रेल्वे मंत्रालय

रेल्वे आणि वाणिज्य तथा उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी DFCCIL अर्थात 'भारतीय मालवाहतूक समर्पित मार्गिका महामंडळ मर्यादित'च्या प्रगतीचा घेतला आढावा


काम स्वीकारून नियत कालमर्यादेपूर्वी/मर्यादेत पूर्ण करू इच्छिणाऱ्या कंत्राटदारांना काही प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या शक्यतेचा DFCCIL करणार विचार

समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या दृष्टीने, दर किलोमीटरवरील प्रकल्पांवर देखरेख आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडून होणारी प्रतिसादात्मक कृती- यांचा एक रिअलटाइम डॅशबोर्ड DFCCIL तयार करणार

या डॅशबोर्डच्या माध्यमातून तक्रारनिवारणाच्या यंत्रणेस संस्थात्मक स्वरूप प्राप्त होणार

राज्यांशी समन्वय साधण्यासह सर्व मुद्द्यांचे निराकरण करण्याची मोहीम राबवणार. मंत्रालयाने यापूर्वीच सर्व संबंधित राज्यांना सदर प्रकल्पाचे काम जलदगतीने करण्याविषयी तसेच समन्वयशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर तोडगा काढण्याविषयी पत्रे लिहिली आहेत

प्रकल्पाच्या साप्ताहिक प्रगतीवर सातत्यपूर्ण देखरेख

Posted On: 01 SEP 2020 5:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर,2020 

 

रेल्वे आणि वाणिज्य तथा उद्योगमंत्री श्री.पियुष गोयल यांनी DFCCIL अर्थात 'भारतीय मालवाहतूक समर्पित मार्गिका महामंडळ मर्यादित'च्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी रेल्वे मंडळ आणि DFCCIL चे वरिष्ठ अधिकारी आणि कंत्राटदार संस्थांचे अधिकारी उपस्थित होते. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष तसेच DFCCIL चे व्यवस्थापकीय संचालकही यात सहभागी झाले होते.

बैठकीत, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाच्या सद्यस्थितीविषयी सादरीकरण केले. 

पश्चिमी मालवाहतूक समर्पित मार्गिकेच्या (1504 मार्ग किमी.) तसेच पूर्वीय मालवाहतूक समर्पित मार्गिकेच्या (1856 मार्ग किमी.) सर्व विभागांमधील कामास गती देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याच्या सूचना गोयल यांनी DFFCIL च्या व्यवस्थापन पथकाला तसेच कंत्राटदारांना दिल्या. या आढावा बैठकीत प्रत्येक विभागाच्या प्रगतीची तपशीलवार चर्चा झाली आणि सर्व अडचणी सोडवून प्रक्रिया सुरळीत पार पडण्याची खबरदारी घेण्याविषयी सूचना देण्यात आल्या. 

प्रकल्पाला गती देण्यासाठी मंत्रिमहोदयांनी काही उपाय सुचविले- जसे-

  1. सर्व कंत्राटदार, विक्रेते आणि पुरवठादार यांच्याबरोबर दर आठवड्यात नियमित बैठका घ्याव्यात. 
  2. काम स्वीकारून नियत कालमर्यादेपूर्वी / त्या मर्यादेत पूर्ण करू इच्छिणाऱ्या कंत्राटदारांना काही प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या शक्यतेवर विचार करावा.
  3. किलोमीटरगणिक प्रकल्प देखरेख आणि गरजेनुसार पुढच्या कृतियोजना यासाठी DFCCIL कडून एक रिअलटाइम डॅशबोर्ड तयार केला जावा. रेल्वे मंडळाच्या अधिकाऱ्यांनाही तो बघता यावा. अशा डॅशबोर्डमुळे कराराच्या अंमलबजावणीसंबंधी सर्व अडचणी ताबडतोब सोडविण्यास उपयोग होईल तसेच करारासंबंधी अडचणी सोडवण्याच्या प्रक्रियेला एक संस्थात्मक यंत्रणाही प्राप्त होईल.

सर्व कंत्राटदारांच्या कामांवर काटेकोर देखरेख झाली पाहिजे, असे या बैठकीत ठरविण्यात आले. राज्यांशी समन्वय साधण्यासह सर्व मुद्द्यांचे निराकरण करण्यासाठी मोहिमेसारखे प्रयत्न केले जावेत, असाही निर्णय यावेळी घेतला गेला. जमीन, रस्तेवाहतुकीसाठीचे पूल, कायदा आणि सुव्यवस्था यासंबंधीचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याविषयी मंत्रालयाने यापूर्वीच संबंधित राज्यांना पत्रे लिहिली आहेत. 

DFC अर्थात, मालवाहतूक समर्पित मार्गिका हा रेल्वेच्या सर्वात मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक आहे. भारत सरकारने हाती घेतलेल्या या मार्गिकेची एकूण लांबी 3360 मार्ग किमी इतकी आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 81,459 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मालवाहतूक समर्पित मार्गिकांचे नियोजन, विकास, आर्थिक तजवीज, बांधकाम, देखभाल आणि प्रचालन यासाठी DFCCIL ची निर्मिती करण्यात आली आहे. 
 

* * *

M.Iyengar/J.Waishampayan/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1650403) Visitor Counter : 169