचे उप मुख्यमंत्री सुशीलकुमार मोदीजी, इतर खासदार आणि आमदार गण तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडले गेलेले माझे प्रिय बंधू आणि भगिनी !
आपल्या सर्वांना प्रणाम करतो, आजचा हा कार्यक्रम शहीद आणि शूरवीरांच्या धरतीवर होत आहे. ज्या ज्या योजना लोकार्पण करण्यात येत आहेत, त्यांचा लाभ संपूर्ण बिहारसहीत पूर्वेकडील भारताच्या खूप मोठ्या भागाला मिळणार आहे. आज 900 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण होत आहे तसेच शिलान्यास करण्यात येत आहे. एलपीजी वाहिनी टाकण्याचा हा प्रकल्प आहे आणि गॅस बॉटलिंगचे दोन प्रकल्पही सुरू करण्यात येत आहे. या सर्व सुविधा तुम्हाला उपलब्ध होत आहेत. या विकास प्रकल्पांसाठी बिहारवासियांचे खूप-खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
काही वर्षांपूर्वी ज्यावेळी बिहारसाठी विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली होती, त्यामध्ये राज्यामध्ये पायाभूत विकास प्रकल्प उभे रहावेत, यावर चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. दुर्गापूर -बांका क्षेत्रातल्या एका महत्वपूर्ण गॅसवाहिनीचा प्रकल्प लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली आहे, याचा आज मला अतिशय आनंद होतो आहे. दीड वर्षांपूर्वी या प्रकल्पाचा शिलान्यास करण्याची संधीही मला मिळाली होती. या सेक्शनचे अंतर जवळ-जवळ दोनशे किलोमीटर आहे. या मार्गावर गॅस वाहिनी टाकण्याचे काम अतिशय आव्हानात्मक होते, असे मला सांगण्यात आले आहे. ज्या मार्गावर जवळजवळ 10 नद्या आहेत, अनेक किलोमीटर अगदी घनदाट जंगल आहे. कडे-डोंगर आहेत, अशा ठिकाणी काम करणे काही सोपे नसते. अनेक अभियंते, तंत्रज्ञ, राज्य सरकार यांच्या सक्रिय समन्वयाने, आमच्या अभियंत्यांनी श्रमिकांच्या मदतीने या अतिशय कठिण कामाचा प्रकल्प अगदी नियोजित वेळेमध्ये पूर्ण केला आहे. यासाठी मी या प्रकल्पांशी जोडले गेलेल्या सर्व सहका-यांचे खूप-खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
बिहारसाठी जे प्रधानमंत्री पॅकेज दिले होते, त्यामध्ये पेट्रोलियम आणि गॅस यांच्याशी संबंधित असलेले 10 मोठे प्रकल्प होते. या प्रकल्पांवर जवळपास 21 हजार कोटी खर्च करण्यात येणार होते. आज त्यापैकी सातव्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे, तो बिहारच्या लोकांना समर्पित करण्यात आला आहे.
याआधी पाटणा येथे एलपीजी प्रकल्पाचा विस्तार आणि स्टोअरेज क्षमता वाढविण्याचे काम असेल, पूर्णियाच्या एलपीजी प्रकल्पाचा विस्तार असेल, मुजफ्फरपूर येथे नवीन एलपीजी प्रकल्प असेल हे सर्व प्रकल्प आधीच पूर्ण करण्यात झाले आहेत.
जगदीशपूर- हल्दिया वाहिनी प्रकल्पाचा जो भाग बिहारमधून जातो, त्याचेही काम गेल्यावर्षी मार्चमध्येच पूर्णय करण्यात आले आहे. मोतिहारी- अमलेखगंज वाहिनीशी संबंधित कामही आत पूर्ण करण्यात आले आहे.
एकेकाळी आपल्याकडे एक पिढी काम सुरू होताना, प्रारंभाचा साक्षीदार असायची दुसरी पिढी ते काम पूर्ण झालेले पहायची. आता देश आणि बिहार या काळातून बाहेर येत आहे. नवीन भारत, नवीन बिहारची ही नवीन ओळख आहे, अशीच कार्यसंस्कृती आता आपल्याला अधिक मजबूत करायची आहे. यामध्ये नितीशकुमारांची खूप मोठी महत्वाची भूमिका निश्चितच आहे.
