राष्ट्रपती कार्यालय

अटलबिहारी वाजपेयी यांच्या तैलचित्राचे राष्ट्रपतींकडून आयसीसीआर मुख्यालयात अनावरण

Posted On: 16 AUG 2020 3:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2020

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) मुख्यालयात आज (16 ऑगस्ट 2020) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या तैलचित्राचे आभासी पद्धतीने अनावरण केले. परराष्ट्रमंत्री असताना अटलबिहारी वाजपेयी यांनी मार्च 1977 ते ऑगस्ट 1979 या कालावधीत आयसीसीआरचे माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाले,  "आज या आभासी सोहळ्याच्या माध्यमातून भारताच्या राजकारणात भव्यदिव्य अध्याय रचणाऱ्या अतिशय प्रतिभासंप्पन्न देशाभिमानी व्यक्तीला अभिवादन करीत आहोत". ते म्हणाले कि अटलजी उदारमतवादी विचारसरणीसाठी आणि लोकशाही आदर्शांसाठी नेहमी कटिबद्ध होते. पक्षाचे कार्यकर्ते, खासदार, संसदेच्या महत्त्वपूर्ण स्थायी समित्यांचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, परराष्ट्रमंत्री आणि पंतप्रधान अशा विविध भूमिकांमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वाची अमिट छाप सोडली. राष्ट्रहित नेहमीच सर्वश्रेष्ठ असते ही शिकवण अटलजी यांनी त्यांच्या आचरणाने सर्व राजकीय पक्ष आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय लोकांना दिली होती.

आज कोविड -19 मुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे. परंतु या महामारीतून सावरल्यानंतर आपण प्रगती व समृद्धीच्या मार्गावर वेगाने जाऊ आणि 21 वे शतक भारताचे शतक बनविण्याचे अटलजींचे स्वप्न साकार करण्यात आपण यशस्वी होऊ असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला.

तत्पूर्वी आज सकाळी राष्ट्रपतींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या सदैव अटल या स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली.

राष्ट्रपतींचा संदेश वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1646279) Visitor Counter : 180