अंतराळ विभाग
चांद्रयान-दोन ऑर्बिटरने चंद्रावरील 'साराभाई क्रेटर' या खळग्याची छायाचित्रे मिळवल्याची घोषणा करत डॉ.विक्रम साराभाई यांना इस्त्रोचे अभिवादन
Posted On:
14 AUG 2020 9:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2020
भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पूर्ततेबद्दल साराभाई यांना अभिवादन करण्यासाठी इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एका अनोख्या मार्गाचा अवलंब केला आहे. चांद्रयान दोन या ऑर्बिटरने चंद्रावरील 'साराभाई क्रेटर' या खळग्याची छायाचित्रे मिळवल्याची घोषणा करत इस्रोने साराभाई यांना अभिवादन केले असल्याची माहिती केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, पेन्शन, अणुउर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.
12 ऑगस्ट 2020 रोजी या जन्मशताब्दी वर्षाची सांगता झाली आणि इस्रोने या कामगिरीच्या माध्यमातून साराभाई यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत अभिवादन केले आहे. इस्रोने अलीकडच्या काही वर्षात केलेल्या काही महत्त्वाच्या कामगिरींमुळे अंतराळ क्षेत्रात भारत आघाडीच्या देशांच्या पंक्तीत पोहोचला आहे आणि साराभाई यांनी पाहिलेल्या स्वप्नाची ही पूर्तता आहे, असे जितेंद्र सिंह म्हणाले.
विक्रम साराभाई यांचे नाव चंद्रावरील एका खळग्याला देण्यात आले आहे आणि ज्या जागी अपोलो 17 आणि लुना 21 ही याने उतरली होती त्या जागेपासून सुमारे 250 ते 300 किलोमीटर अंतरावर हा खळगा आहे.
देशाच्या 74व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारताच्या वैभवशाली अंतराळ प्रवासात इस्रोने आणखी एका दिमाखदार कामगिरीची भर घातल्याचे वृत्त खरोखरच भावना उचंबळून आणणारे आहे. अंतराळ क्षेत्रातील या प्रवासाची सुरुवात सहा दशकांपूर्वी विक्रम साराभाई आणि त्यांच्या टीमने अनेक प्रकारच्या आव्हानांना तोंड देत अतिशय धाडसाने केली होती. आज भारतीय अंतराळ मोहिमांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचा उपयोग ते देश करत आहेत ज्यांनी आपल्या अंतराळ प्रवासाची सुरुवात आपल्या कितीतरी आधी केली होती हे ऐकल्यावर प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने आणि आत्मविश्वासाने भरून येईल, असे जितेंद्र सिहं यांनी सांगितले.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार साराभाई क्रेटरच्या थ्री डी छायाचित्रामध्ये हा खळगा सुमारे 1.7 किलोमीटर खोल असल्याचे दिसत आहे आणि त्याच्या भिंतींचा उतार 25 ते 30 अंश आहे. या निष्कर्षांमुळे अंतराळ शास्त्रज्ञांना चंद्राच्या पृष्ठभागावरील लाव्हा भरलेल्या भागाची प्रक्रिया समजून घ्यायला आणखी जास्त मदत मिळणार आहे. चांद्रयान-2 त्याच्या निर्धारित रचनेनुसार काम करत आहे आणि अतिशय महत्त्वाची शास्त्रीय माहिती पाठवत असल्याचेही इस्रोने सांगितले आहे. जागतिक वापरासाठी चांद्रयान दोनकडून ऑक्टोबर 2020 पासून शास्त्रीय माहिती सार्वजनिक करण्यात येणार आहे.
* * *
B.Gokhale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1645947)
Visitor Counter : 255