पंतप्रधान कार्यालय

स्थानिक खेळण्यांना वाव देण्यासाठी त्यांचा प्रसार करण्याची (व्होकल फॉर लोकल होण्याची) वेळ आली आहे - पंतप्रधानांनी ‘मन की बात’ मध्ये व्यक्त केले  मत

Posted On: 30 AUG 2020 6:48PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातया आकाशवाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. विविध विषयांबरोबरच त्यांनी या ताज्या कार्यक्रमामध्ये मुलांच्या खेळण्यांविषयी मनोगत व्यक्त केले. गांधीनगरची चिल्ड्रेन युनिव्हर्सिटी, महिला आणि बाल विकास मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि सूक्ष्म-लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने मुलांसाठी चांगल्या दर्जाची खेळणी कशी बनविणे आवश्यक आहे, याविषयी काम केल्याचे सांगितले. खेळणी निर्मिती, उत्पादनामध्ये भारत एक मोठे केंद्र कसे बनू शकते, याच्याविषयी काम करीत असल्याचे सांगितले. मुलांच्या दृष्टीने खेळणी म्हणजे केवळ वेगवेगळ्या क्रियाकलापांचे साधन नाही, तर बालकांच्या आकांक्षांना पंख लावण्याचे काम खेळणी करतात. खेळण्यांमुळे मुलांचे केवळ मन रमते, मुलांचे मनोरंजन होते, असे नाही, तर खेळणी मुलांच्या मनाची निर्मिती करतात, त्यांना काही करण्याचा हेतू निर्माण करतात, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांनी मुलांच्या खेळण्याविषयी लिहून ठेवलेला किस्साही पंतप्रधानांनी यावेळी सांगितला. गुरूदेवांनी मुलांसाठी कोणते खेळणे चांगले, याविषयी नमूद केले आहे की, जे खेळणे अपूर्ण असते आणि जे खेळणे मुले सर्वजण मिळून खेळत-खेळत पूर्ण करतात, तेच खेळणे, तोच खेळ उत्कृष्ट असते. मुलांचे बालपण अनुभवताना त्यांच्यामधली सर्जनशीलता समोर आणणारे, खेळणे चांगले असते, असेही पंतप्रधान म्हणाले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मुलांच्या जीवनावर खेळण्यांचा विविध पैलूंमधून कसा परिणाम पडतो, याविषयी मोठ्या प्रमाणावर लक्ष देण्यात आले असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. देशाच्या विविध भागामध्ये अतिशय उत्तम खेळणी बनविणारे कुशल कलाकार आहेत, असे सांगून पंतप्रधानांनी अनेक राज्यांमध्ये कुठे-कुठे खेळणी बनविणारे स्थानिक कलाकार आहेत, त्यांची माहिती दिली. याचे उदाहरण देताना त्यांनी कर्नाटकातल्या रामनगरम इथल्या चन्नापटना, आंध्र प्रदेशातल्या कृष्णामधील कोंडापल्ली, तामिळनाडूतल्या तंजावूर, आसाममधल्या धुबारी, उत्तर प्रदेशातल्या वाराणसी या शहरांमध्ये खेळणी निर्मितीची केंद्रे विकसित करण्यात येत असल्याचे सांगितले. खेळण्यांच्या जागतिक बाजारपेठेत 7 लाख कोटींची उलाढाल होते, त्यामध्ये भारताचा सध्या अतिशय अल्प हिस्सा आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

विशाखापट्टणमचे  सी.व्ही. राजू यांनी स्थानिक कलाकारांच्या मदतीने उत्कृष्ट दर्जाचे  इटिकोप्पका खेळणे बनवले आहे, त्याबद्दल पंतप्रधानांनी राजू यांचे कौतुक केले. या परंपरागत स्थानिक खेळण्याला गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त झाली आहे. आता खेळणी निर्मिती क्षेत्रातल्या उद्योजकांनी एकत्र यावे आणि स्थानिक  खेळणी बनविणा-यांना वाव द्यावा, त्यांच्या खेळण्यांचा प्रसार करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, ‘व्होकल फॉर लोकलव्हावे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

संगणकावर खेळण्याचे प्रमाण अलिकडे खूप वाढले आहे, असे नमूद करून त्यांनी आपल्या भारतीय ऐतिहासिक कल्पना आणि संकल्पनांवर आधारित  संगणकांचे खेळ बनविण्याचा सल्ला दिला.

 

M.Chopade/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1649845) Visitor Counter : 199