रसायन आणि खते मंत्रालय

औषधनिर्मिती क्षेत्रात स्वदेशी निर्मितीक्षमता विकसित करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी औषधनिर्मिती विभागाकडून अनेक उपाययोजना- डी व्ही सदानंद गौडा


देशभरात तीन बल्क ड्रग पार्क आणि चार मेडिकल डिव्हाईस पार्क उभारण्यासाठी सरकारकडून योजनांची सुरुवात

बल्क ड्रग पार्क आणि मेडिकल डिव्हाईस पार्कमुळे 77900 कोटी रुपयांची आवर्ती गुंतवणूक अपेक्षित, 2,55,00 0 रोजगार निर्मितीची अपेक्षा : श्री गौडा

Posted On: 20 AUG 2020 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 ऑगस्‍ट 2020

 

देशातील औषधनिर्मिती क्षेत्रात स्वदेशी औषधनिर्मिती क्षमता विकसित करणारे पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आपल्या औषधनिर्मिती विभागाने अनेक पावले उचलली असल्याचे केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांनी सांगितले. भारताचे औषधनिर्मिती क्षेत्र ही केवळ देशासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी बहुमूल्य मालमत्ता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच सांगितले असल्याचे गौडा म्हणाले. या क्षेत्राने औषधांच्या किंमती कमी करण्यामध्ये विशेषतः विकसनशील देशांमध्ये औषधांचे दर कमी करण्यामध्ये आघाडीची भूमिका बजावली आहे असे त्यांनी सांगितले.

ते आज सीआयआयच्या 12 व्या “मेडटेक ग्लोबल समिट चार्टिंग द मेडटेक रूट टू आत्मनिर्भर भारत” या परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. भारताची औषध सुरक्षा बळकट करण्यासाठी या क्षेत्रात आत्मनिर्भरता निर्माण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे ते म्हणाले. देशभरात तीन बल्क ड्रग पार्क आणि चार मेडिकल डिव्हाईस पार्क उभारण्यासाठी सरकारने योजना सुरू केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या पार्कमध्ये सामायिक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी केंद्राकडून मदत पुरवण्याव्यतिरिक्त या पार्कमधील बल्क ड्रग आणि वैद्यकीय उपकरण उत्पादकांना केंद्र सरकार उत्पादन संबंधित प्रोत्साहन भत्ते देखील देणार आहे.

2021-22 ते 2025-26 या पाच वर्षांच्या काळात वाढीव विक्रीवर सरकार पाच टक्के दराने प्रोत्साहन भत्ता देईल, असे गौडा यांनी सांगितले. त्यासाठी सुमारे 3420 कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या योजनेंतर्गत उद्योगांची निवड करण्यासाठी मूल्यमापन करण्याचे निकष या विभागाने 27 जुलै 2020 रोजी जारी केले आहेत. यासंदर्भात अर्ज करण्यासाठी 120 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या योजनेचा फायदा घेण्याची कंपन्यासाठी ही योग्य वेळ आहे, असे ते म्हणाले.

उत्पादनासाठी प्रोत्साहन भत्ते देणे आणि सामायिक पायाभूत सुविधांची निर्मिती करणे या दुहेरी धोरणामुळे जास्त उत्पादन खर्च नियंत्रित होणार आहे. यामुळे देशी कंपन्यांना त्यांच्या परदेशी स्पर्धक कंपन्याप्रमाणे सक्षम होता येणार आहे आणि त्यांच्या उत्पादनांना आणि एकंदर विकासाला वाव मिळेल, अशी अपेक्षा गौडा यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या योग्य धोरणांमुळे केवळ दोन- तीन वर्षातच औषधनिर्मिती क्षेत्र आत्मनिर्भर बनेल. केवळ देशांतर्गत मागणीची पूर्तता करण्यामध्येच नव्हे तर जागतिक पातळीवर उच्च दर्जाची औषधे आणि उपकरणे यांच्या मागणीची किफायतशीर दरांमध्ये पूर्तता करण्यामध्ये हे क्षेत्र सक्षम बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बल्क ड्रग आणि मेडिकल डिव्हाईस पार्कसाठी सुमारे 77900 कोटी रुपयांची संचयी गुंतवणूक अपेक्षित असून त्यामुळे सुमारे 2,55,000 रोजगारांची निर्मिती होईल, अशी माहिती गौडा यांनी दिली. एकट्या वैदयकीय उपकरण क्षेत्रातच सुमारे 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होऊन 1,40,000 नव्या रोजगारसंधी निर्माण होतील, असे त्यांनी नमूद केले.

 

* * *

B.Gokhale/S.Patil/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1647382) Visitor Counter : 133