कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

राष्ट्रीय भरती यंत्रणा स्थापन करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय ऐतिहासिक :- केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह


राष्ट्रीय भरती यंत्रणेमुळे केंद्र सरकारच्या नोकऱ्यांसाठीच्या पदभरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल : केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

एनआरए यंत्रणा उमेदवाराची सुविधा आणि आर्थिक अपव्यय टाळण्यासाठीची एकत्रित व्यवस्था : केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

प्रत्येक जिल्ह्यात सामाईक पात्रता परीक्षा केंद्राच्या स्थापनेमुळे ग्रामीण भागातील युवक, महिला आणि वंचितांना विनासायास परीक्षा सुविधा उपलब्ध होणार

एनआरए मार्फत मॉक टेस्ट, चोवीस तास मदतकक्ष आणि तक्रार निवारण पोर्टलची व्यवस्था

Posted On: 19 AUG 2020 7:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2020

 

सामाईक पात्रता परीक्षा घेण्यासाठी राष्ट्रीय भरती यंत्रणा स्थापन करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, केंद्र सरकारच्या पदभरती प्रक्रीयेसाठी ऐतिहासिक, द्रष्टा आणि क्रांतीकारक असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.

नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी सांगितलं की या निर्णयामुळे सरकारी पदभरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल होणार आहेत. बहु-यंत्रणा अंतर्भूत असलेल्या राष्ट्रीय भरती यंत्रणेमार्फत आता ब’ आणि ‘क’श्रेणीतील (सामान्य) पदभरतीसाठी पहिल्या फेरीत पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी एकच सामाईक पात्रता परीक्षा (CET) घेतली जाईल. आणि यामार्फत, सर्व उमेदवारांना एकसमान संधी दिली जाईल.

या निर्णयामुळे केवळ भरती प्रक्रिया आणि उमेदवारांची निवड सुलभ होणार नाही, तर, सर्वसामान्य लोकांच्या जीवनमानातही सुलभता येईल, कारण देशातील प्रत्येक जिल्ह्यात यासाठी सामाईक परीक्षा केंद्र स्थापन केले जाणार आहे. या सुधारणेमुळे गावातल्या, दुर्गम भागातल्या उमेदवारांना  परीक्षेसाठी दूरवर प्रवास न करता आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणीच परीक्षा देता येईल. विशेषतः मुलींना या सुधारणेचा अधिक लाभ मिळेल, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

एनआरए पुढच्या वर्षी अस्तित्वात येईल आणि त्याचे मुख्यालय दिल्लीत असेल, अशी माहिती त्यांनी दिली. सहकारी संघराज्य पद्धतीनुसार, राज्य सरकारांनीही या व्यवस्थेचा भाग व्हावे, असे आवाहन सर्व राज्य सरकारांना केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. येत्या काळात खाजगी क्षेत्रे देखील या यंत्रणेत सहभागी होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. एनआरए मध्ये रेल्वे मंत्रालय, अर्थमंत्रालय/वित्तीय सेवा विभाग, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि बँकिंग परीक्षा बोर्डाचे प्रतिनिधी असतील.  केंद्र सरकारच्या भरती प्रक्रियेत, एनआरए मुळे अद्ययावत तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम आधुनिक पद्धती आणल्या जाण्याची योजना आहे.

एनआरए अंतर्गत एका वर्षात दोनदा परीक्षा घेतल्या जातील आणि या परीक्षेत उमेदवाराने मिळवलेले गुण तीन वर्षे ग्राह्य धरले जातील. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त देशातील 12 प्रमुख प्रादेशिक भाषांमधेही ही परीक्षा घेतली जाईल. तसेच, राज्यघटनेच्या आठव्या कलमात समाविष्ट असलेल्या सर्वच भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यासाठी भविष्यात प्रयत्न केले जातील.

आतापर्यंत होणाऱ्या विविध भरती परीक्षा उमेदवारांवर दडपण आणणाऱ्या होत्या. त्याचवेळी विविध यंत्रणानाही तीच ती प्रक्रिया करावी लागत असल्याने, त्यांच्या कार्यशक्तीचा आणि पैशाचा अपव्यय होत होता.

साधारणपणे दरवर्षी 2.5 ते 3 कोटी उमेदवार या पदांसाठीच्या परीक्षा देतात. मात्र या सामाईक पात्रता परीक्षेमुळे उमेदवारांना एकदाच परीक्षा द्यावी लागेल आणि त्यानंतर ते पुढच्या उच्च परीक्षेसाठी एका किंवा इतर यंत्रणांच्याही परीक्षा देण्यासाठी अर्ज करु शकतील, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले.   

 

 एनआरएच्या इंग्रजी माहितीसाठी येथे क्लिक करा

एनआरएच्या  हिंदी माहितीसाठी येथे क्लिक करा

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1647044) Visitor Counter : 157