नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

आयएसए पुढील महिन्यात पहिल्या जागतिक सौर तंत्रज्ञान शिखर परिषदेत अद्ययावत, पुढील पिढीचे तंत्रज्ञान प्रदर्शित करणार


आयएसएचे सर्व सदस्य देश आणि जागतिक संस्था यात सहभागी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी उदघाटनपर भाषण करतील

Posted On: 17 AUG 2020 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्‍ट 2020

 

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे (आयएसए) सभेचे अध्यक्ष आणि केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा  (स्वतंत्र कार्यभार ) आणि कौशल्य विकास व उद्यमशीलता राज्यमंत्री आर.के. सिंह यांनी 08 सप्टेंबर 2020 रोजी आभासी व्यासपीठावर आयएसएतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या जागतिक सौर तंत्रज्ञान शिखर परिषदेबाबत माहिती दिली. अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच पुढील पिढीच्या तंत्रज्ञानावर प्रकाशझोत आणणे हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट असून यामुळे  सौर ऊर्जेचा अधिक कार्यक्षमतेने वापर करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळेल. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सौर उर्जेवर आयएसए जर्नल (I JOSE) देखील सुरू करणार आहे जे या कार्यक्रमादरम्यान जगभरातील लेखकांना सौरऊर्जेवर त्यांचे लेख प्रकाशित करण्यात मदत करेल. या जर्नलमधील लेखांचा जागतिक तज्ज्ञांकडून आढावा घेतला  जाईल आणि आयएसएच्या व्यापक एनएफपी (नॅशनल फोकल पॉईंट्स) आणि स्टार (सौर तंत्रज्ञान आणि अनुप्रयोग संसाधन केंद्रे) केंद्रांच्या नेटवर्कच्या माध्यमातून ते  सदस्य देशांपर्यंत पोहोचतील.

आयएसएच्या सर्व प्रांतातील सदस्य देशांचे मंत्री सहभागी होणाऱ्या या पहिल्या जागतिक सौर तंत्रज्ञान शिखर परिषदेत पंतप्रधान  नरेंद्र मोदी  उद्घाटन भाषण करतील.  वैज्ञानिक संशोधन आणि विकास जगतातील  उच्च स्तरावरचे  मान्यवर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देखील यात सहभागी होणार असून कमी किमत, नाविन्यपूर्ण आणि परवडणाऱ्या सौर तंत्रज्ञानावर यावेळी चर्चा होईल.  उद्घाटन सत्रात वरिष्ठ सरकारी पदाधिकारी, जागतिक कंपन्यांचे प्रमुख, वित्तीय व बहुपक्षीय संस्था, नागरी संस्था, फाउंडेशनचे प्रमुख आणि विचारवंत  उपस्थित राहतील.

नोबेल पुरस्कार विजेते डॉ. एम. स्टेनली व्हिटिंगहॅम यांचे उद्घाटन समारंभात बीजभाषण होईल. लिथियम आयन बॅटरीच्या क्रांतिकारक शोधासाठी डॉ. एम. स्टॅनले व्हिटिंगहॅम यांना 2019  मध्ये रसायनशास्त्रातील (जॉन बी गुडइनफ आणि अकिरा योशिनो यांच्यासह संयुक्तपणे) नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. अव्वल  जागतिक महामंडळांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर देखील एक महत्वाचे सत्र होणार आहे. तंत्रज्ञान आणि वित्त खर्च कमी करणे आणि त्याद्वारे  1000 गिगावॅट सौरऊर्जा  तैनात करण्याची सुविधा  आणि सदस्य देशांमध्ये 2030 पर्यंत 1,000 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक संसाधने सौर उर्जासाठी एकत्रित करणे हे आयएसए या क्रियाशील  संस्थेचे उद्दिष्ट आहे. तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि विकास, आर्थिक संसाधने आणि साठवणूक तंत्रज्ञानाचा विकास, व्यापक  उत्पादन आणि नवकल्पना यांनी युक्त परिपूर्ण परिसंस्था सक्षम करणे ही आयएसएची कल्पना आहे. तंत्रज्ञानाची किंमत कमी झाल्यामुळे जास्तीत जास्त महत्वाकांक्षी सौर उर्जा कार्यक्रम हाती घेता येतील. सौर ऊर्जा हा परवडणाऱ्या  आणि विश्वासार्ह ऊर्जेचा  मुख्य स्त्रोत आहेत हे लक्षात घेऊन, यशस्वी प्रकल्प अंमलबजावणी सार्वत्रिक उर्जा प्रसार लक्ष्य (एसडीजी 7) साध्य करण्यात  महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. आयएसएमध्ये  67 देश आहेत.

केंद्रीय ऊर्जा आणि  नवीन व नवीकरणीय ऊर्जा (स्वतंत्र कार्यभार ) आणि कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री आणि  आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सभेचे अध्यक्ष, आर. के. सिंह यांनी पहिल्या सौर तंत्रज्ञान शिखर परिषदेची संकल्पना मांडल्याबद्दल  आयएसएचे अभिनंदन केले.


* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1646531) Visitor Counter : 210