पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान यांनी युएसआयएसपीएफ -तिसऱ्या वार्षिक नेतृत्व शिखर परिषदेला संबोधित केले; अमेरिकन कंपन्यांना आत्मनिर्भर भारत अभियानात भागीदारी करण्यासाठी आमंत्रित केले
Posted On:
02 SEP 2020 10:30PM by PIB Mumbai
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि स्टील मंत्री धर्मेंद्र प्रधान आज “नवीन आव्हानांचा प्रवास ” या संकल्पनेवरील यूएसआयएसपीएफ-तिसर्या वार्षिक लीडरशिप शिखर परिषदेत सहभागी झाले.
प्रधान यांनी जागतिक अर्थव्यवस्थेवर कोविड -19 महामारीचा भीषण परिणाम आणि त्यामुळे ऊर्जा मागणीत झालेली घट अधोरेखित केली. ते पुढे म्हणाले की, भारतातील आर्थिक घडामोडीनी हळूहळू वेग घेतल्यामुळे उर्जेचा वापर लवकरच कोविडपूर्व पातळीवर पोहचण्याचा अंदाज आहे.
आत्मनिर्भर भारत अभियानाबाबत बोलताना प्रधान म्हणाले की कोविड -19 आव्हानांना संधीमध्ये रूपांतरित करण्यासाठी, देशांतर्गत उत्पादन आणि वापराला जागतिक पुरवठा साखळीत विलीन करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात सुरू केलेल्या मोहिमेमध्ये स्वयंपूर्ण भारतासाठी आवाहन करण्यात आले असून भारताला एकविसाव्या शतकाच्या जागतिक उत्पादन केंद्रात रूपांतरित करण्याचे उद्दीष्ट आहे.
भारतातील परिवर्तनाची गुरुकिल्ली म्हणून उर्जा या पायाभूत उद्योगाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आणि अमेरिकन उद्योजकांना भारतीय ऊर्जा क्षेत्रात निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित केले.
प्रधान यांनी भारत आणि अमेरिकेदरम्यान वाढत्या द्विपक्षीय हायड्रोकार्बन व्यापाराबद्दल माहिती दिली. आर्थिक वर्ष 2019-20 दरम्यान 9 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या वर हा व्यापार गेला असल्याचे त्यांनी सांगितले. कंपन्या स्पर्धात्मक दरावर अमेरिकेकडून जास्त कच्चे तेल आणि एलएनजी मिळविण्याच्या विचारात असल्यामुळे त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
धोरणात्मक उर्जा भागीदारीत वायू क्षेत्राच्या महत्त्वविषयी ते बोलले. भारत अंदाजे 60अब्ज डॉलर्स गुंतवणूकीसह 2030 पर्यंत उर्जा निर्मिती क्षेत्रातील वायूचा वाटा 6% वरून 15% पर्यंत वाढवून स्वतःला वायू आधारित अर्थव्यवस्थेत रूपांतरित करण्यावर काम करत असून “एक राष्ट्र, एक गॅस ग्रिड” विकसित होईल. बीपी, शेल, टोटल, एक्झोन मोबिल सारख्या जागतिक तेल आणि वायू कंपन्या भारतात विस्तार करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि अमेरिकन कंपन्यांना शोध आणि उत्पादन क्षेत्रातल्या सुधारणांचा फायदा घेण्यासाठी आणि आगामी तेल आणि वायू क्षेत्र बोली प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले.
ते पुढे म्हणाले की जागतिक ऊर्जा बाजार स्थिर करण्यासह भारत आणि अमेरिका घनिष्ट सहकार्याने काम करत आहेत आणि कोविड -19 मुळे उद्भवलेल्या आव्हानांना सामोरे जावे लागले असले तरीही उद्योग क्षेत्रातील नेते दोन देशांमधील उर्जा संबंधांना पुन्हा चालना देण्यासाठी उत्सुक आहेत.
यूएसआयएसपीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मुकेश अघी म्हणाले की, यूएसआयएसपीएफ अमेरिका आणि भारतीय कंपन्यांमध्ये आत्मनिर्भर भारताच्या यशासाठी अधिक सहकार्य करण्यास मदत करेल.
******
G.Chippalkatti/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1650850)
Visitor Counter : 204