शिक्षण मंत्रालय

विद्यार्थ्यांसाठीच्या ज्ञानवर्धक मार्गदर्शक सूचनांचे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते आभासी स्वरूपात उद्‌घाटन

Posted On: 19 AUG 2020 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2020

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’ यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत विद्यार्थ्यांच्या ज्ञानवर्धक मार्गदर्शक सूचनांचे आभासी स्वरुपात उद्‌घाटन झाले. यावेळी बोलतांना पोखरियाल यांनी सांगितले की, सध्याच्या कोविड आजाराच्या परिस्थितीत, शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील विविध संस्थांनी एकत्र येऊन डीजीटल माध्यमांच्या मदतीने विद्यार्थ्यांपर्यंत शालेय शिक्षण पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका, प्राज्ञ मार्गदर्शक सूचना, डिजिटल शिक्षण अहवाल, निष्ठा- ऑनलाईन असे दस्तऐवज म्हंजे, शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुरु ठेवणारे उपक्रमच आहेत, असे ते म्हणाले. 

पर्यायी मार्गांनी विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचवण्याच्या या प्रयत्नांत, ज्या विद्यार्थ्यांकडे डिजिटल साधने नाहीत, त्यांच्यापर्यंत शिक्षण कसे पोहचवयाचे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.त्याशिवाय, सर्वांकडे डिजिटल साधने उपलब्ध नसल्याने, सर्वांना घरी समान शिक्षण मिळणे कठीण झाल्यामुळें, सर्वसमावेशक आणि समान शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांच्या हक्काचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता.

हे सर्व मुद्दे लक्षात घेत NCERT ने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार, सध्याच्या काळात आणि भविष्यासाठीही, विद्यार्थ्यांच्या ज्ञानवर्धन विषयक मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत.

या मार्गदर्शक सूचना, मॉडेल्स खालील तीन प्रकारच्या परिस्थितीत उपयुक्त ठरतील.

एक, जर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कुठलीही डिजिटल साधने उपलब्ध नसतील तरदुसरे म्हणजे, जिथे विद्यार्थ्यांना मर्यादित स्वरूपात डिजिटल साधने उपलब्ध असतील तर, आणि तिसरे म्हणजे, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी डिजिटल साधने उपलब्ध असतील तर.

या मार्गदर्शक सूचना, तयार करताना शाळांची मदत घेण्यात आली असून, त्यात शाळांकडून वर्कबुक्स, वर्कशीट्स इत्यादी साहित्य विद्यार्थ्यांना शिक्षक आणि स्वयंसेवकांकडून त्यांच्या घरी पुरवले जाणार आहे. त्यासोबतच, त्यांना शिक्षण देण्यासाठी, सामुदायिक केंद्रांमध्ये टीव्ही लावून शारीरिक अंतर पाळत, घरी डिजिटल सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जावे, अशी सूचनाही देण्यात आली आहे.

या मार्गदर्शक सूचनांमध्ये सामुदायिक केंद्रांमध्ये मदत क्रमांक सुरु करण्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यासाठी समुदाय केंद्र आणि ग्रामपंचायतींची मदत घेतली जावी. त्याशिवाय पालकांची विद्यार्थ्यांना मदत व्हावी, यासाठी त्यांनाही मार्गदर्शन करण्याची शिफारस यात करण्यात आली आहे, असे पोखरियाल यांनी सांगितले. वरील तिन्ही परिस्थितीमध्ये, पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिकेचा वापर आणि अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय विद्यालय संगठन, नवोदय विद्यालय समिती आणि सीबीएसई च्या शाळांमध्ये किती विद्यार्थ्याकडे डिजिटल सुविधा उपलब्ध आहेत याचे सर्वेक्षण केल्यानंतर, या शिफारसी करण्यात आल्या आहेत.

या मार्गदर्शक सूचना, डिजिटल साधनांपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी उपयुक्त ठरतील, असे पोखरीयाल यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसाठीच्या ज्ञानवर्धक मार्गदर्शक सूचना वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1647112) Visitor Counter : 310