शिक्षण मंत्रालय
शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद 47 आदर्श शिक्षकांना आभासी कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करणार
Posted On:
04 SEP 2020 8:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2020
शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद 47 आदर्श शिक्षकांना आभासी कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ आणि शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रयोग करून शिक्षक देत असलेल्या योगदानाचे कौतुक करण्यासाठी आणि त्यातून सर्वांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शिक्षकांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देवून गौरविण्यात येते. ज्या शिक्षकांनी आपल्या कार्याविषयी कटिबद्धता दाखवून केवळ शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत केली असे नाही, तर आपल्या विद्यार्थी वर्गाचे जीवन समृद्ध बनविले आहे, अशा शिक्षकांना पुरस्कार देण्यात येत आहे.
या पुरस्कारासाठी राष्ट्रीय स्तरांवरील निवड मंडळाने ऑनलाइन आणि पारदर्शक पद्धतीने तीन टप्प्यांमध्ये विचार करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करताना तयार करण्यात आलेल्या दिशानिर्देशांमध्ये सन 2018 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार:
- शिक्षकांकडून mhrd.gov.in या संकेतस्थळावर स्वनामांकन मागविण्यात आले.
- सर्व नियमित शिक्षक यासाठी पात्र आहेत. तसेच किमान सेवेची कोणतीही अट नाही.
- अंतिम निवडीसाठी कोणत्याही राज्याचा अथवा केंद्रशासित प्रदेशाचा किंवा संघटनेचा कोटा ठेवण्यात आला नाही.
- राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश संघटना यांच्याकडून आलेल्या संक्षिप्त सूचीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांच्या नावांपैकी स्वतंत्र राष्ट्रीय परीक्षकांच्यामार्फत अंतिम निवड करण्यात आली.
- पुरस्कारांची संख्या 45 ठेवण्यात आली आहे. (याशिवाय, परीक्षक विशेष श्रेणीमध्ये दोन शिक्षकांची निवड करण्यात येते. यामध्ये दिव्यांग शिक्षकांचा सामावेश असतो.)
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या शिक्षकांनी आपले अध्यापन क्षेत्रातले योगदान, त्यांनी मुलांच्या कल्याणासाठी घेतलेले परिश्रम, शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये आणलेली सुधारणा याशिवाय जी मुले शाळा सोडून जातात, त्यांना शिक्षणाकडे पुन्हा वळविण्यासाठी केलेले काम, आनंदपूर्ण आणि अनुभवातून ज्ञानार्जनासाठी केलेले प्रयत्न अशा पाठ्येतर कामांना प्रोत्साहन दिले आहे. मुलांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण करणे, सामुदायिक भागीदारीतून काम पार पाडण्यास प्रोत्साहन देणे, तसेच आयसीटी अध्यापनाचा प्रभावी वापर केला आहे आणि राष्ट्रनिर्माणाच्या आणि राष्ट्रीय एकीकरणाला प्रोत्साहन देवून मुलांचे जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
आदर्श शिक्षक पुरस्काराच्या राष्ट्रीय पुरस्काराच्या कार्यक्रमाचे दि. 5 सप्टेंबर, 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता खालील लिंकवरून थेट प्रसारण करण्यात येणार आहे.
https://webcast.gov.in/mhrd
* * *
B.Gokhale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1651426)
Visitor Counter : 238