सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

खादी हे ब्रांड नाव वापरल्या प्रकरणी केव्हीआयसीने “खादी इसेन्शिअल” आणि “खादी ग्लोबल” ला कायदेशीर नोटीस बजावली

Posted On: 21 AUG 2020 5:32PM by PIB Mumbai

 

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी), “अनधिकृतपणे व “लबाडीपूर्वक” खादी हे नाव वापरल्या प्रकरणी “खादी इसेन्शिअल” आणि “खादी ग्लोबल” या दोन कंपन्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. दोन्ही कंपन्या 'खादी' या ब्रँड नावाचा वापर करून विविध ई-कॉमर्स व्यासपीठावरून अनेक सौंदर्यवर्धक (कॉस्मेटिक) आणि सौंदर्य प्रसाधनांची विक्री करीत आहेत आणि त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचे केव्हीआयसीने आज एका निवेदनात म्हटले आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात खादी इसेन्शिअल आणि खादी ग्लोबल या दोन्ही कंपन्यांना बजावलेल्या नोटिसांमध्ये केव्हीआयसीने त्यांना अनुक्रमे www.khadiessentials.com आणि www.khadiglobalstore.com ही डोमेन नावे रद्द करून “खादी” या ब्रँड नावाने करत असलेली उत्पादनांची विक्री तत्काळ थांबविण्यास सांगितले आहे. तसेच ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनटेरेस्ट अशा वेगवेगळ्या व्यासपीठावरील या दोन्ही कंपन्यांची सोशल मीडिया हँडल बंद करण्याचे सांगितले आहे.

खादी इंडिया व्यतिरिक्त “खादी” हा ट्रेडमार्क केवळ अधिकृत परवानाधारक किंवा फ्रेंचायझी धारकच वापरु शकतो, असे या नोटिसमध्ये नमूद केले आहे. “केव्हीआयसीच्या उत्पादनांसारख्या उत्पादनांसाठी जर हा ट्रेडमार्क वापरला तर निःसंशयपणे बाजारात गोंधळ निर्माण होऊन ग्राहकांची फसवणूक होईल.

खादी या ब्रँड नावाचा वापर करून विक्री करत असलेल्या उत्पादनांची विक्री त्वरित थांबवावी आणि अनुक्रमे खादी ईसेन्शियल्स आणि खादी ग्लोबल या ब्रँड नाव असलेल्या उत्पादनाचे पॅकेजिंग, लेबल, प्रसिद्धी साहित्य, साइनबोर्ड आणि अन्य कोणतीही व्यावसायिक सामुग्री त्वरित नष्ट करावी, असे या दोन्ही कंपन्यांना कठोरपणे सांगण्यात आले आहे. सात दिवसांत सूचनांचे पालन न झाल्यास कंपन्यांविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असे केव्हीआयसीने म्हंटले आहे.

27 जुलै रोजी केव्हीआयसीने चंदीगड येथील एका व्यक्तीविरूद्ध खादी फेस मास्क म्हणून अनधिकृतपणे फेस मास्क विक्री केल्याबद्दल आणि पंतप्रधानांचे छायाचित्र पाकिटावर वापरल्याबद्दल एफआयआर दाखल केली. यापूर्वी, यावर्षी मे महिन्यात खादी या ब्रँड नावाने बनावट पीपीई किट विक्री करण्या प्रकरणी केव्हीआयसिने दिल्लीस्थित तीन कंपन्यांना कायदेशीर नोटीस बजावली होती.

***

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1647637) Visitor Counter : 191