जलशक्ती मंत्रालय
जल जीवन अभियानाद्वारे संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन
Posted On:
03 SEP 2020 3:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 सप्टेंबर 2020
सन 2024 पर्यंत गावातील प्रत्येक घरात नळ जोडणी कार्यरत करण्यासाठी जल जीवन अभियान राज्यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. नियमित आणि दीर्घ मुदतीच्या आधारावर प्रत्येक ग्रामीण घरात पुरेशा प्रमाणात विहित गुणवत्तेचा पिण्यायोग्य पाणीपुरवठा (प्रति दिन प्रति व्यक्ती 55 लिटर पाणीपुरवठा) सुनिश्चित करणे हे या अभियानाचे उद्दीष्ट आहे.
जल जीवन अभियानाचे पहिले वर्ष पूर्ण झाल्यावर 15 ऑगस्ट, 2020 रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला स्वातंत्र्यदिनानिमित्त संबोधित करताना पंतप्रधानांनी जाहीर केले होते कि संपूर्ण देशात या काळात 2 कोटी कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली असून दररोज 1 लाखाहून अधिक कुटुंबांना नळ जोडणी देण्यात येत आहे.
ग्रामीण भागात पेयजल पुरवठा करणे हा एक जटिल विषय आहे कारण त्यात विविध सामाजिक, पर्यावरणीय आणि तांत्रिक आव्हाने आहेत.
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा क्षेत्रासमोर असणाऱ्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आता राष्ट्रीय जल जीवन अभियान नाविन्यपूर्ण उपक्रम आणि संशोधनाला पाठिंबा व प्रोत्साहन देत आहे. प्रभावी उपाययोजनांबरोबरच अधिकाधिक ज्ञान प्राप्तीसाठी या क्षेत्रातील सर्जनशील युवा, संशोधक, शैक्षणिक संस्था, उद्योजक, स्टार्ट-अप्सकडून राष्ट्रीय जल जीवन अभियान प्रस्ताव मागवत आहे. याव्यतिरिक्त,ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्षम, प्रभावी आणि आर्थिकदृष्ट्या व्यवस्थापित करण्यासाठी पुरावा-आधारित तांत्रिक हस्तक्षेपाचा अवलंब करण्याकरिता विभाग / राष्ट्रीय अभियान / राज्य जल व स्वच्छता अभियान कृती संशोधन आणि समांतर मूल्यांकन करेल. जल जीवन अभियानांतर्गत येणारे संशोधन व विकास प्रकल्प हे वैज्ञानिक तसेच संशोधन व विकास संस्था, सर्जनशील व्यक्ती, उद्योजक यांच्यासह भागीदारी वाढवण्यास मदत करतील आणि उपयुक्त ज्ञान निर्मिती करतील ज्याद्वारे पेयजल क्षेत्रातील विविध आव्हानांना तोंड देण्यास मदत होऊन लोकांचे जीवनमान सुधारेल.
संशोधन व विकास मार्गदर्शक तत्वे विभागीय पोर्टल म्हणजे https://jalshakti-ddws.gov.in/.वर उपलब्ध आहेत. सर्व इच्छुक वैयक्तिक / संस्था या संधीचा लाभ घेऊन त्यांचे प्रस्ताव पाठवू शकतात.
B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1650977)
Visitor Counter : 244