उपराष्ट्रपती कार्यालय

युवकांमध्ये उद्योजकीय कौशल्याची जोपासना करण्याची उपराष्ट्रपतींची मागणी


आपण सशक्त भारत, स्वाभिमानी भारत आणि आत्मनिर्भर भारताची निर्मिती केली पाहिजे: उपराष्ट्रपती

गांधीजी आमच्यासाठी प्रकाशदीपासारखे, कारण ते सतत नावीन्यपूर्ण प्रयोग करणारे होते : उपराष्ट्रपती

Posted On: 27 AUG 2020 4:40PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती एम वेंकैय्या नायडू यांनी येणाऱ्या काही दिवसांमध्ये भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवण्यासाठी युवकांमध्ये उद्योजकतेची जोपासना करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकाच्या उद्योजकीय आणि तांत्रिक कौशल्याचा आपण उपयोग केला पाहिजे आणि स्वावलंबी होण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात मानवतेची सेवा करण्यासाठी आपल्या स्थानिक संसाधनांचा वापर करणे आवश्यक आहे.

 ते ‘आचार्य विनोबा भावे यांच्याकडून सामाजिक प्रगतीसाठी गांधीजींच्या तत्वज्ञानाचा प्रसार आणि भूदान चळवळीतील योगदान’ याविषयीच्या वेबिनारला संबोधित करत होते. 

विनोबाजी आणि गांधीजी यांच्या स्वप्नातील सशक्त भारत, स्वाभिमानी भारत आणि आत्मनिर्भर भारताची निर्मिती करण्याचे आवाहन करताना उपराष्ट्रपती म्हणाले, भारताची स्वावलंबनाची संकल्पना अतिवादी आणि संरक्षणवादी नाही तर जागतिक कल्याणामध्ये अधिक महत्त्वपूर्ण भागीदार बनण्याची आहे.

गांधीजींच्या सर्वकालीन विचारांविषयी बोलताना ते म्हणाले, गांधीजी आजही प्रकाशदीप म्हणून कार्य करतात, कारण ते सतत नावीन्यपूर्ण प्रयोग करणार होते.  

ते म्हणाले अस्पृश्यतेसारखे आव्हानात्मक कार्य हाती घेण्याचे साहस गांधीजींमध्ये होते. त्यांचा प्रामाणिकपणा आणि जनसेवेप्रती त्यांची करुणा या गुणांचा आम्ही आदर करतो, असे ते म्हणाले.

महात्मा गांधी यांनी 1932 मध्ये पुणे कराराच्या माध्यमातून हरिजन सेवक संघाची स्थापना केली. उपराष्ट्रपती पुढे म्हणाले, पुणे करार हा शोषित वर्गाच्या जीवनाचे कल्याण करण्यासाठी, त्यांच्यामध्ये न्याय आणि सन्मानाची भावना रुजवण्यासाठी श्रद्धा आणि विश्वासाचा करार होता.

उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, आपला स्वातंत्र्यलढा म्हणजे केवळ राजकीय चळवळ नव्हती, तर राष्ट्रीय पुनरुत्थान आणि सामाजिक-सांस्कृतिक प्रबोधनासाठीचा संदेश होता. त्यांच्या मते, नागरिकांचे सक्षमीकरण हा आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा मुख्य घटक होता आणि गांधीजींची इच्छा होती की, वसाहतवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी भारताने एकजूट राहावे, आपली संस्कृती, भाषेचा अभिमान बाळगावा आणि अंतर्निहित शक्तीचा शोध घ्यावा.

आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीबद्दल बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले, गांधीजींप्रमाणेच विनोबा भावे यांनी जबरदस्तीशिवाय, हिंसेविना बदल घडवून आणला आणि हे सिद्ध केले की लोकांच्या सक्रिय सहभागातून सकारात्मक, चिरस्थायी बदल शक्य आहेत.

विनोबाजींनी 14 वर्षे 70,000 किलोमीटरचा दीर्घ प्रवास करुन भूमीहीन शेतकऱ्यांना 42 लाख एकर जमीन मिळवून दिली. उपराष्ट्रपतींनी सांगितले की, पोछमपल्ली येथील वेदिर रामचंद्र रेड्डी हे विनोबाजींच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन 100 एकर जमीन दान करणारे पहिले व्यक्ती होते.

कोविड -19 चा संदर्भ देताना उपराष्ट्रपती म्हणाले, या कठीण काळात आपण एकत्रित येऊन प्रयत्न करुया, केवळ विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून नाही तर टाळेबंदीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठी गांधीवादी मार्गाने सुकर आणि समाधानाचा मार्ग काढण्याची गरज आहे. “अशा प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीतच मनुष्याला उदात्त अभिव्यक्तीचा शोध लागतो”, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

***

M.Copade/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1648953) Visitor Counter : 296