मला विश्वास आहे की, अशाच पद्धतीने निरंतर काम करून बिहार आणि पूर्व भारताला विकासाच्या मार्गावर घेवून जाता येणार आहे.
मित्रांनो,
आपल्या शास्त्रामध्ये म्हटले आहे की ---
सामर्थ्य मूलं स्वातंत्र्यम्, श्रम मूलं वैभवम् ।।
म्हणजेच सामर्थ्य स्वातंत्र्याचा स्त्रोत आणि आणि श्रमशक्ती कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचा आधार असते. बिहारसहित पूर्व भारतामध्ये ना सामथ्र्याची कमतरता आहे की ना नैसर्गिक साधन सामुग्रीचा अभाव आहे. इतके सर्वकाही असतानाही बिहार आणि पूर्व भारत, विकासाच्या बाबतीत अनेक दशके मागे राहिला आहे. याची अनेक कारणे राजनैतिक होती, आर्थिक होती, प्राधान्यक्रम हेही एक कारण होते.
अशा परिस्थितीमुळे पूर्व भारत आणि बिहारमधले पायाभूत प्रकल्प नेहमी अंतहीन विलंबाचे शिकार झाले आहेत. एक काळ असा होता की, रस्ते संपर्क व्यवस्था, रेल संपर्क व्यवस्था, हवाई, इंटरनेट संपर्क व्यवस्था या सर्व गोष्टींना प्राधान्य दिलेच गेले नव्हते. इतकेच नाही तर जर रस्ता बनविण्याविषयी चर्चा केली तर विचारण्यात येत होते की, हा मार्ग तर गाडीवाल्यांसाठी बनविला जात आहे. पायी जाणा-यांसाठी काय आहे, विचारांमध्येही एकूणच गडबड होती.
अशामध्ये गॅसवर आधारित औद्योगिक वसाहत आणि पेट्रो- कनेक्टिव्हिटी यांच्याविषयी तर बिहारमध्ये जुन्या काळामध्ये कल्पनाही करणे शक्य नव्हते. ‘लँडलॉक्ड’ राज्य असल्यामुळे बिहारमध्ये पेट्रोलियम आणि गॅस यांच्याशी संबंधित साधन-सामुग्री उपलब्ध होवू शकत नव्हती ज्याप्रमाणे सागरी किनारपट्टीला लागून असलेल्या राज्यांमध्ये असते, त्यामुळेच बिहारमध्ये गॅसआधारित उद्योगांचा विकास करणे हे एक मोठे आव्हान होते.
मित्रांनो,
गॅस आधारित उद्योग आणि पेट्रो कनेक्टिव्हिटी, हे शब्द ऐकायला खूप तांत्रिक आहेत असे वाटते, परंतु यांचा थेट परिणाम लोकांच्या जीवनावर पडतो. जीवनमानावर पडतो. गॅसवर आधारित उद्योग आणि पेट्रो-कनेक्टिव्हिटी यांच्यामुळे रोजगाराच्या लाखो नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
आज ज्यावेळी देशातल्या अनेक शहरांमध्ये सीएनजी पोहोचत आहे, पीएनजी पोहोचत आहे, तर बिहार आणि पूर्व भारताच्या लोकांनाही या सुविधा तितक्याच सहजतेने मिळाल्या पाहिजेत. असा संकल्प करून आज आपण पुढे जायचे आहे.
प्रधानमंत्री ऊर्जा गंगा योजनेअंतर्गत पूर्व भारताला पूर्व सागरी किना-यावरील पारादीप आणि पश्चिमी सागरी किना-यावरील कांडला बंदराला जोडण्यासाठी भगीरथ प्रयत्न सुरू आहेत. जवळपास 3 हजार किलोमीटर लांबीच्या या वाहिनीनी सात राज्यांना जोडण्यात येत आहे. यामध्ये बिहार प्रमुख स्थानी आहे. पारादीप-हल्दिया येथून येणारी वाहिनी आता बांकापर्यंत पूर्ण झाली आहे. तीच वाहिनी पुढे पाटणा, मुजफ्फरपूरपर्यंत नेण्यात येणार आहे. कांडला येथून येणारी वाहिनी गोरखपूरपर्यंत पोहोचली आहे. ती वाहिनीही आता जोडण्यात येणार आहे. ज्यावेळी हा प्रकल्प पूर्ण तयार होईल, त्यावेळी विश्वातली सर्वात लांब वाहिनी योजनेपैकी एक ही असणार आहे.
