अल्पसंख्यांक मंत्रालय
केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या मोफत शिकवणी वर्ग सुविधेचा लाभ घेत, नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या युवकांचा मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते सत्कार
Posted On:
18 AUG 2020 7:21PM by PIB Mumbai
केंद्र सरकारने गुणवत्तेला प्रोत्साहन, चालना आणि विकासासाठी उचललेल्या महत्वाच्या पावलांचा परिणाम आता दिसू लागला असून, अल्पसंख्याक मंत्रालयाच्या ‘नई उडान’ योजनेचा लाभ घेत, मोफत शिकवणीची सुविधा मिळवणारे अल्पसंख्याक वर्गातील 22 युवक यंदा देशाच्या सर्वात प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून सनदी सेवेत दाखल झाले आहेत, असे प्रतीपादन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले.

आज नवी दिल्लीत अंत्योदय भवनात, 2019 या वर्षात, यशस्वी विद्यार्थ्यांचा नक्वी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. अल्पसंख्याक समुदायाच्या युवकांमध्ये गुणवत्तेची कमतरता नाही, मात्र, याआधी कधीच त्यांच्यातल्या या गुणवत्तेला पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला नाही, त्यांच्या प्रतिभेचा सन्मान कोणी केला नाही, असे नक्वी म्हणाले.
आमच्या सरकारने कोणताही भेदभाव न करता, गुणवत्तेचा सन्मान आणि अल्पसंख्याक समुदायाचे सशक्तीकरण करण्यासाठी अनेक पावले उचललीत, त्याचाच परिणाम म्हणून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अल्पसंख्याक समुदायाचे युवक सर्वोच्च प्रशासनिक नोकऱ्यांमध्ये निवडले जात आहेत. यंदा देखील 145 पेक्षा जास्त अल्पसंख्याक युवक सनदी सेवांमध्ये निवडले गेले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हा आकडा सातत्याने वाढतो आहे. युपीएससी सारख्या परीक्षांमध्ये निवडले गेलेले हे युवक, अल्पसंख्याक आणि दुर्बल घटकांसाठी ‘आदर्श’ ठरणार आहेत, असे नक्वी यावेळी म्हणाले.
मंत्रालयाच्या ‘नई उड़ान’, ‘नया सवेरा’ या योजनांतर्गत, गरीब, दुर्बल, मागास अल्पसंख्य विद्यार्थ्यांना सनदी सेवा परीक्षा, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी परीक्षा, बँकिंग सेवा अशा परीक्षांसाठी मोफत शिकवणी सुविधा दिली जाते, अशी माहिती नक्वी यांनी दिली.
नक्वी यांनी यावेळी सांगितलं की सरकारच्या सर्वसमावेशक विकासाच्या उद्दिष्ट आणि कृतीचा परिणाम म्हणूनच, 2014 नंतरच्या सहा वर्षात 4 कोटी 60 लाख अल्पसंख्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. 2014 च्या आधी केवळ 2 कोटी 94 लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला होता. यातही मुलींचे प्रमाण 50 टक्यांहून अधिक आहे असे ते म्हणाले.
गेल्या सहा वर्षात ‘पंतप्रधान जन विकास योजनेअंतर्गत, मागास आणि अल्पसंख्याक बहुल लोकवस्तीच्या भागात 34 हजारपेक्षा अधिक शाळा-महाविद्यालये, रुग्णालये, होस्टेल, समुदाय केंद्र, सामाईक सेवा केंद्र, हुनर हब अशा विविध योजना अमलात आणल्या गेल्या, असेही ते म्हणाले.


*****
B.Gokhale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1646765)