अर्थ मंत्रालय

अर्थमंत्र्यांनी घेतली केंद्रिय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या भांडवली खर्चावरील तिसरी आढावा बैठक

Posted On: 14 AUG 2020 5:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्‍ट 2020


केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सितारामन यांनी आज नौवहन मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, गृहनिर्माण व नागरी व्यवहार, संरक्षण आणि दूरसंचार विभागाच्या मंत्रालयांचे सचिव आणि या मंत्रालयांशी संबंधित 7 केंद्रिय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या (सीपीएसई) व्यवस्थापकीय संचालकांसमवेत आर्थिक वर्षाच्या भांडवली खर्चाचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली होती. कोविड – 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक विकासाला गती देण्यासाठी अर्थमंत्री विविध भागधारकांसोबत असलेल्या बैठकींच्या शृंखलेचा एक भाग म्हणून ही तिसरी आढावा बैठक होती.

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये या सात सीपीएसईंसाठी 1,24,825 कोटी रुपयांच्या एकत्रित भांडवली खर्चाचे लक्ष्य आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये या सात सीपीएसईंसाठी 1,29,821 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाच्या उद्दिष्टांच्या तुलनेत 1,14,730 कोटी रुपये म्हणजेच 88.37% भांडवली खर्च झाला. आर्थिक वर्ष 2019-20 च्या पहिल्या तिमाहीत 20,172 कोटी रुपये (15.53%) आणि आर्थिक वर्ष 2020-21 च्या माहे जुलै 2020 पर्यंत 24,933 कोटी रुपये (20%) भांडवली खर्च झाला.

वर्ष 2020-21 च्या दुसऱ्या तिमाही पर्यंत एकूण भांडवलाच्या 50% पर्यंत भांडवली खर्च सुनिश्चित करण्यासाठी नियोजन करण्यासहीत अर्थमंत्र्यांनी सचिवांना सीपीएसईंच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना देण्यासाठी सीपीएसईच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख करताना अर्थमंत्र्यांनी, सीपीएसईंना लक्ष्य साध्य करण्यासाठी अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि वर्ष 2020-21 साठी त्यांना देण्यात आलेला भांडवली खर्च योग्य पद्धतीने आणि वेळेत खर्च होईल हे सुनिश्चित केले. अर्थमंत्री म्हणाल्या की, सीपीएसईच्या चांगल्या कामगिरीमुळे कोविड-19 च्या प्रभावापासून अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी मिळण्यास मदत होईल.

कोविड-19 मुळे उद्भवलेल्या समस्यांविषयी सीपीएसईंनी चर्चा केली. अर्थमंत्र्यांनी नमूद केले की असाधारण परिस्थिती हाताळण्यासाठी असाधारण प्रयत्नांची आवश्यकता असते आणि एकत्रित प्रयत्नांच्या सहाय्याने आपण केवळ चांगली कामगिरीच नाही तर भारतीय अर्थव्यवस्थेलाही चांगले परिणाम साध्य करण्यासाठी मदत देखील करू शकतो.


* * *

B.Gokhale/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1645937) Visitor Counter : 156