मित्रांनो,
या गॅस वाहिनीमुळे आता बिहारमध्ये सिलेंडर भरण्याचे मोठ-मोठे प्रकल्प लावणे शक्य होत आहे. बांका आणि चंपारण मध्येही असेच दोन नवीन बॉटलिंग प्रकल्प सुरू झाले असून त्यांचे आज लोकार्पण करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये दरवर्षी सव्वा कोटींपेक्षा जास्त सिलेंडर भरण्याची क्षमता आहे. या प्रकल्पांमुळे बिहारच्या बांका, भागलपूर, जमुई, अररिया, किशनगंज, कटिहार, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, मुजफ्फरपूर, सिवान, गोपालगंज आणि सीतामढी या जिल्ह्यांना सुविधा मिळणार आहे.
त्याचप्रमाणे झारखंडमधल्या गोड्डा, देवघर, दुमका, साहिबगंज, पाकुड या जिल्ह्यांची आणि उत्तर प्रदेशातल्या काही भागाची एलपीजीविषयी असलेली गरज या प्रकल्पामुळे पूर्ण होवू शकणार आहे. ही गॅस वाहिनी टाकण्यात आल्यामुहे नवीन उद्योगांना ऊर्जा मिळत आहे. त्यामुळे बिहारमध्ये हजारो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत आणि यापुढेही अनेक रोजगाराच्या संधी तयार होणार आहेत.
मित्रांनो,
उज्वला योजनेमुळे आज देशातील 8 कोटी गरीब कुटुंबांकडे गॅस जोडण्या आहेत. या योजनेमुळे गरीबांच्या आयुष्यात काय परिवर्तन झाले, याची कोरोना काळात आपण सर्वानी पुन्हा अनुभूती घेतली आहे. तुम्ही कल्पना करा, जेव्हा घरी राहणे आवश्यक होते, तेव्हा जर या 8 कोटी कुटुंबातील लोकांना, आपल्या भगिनींना लाकूडफाटा किंवा अन्य इंधन गोळा करण्यासाठी बाहेर पडावे लागले असते तर काय स्थिती झाली असती ?
मित्रांनो,
कोरोनाच्या या काळात उज्वला योजनेच्या लाभार्थी भगिनींना कोट्यवधी सिलिंडर मोफत देण्यात आले. याचा लाभ बिहारच्या लाखो भगिनींना झाला आहे, लाखो गरीब कुटुंबांना झाला आहे. मी पेट्रोलियम आणि वायूशी संबंधित विभाग आणि कंपन्यांबरोबरच डिलिवरीशी संबंधित लाखो सहकाऱ्यांची , कोरोना योद्धयांची प्रशंसा करतो. हे ते सहकारी आहेत, ज्यांनी या संकटाच्या काळात देखील लोकांच्या घरात गॅसची कमतरता भासू दिली नाही आणि आजही संसर्गाचा धोका असूनही सिलिंडर पुरवठा सुरळीत सुरु ठेवला आहे.
मित्रांनो,
एक काळ होता जेव्हा संपूर्ण देशात आणि बिहारमध्ये एलपीजी गॅस जोडणी असणे अति श्रीमंत लोकांचे लक्षण मानले जायचे. एकेक गॅस जोडणीसाठी लोकांना शिफारशी आणाव्या लागत होत्या. खासदारांच्या घराबाहेर रांगा लागलेल्या असायच्या. ज्यांच्या घरी गॅस असायचा तो खूप मोठ्या घरचा किंवा कुटुंबातील मानला जायचा. जे समाजात मागास होते, पीडित होते, वंचित होते, अतिमागास होते त्यांना कुणी विचारत नव्हते. त्यांचे दुःख, त्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष केले जात होते.
मात्र बिहारमध्ये आता हा समज बदलला आहे. उज्वला योजनेच्या माध्यमातूनच बिहारच्या सुमारे सव्वा कोटी गरीब कुटुंबांना गॅसची मोफत जोडणी देण्यात आली आहे. घरात गॅस जोडणीमुळे बिहारच्या कोट्यवधी गरीबांचे जीवन बदलले आहे. आता ते आपली ताकद स्वयंपाक बनवण्यासाठी लाकडे गोळा करण्यासाठी नाही तर स्वतःचा विकास करण्यात लावत आहेत.
