संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या सशस्त्र दलाच्या मंत्री फ्लोरेंस पार्ली यांच्या उपस्थितीत राफेल विमान भारतीय हवाई दलात औपचारिकपणे दाखल
भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्यांसाठी हा एक स्पष्ट संदेश -संरक्षण मंत्री
प्रविष्टि तिथि:
10 SEP 2020 10:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2020
अंबाला हवाई दल तळावर झालेल्या औपचारिक कार्यक्रमात राफेल लढाऊ विमान आज भारतीय हवाई दलात (आयएएफ) औपचारिकपणे दाखल करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या सशस्त्र सेना मंत्री फ्लोरेन्स पार्ली या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले राफेलचा समावेश हा ऐतिहासिक क्षण असून भारतीय हवाई दलाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. ते म्हणाले, राफेल करार हा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्वपूर्ण होता आणि त्याचा समावेश हा जगासाठी आणि विशेषत: जे भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देतात त्यांच्यासाठी एक मजबूत संदेश आहे. कोणत्याही परिस्थितीत भारताच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करण्याच्या संकल्पाचा आणि देशासाठी शक्य ती सर्व तयारी करण्याच्या देशाच्या निर्धाराचा राजनाथ सिंह यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, “लष्कराचे मनसुबे तितकेच दृढ आहेत,” ते म्हणाले की, “आमची संरक्षण व्यवस्था बळकट करण्यामागे आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थिरता प्राप्त करण्याचा उद्देश आहे आणि आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आणणारे कोणतेही पाऊल उचलण्याची आमची इच्छा नाही. आम्हाला आमच्या शेजार्यांकडून आणि जगातील इतर देशांकडून हीच अपेक्षा आहे. ”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्राधान्यक्रमांबाबत बोलताना सिंह म्हणाले की राष्ट्रीय सुरक्षा ही पंतप्रधानांची प्रमुख प्राथमिकता आहे आणि या मार्गात अनेक अडथळे येऊनही आपण आज जे पाहत आहोत ही त्यांच्या दूरदृष्टीची परिणती आहे.
राफेलचा समावेश भारत-फ्रान्स धोरणात्मक संबंध प्रतिबिंबित करत असल्याचे सांगत संरक्षण मंत्री म्हणाले “आम्ही आमचे संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी अनेक क्षेत्रात दृढ सहकार्य केले आहे. तंत्रज्ञान कराराच्या हस्तांतरणाचा भाग म्हणून माझगाव गोदी येथे 6 स्कॉर्पेन पाणबुड्या तयार केल्या जात आहेत. या भागीदारीच्या आधारे, आयएनएस कलवरी या पहिल्या पाणबुडीचे 2017 मध्ये जलवतरण करण्यात आले. ” भारत -प्रशांत क्षेत्र आणि आयओआरमधील सागरी सुरक्षा आणि चाचेगिरी यासारख्या सामायिक आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांनी भारत -फ्रेंच सहकार्य अधोरेखित केले.
संरक्षण मंत्र्यांनी भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्रात फ्रेंच गुंतवणूकीसाठी आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'स्वावलंबी उपक्रम' आवाहनाला प्रतिसाद देताना ते म्हणाले की, धोरणात्मक-भागीदारी मॉडेल अंतर्गत संरक्षण उपकरणे तयार करणे, स्वयंचलित मार्गाने एफडीआय 74 टक्क्यांपर्यंत वाढविणे , उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये दोन संरक्षण कॉरिडॉरची स्थापना आणि ऑफसेटमध्ये सुधारणा यासारख्या अनेक धोरणात्मक सुधारणा सुरू केल्या आहेत. , “मला खात्री आहे की फ्रेंच संरक्षण उद्योग याचा लाभ घेईल आणि फ्रान्स आमच्या स्वदेशीकरणाच्या प्रवासात आमचा भागीदार राहील.”
एलएसी जवळ अलीकडेच केलेल्या जलद आणि निर्णायक कारवाईबद्दल संरक्षण मंत्र्यांनी भारतीय हवाई दलाच्या जवानांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, आघाडीच्या तळांवर भारतीय हवाई दलाची विमाने वेगाने तैनात केल्यामुळे एक विश्वास निर्माण झाला की आमचे हवाई दल परिचालन जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. सिंह यांनी कोविड -19 महामारी दरम्यान देशाच्या प्रयत्नांमध्ये भारतीय हवाई दलाच्या योगदानाचे कौतुक केले.
फ्रान्सच्या सशस्त्र दलाच्या मंत्री फ्लोरन्स परली यांनी आपल्या भाषणात सांगितले की आज राफेल हवाई दलात सामील होणे हे दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांचे प्रतीक आहे जे खडकाप्रमाणे भक्कम असून काळाच्या कसोटीवर खरे उतरले आहेत. सैन्याच्या दृष्टीने, भारत जागतिक दर्जाची क्षमता संपादन करेल जी नवी दिल्लीला एक अविश्वसनीय सार्वभौमत्व देईल आणि सामरिक दृष्टीने ते स्वत: चा बचाव करण्यासाठी संपूर्ण प्रदेशात भारताला अधिक ताकद देईल. उर्वरित 31 विमाने वेळेवर सुपूर्द करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. फ्लोरेंस पार्ली यांनी सांगितले की फ्रान्स मेक इन इंडिया उपक्रमासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे , जे बर्याच वर्षांपासून फ्रेंच उद्योगासाठी विशेषतः पाणबुडीसारख्या संरक्षण क्षेत्रातही वास्तव बनले आहे.
संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार, सचिव (संरक्षण उत्पादन) राज कुमार, संरक्षण संशोधन व विकास विभाग आणि अध्यक्ष डीआरडीओ, डॉ. जी सत्येश रेड्डी, संरक्षण मंत्रालय आणि सशस्त्र दलांच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या कार्यक्रमाला उपस्थित होते. फ्रेंच प्रतिनिधीमंडळात भारतातले फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनिन , एअर जनरल एरिक ऑटलेट, फ्रेंच एअर फोर्सचे हवाई दलाचे उपाध्यक्ष व इतर वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता. या समारंभा दरम्यान फ्रेंच संरक्षण उद्योगाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांचे एक मोठे शिष्टमंडळ, उपस्थित होते.
27जुलै 2020, रोजी फ्रान्सहून अंबाला हवाई तळ येथे दाखल झालेली पहिली पाच राफेल विमाने 17 स्क्वॉड्रॉन, “गोल्डन अॅरो” चा भाग असेल.
राफेल अनावरण सोहळ्यापूर्वी पारंपारिक ‘सर्व धर्म पूजा’ पार पडली.राफेल आणि तेजस विमानांचे तसेच ‘सारंग एरोबॅटिक टीम’ ची हवाई प्रात्यक्षिके, त्यानंतर राफेल विमानांना पारंपारिक वॉटर तोफ सलामी देण्यात आली. औपचारिक कार्यक्रमानंतर भारतीय आणि फ्रेंच प्रतिनिधीमंडळांचीही द्विपक्षीय बैठक झाली.
तत्पूर्वी आज सकाळी फ्रान्सच्या सशस्त्र दलाच्या मंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांना दिल्लीत दाखल झाल्यावर औपचारिक मानवंदना देण्यात आली.
* * *
B.Gokhale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1653191)
आगंतुक पटल : 775