कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
लद्दाखचे नायब राज्यपाल आर के माथुर यांनी घेतली केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांची भेट
Posted On:
03 SEP 2020 9:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 सप्टेंबर 2020
लद्दाखचे नायब राज्यपाल आर के माथुर यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि पंतप्रधान कार्यालय तसेच कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री, डॉ जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. या भेटीत लद्दाखच्या विकासाशी निगडीत विविध विषयांवर चर्चा झाली.
विविध प्रकल्पांविषयी बोलतांना डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लद्दाख आणि सीमेलगतच्या प्रदेशांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच लद्दाखमध्ये एक विद्यापीठ, वैद्यकीय महाविद्यालय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे, असेही, ते म्हणाले.
CSIR संस्थेचे महासंचालक डॉ शेखर मांडे लवकरच माथुर यांची भेट घेतील आणि ‘लद्दाख बेरी’नावाने प्रसिध्द असलेल्या लद्दाखच्या वैशिष्ट्यपूर्ण फळ उद्योगाला प्रोत्साहन, प्रक्रिया आणि उद्योग याविषयीच्या प्रकल्पाची माहिती देतील, असेही जितेंद्र सिंह यांनी माथुर यांना सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे, लद्दाखला कार्बनमुक्त करण्यासाठीच्या धोरणाची तयारी आणि आराखड्याविषयी माथुर यांनी डॉ सिंग यांना माहिती दिली. केंद्रशासित सरकार या आराखड्यावर काम करत असून, लवकरच तो तयार करुन उच्च अधिकाऱ्यांसमोर मांडला जाईल, असेही त्यांनी सांगितले. “लद्दाख व्हिजन 2050” या सर्वसमावेशक आराखड्याच्या तयारीविषयी देखील माथुर यांनी माहिती दिली.
लद्दाखच्या विकासासाठी जाहीर करण्यात आलेल्या 50 कोटी रुपयांच्या विशेष पैकेजचा त्यांनी उल्लेख केला. पहिल्यांदाच या प्रदेशासाठी, केंद्र सरकारने इतकी मोठी मदत केली आहे, असेही माथुर म्हणाले.
केवळ लद्दाखच्या विकासासाठी समर्पित असलेला एक आराखडा यावेळी पहिल्यांदाच तयार होणारा आहे. लद्दाखशी संबंधित सर्व मुद्यांविषयी दैनंदिन पाठपुरावा करत सर्व केंद्रीय मंत्रालयांकडून मिळणाऱ्या पाठींब्याविषयी माथुर यांनी जितेंद्र सिंह यांचे आभार मानले.
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1651146)
Visitor Counter : 174