मित्रांनो,
जेव्हा मी म्हणतो कि बिहार देशाच्या प्रतिभेचे उर्जास्थान आहे, ऊर्जा केंद्र आहे तेव्हा ती काही अतिशयोक्ति होणार नाही. बिहारच्या युवकांचा, इथल्या प्रतिभेचा प्रभाव सर्वत्र आहे. भारत सरकारमध्येच बिहारचे असे कित्येक मुले-मुली असतील जे देशाची सेवा करत आहेत. , दुसऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहेत.
तुम्ही कुठल्याही आयआयटीमध्ये जा, तिथेही बिहारचा ठसा जाणवेल. अन्य कुठल्याही संस्थेत जा, डोळ्यात मोठमोठी स्वप्ने घेऊन देशासाठी काही तरी करून दाखवण्याची जिद्द घेऊन बिहारची मुले-मुली सर्व ठिकाणी काही तरी वेगळे करून दाखवत आहेत.
बिहारची कला, इथले संगीत, इथले स्वादिष्ट खाद्यपदार्थ, याची प्रशंसा तर संपूर्ण देशात होते. तुम्ही दुसऱ्या कुठल्या राज्यात जा, बिहारची ताकद, बिहारच्या श्रमाचा ठसा तुम्हाला प्रत्येक राज्याच्या विकासात दिसेल. बिहारचे सहकार्य सर्वांसोबत आहे.
हाच तर बिहार आहे, हीच तर बिहारची अद्भुत क्षमता आहे. म्हणूनच हे आपले देखील कर्तव्य आहे, आणि मी तर म्हणेन कि कुठे ना कुठे आपल्यावर बिहारचे कर्ज आहे, कि आपण बिहारची सेवा करावी. आपण बिहारमध्ये असे सुशासन ठेवू जो बिहारचा अधिकार आहे.
मित्रांनो,
मागील 15 वर्षात बिहारने हे दाखवून देखील दिले आहे कि जर योग्य सरकार असेल, योग्य निर्णय घेतले गेले, धोरण स्पष्ट असेल तर विकास होतो आणि प्रत्येकापर्यंत पोहचतो. आम्ही बिहारच्या प्रत्येक क्षेत्राला पुढे नेत आहोत, प्रत्येक क्षेत्राच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून बिहार विकासाची नवी शिखरे गाठेल. एवढी मोठी झेप घेईल जेवढे उंच बिहारचे सामर्थ्य आहे.
मित्रांनो,
बिहारमध्ये काही लोक कधी असे म्हणायचे कि बिहारच्या तरुणांनी शिकून काय करायचे, त्यांना तर शेतातच काम करायचे आहे. अशा विचारांमुळे बिहारच्या प्रतिभावंत युवकांबरोबर खूप अन्याय झाला. याच विचारांमुळे बिहारमध्ये मोठ्या शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी जास्त काम केले गेले नाही. त्याचा परिणाम असा झाला कि बिहारचे तरुण शिक्षणासाठी, नोकरीसाठी बाहेर जाण्यास प्रवृत्त झाले.
मित्रांनो,
शेतात काम करणे, शेती हे खूप मेहनतीचे आणि अभिमानाचे काम आहे मात्र युवकांना अन्य संधी न देणे, तशी व्यवस्था न बनवणे, हे देखील योग्य नव्हते. आज बिहारमध्ये शिक्षणाची मोठमोठी केंद्र सुरु होत आहेत. आता कृषी महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या वाढत आहे. आता बिहारमधील आयआयटी, आयआयएम आणि आयआयआयटी बिहारमधील तरुणांची स्वप्ने उंचावण्यासाठी मदत करत आहेत.
नीतीशजी यांच्या शासन काळात बिहारमध्ये दोन केंद्रीय विद्यापीठे, एक आयआयटी, एक आयआयएम, एक एनआयएफटी आणि एक राष्ट्रीय विधि संस्था सारख्या अनेक मोठ्या संस्था सुरु झाल्या आहेत. नीतीशजींच्या प्रयत्नांमुळे आज बिहारमध्ये पॉलीटेक्निक संस्थाची संख्या पूर्वीच्या तुलनेत तीन पटीने अधिक झाली आहे.
स्टार्ट अप इंडिया, मुद्रा योजना, अशा योजनांनी बिहारच्या तरुणांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक निधी पुरवला आहे. सरकारचा प्रयत्न आहे कि जिल्हा पातळीवर कौशल्य केंद्रांच्या माध्यमातून बिहारच्या युवकांना कौशल्य वाढवण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे.
मित्रांनो,
बिहारमध्ये विजेची काय स्थिती होती, हे देखील जगजाहीर आहे. गावांमध्ये दोन-तीन तास वीज आली तर खूप मोठे मानले जायचे. शहरात राहणाऱ्या लोंकाना देखील 8-10 तासांपेक्षा अधिक वीज मिळत नव्हती. आज बिहारच्या गावांमध्ये, शहरांमध्ये विजेची उपलब्धता पूर्वीच्या तुलनेत खूप जास्त आहे.
मित्रांनो,
वीज, पेट्रोलियम आणि गॅसशी संबंधित क्षेत्रांमध्ये ज्या आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत, ज्या सुधारणा केल्या जात आहेत, त्या लोकांचे जीवनमान सुलभ करण्याबरोबरच उद्योग आणि अर्थव्यवस्थेला देखील गती देत आहेत. कोरोनाच्या या काळात आता पुन्हा एकदा पेट्रोलियमशी संबंधित पायाभूत विकास कामांनी वेग घेतला आहे.
रिफायनरी प्रकल्प असतील, शोध किंवा उत्पादनाशी संबंधित प्रकल्प असतील, पाइपलाइन असेल, शहर गॅस वितरण प्रकल्प असेल, असे अनेक प्रकल्प पुन्हा सुरु झाले आहेत किंवा नवे सुरु करण्यात आले आहेत. त्यांची संख्या कमी नाही. हे 8 हजाराहून अधिक प्रकल्प आहेत, यावर आगामी काळात 6 लाख कोटी रुपये खर्च केले जातील. तुम्ही अंदाज लावू शकता कि देशात, बिहारमध्ये गैस आधारित अर्थव्यवस्थेसाठी किती मोठ्या प्रमाणावर काम सुरु आहे.
एवढेच नाही, या प्रकल्पांमध्ये जेवढे लोक आधी काम करत होते, ते परत आले आहेतच, त्यांच्यामुळे रोजगाराच्या नव्या संधींची शक्यता देखील वाढली आहे. मित्रांनो, एवढी मोठी जागतिक महामारी देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी संकट घेऊन आली आहे. मात्र या संकटांनंतरही देश थांबलेला नाही, बिहार थांबलेला नाही.
100 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे राष्ट्रीय पायाभूत विकास पाइपलाइन प्रकल्प देखील आर्थिक घडामोडी वाढवण्यात मदत करणार आहेत. बिहारला, पूर्व भारताला विकासाचे, आत्मविश्वासाचे महत्वपूर्ण केंद्र बनवण्यासाठी आपण सर्वांनी वेगाने काम करत राहायला हवे. याच विश्वासासह शेकडो कोटींच्या सुविधांसाठी पुन्हा एकदा संपूर्ण बिहारला खूप खूप शुभेच्छा. विशेषतः माता आणि भगिनींचे आयुष्य सुलभ होणार आहे, त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो.
लक्षात ठेवा, कोरोना संसर्ग अजूनही आपल्या अवतीभवती कायम आहे. आणि म्हणूनच मी पुन्हा पुन्हा सांगतो - जोवर औषध नाही तोवर सुस्तपणा नाही. पुन्हा ऐका, जोवर औषध नाही तोवर सुस्तपणा नाही.
म्हणूनच सहा फुटांचे अंतर, साबणाने हात स्वच्छ धूत राहणे , इथे तिथे थुंकण्याची मनाई आणि चेहऱ्यावर मास्क या आवश्यक गोष्टींचे आपण स्वतः पालन करायचे आहेच आणि इतरांना देखील आठवण करून देत राहायचे आहे.
तुम्ही सतर्क राहिलात, तर बिहार निरोगी राहील, देश निरोगी राहील. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वाना या अनेक भेटी तसेच बिहारच्या विकास यात्रेत नव्या ऊर्जेच्या या प्रसंगी तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा.
खूप-खूप धन्यवाद !
* * *
B.Gokhale/S.Bedekar/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1653853)
Visitor Counter : 235
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam