राष्ट्रपती कार्यालय
74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाचे माननीय राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद यांनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण
Posted On:
14 AUG 2020 8:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2020
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
नमस्कार !
1. देशाच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सर्व देशवासियांना आणि देशाबाहेर असलेल्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतांना मला अत्यंत आनंद होत आहे. 15 ऑगस्ट या दिवशी झेंडावंदन करणे, स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होणे आणि देशभक्तीपर गीते ऐकणे या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नवे चैतन्य घेऊन येणाऱ्या असतात. यादिवशी, देशातील युवकांना, आपण स्वतंत्र भारताचे नागरिक असल्याबद्दल विशेष अभिमान वाटायला हवा. ज्यांच्या बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे राहू शकतो आहोत, अशा सर्व स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांचे आज आपण कृतज्ञ स्मरण करतो.
2. आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या मूल्यांनी आधुनिक भारताचा भक्कम पाया रचला आहे. आपल्या द्रष्ट्या नेत्यांनी बहुविध विचार एकत्र करुन, देशात राष्ट्रीयत्वाची समान उर्जा निर्माण केली. जुलमी दडपशाहीच्या परदेशी राजवटीतून भारतमातेला स्वतंत्र करण्याच्या आणि तिच्या सुपुत्रांचेभविष्य उज्ज्वल करण्याच्या उद्दिष्टासाठी ते सर्व कटिबद्ध होते. त्यांच्या विचार आणि कार्यानेच, जगात एक आधुनिक देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे.
3. आपण अत्यंत नशीबवान आहोत की महात्मा गांधी या स्वातंत्र्यलढयाचे दीपस्तंभ म्हणून आपल्याला लाभले. राजकीय नेत्याबरोबरच एक संत असलेले महात्मा गांधी हे एक लोकोत्तर व्यक्तिमत्व होते, जे केवळ भारतातच घडू शकतात. आज सामाजिक कलह, आर्थिक समस्या आणि हवामान बदल अशा प्रश्नांमुळे त्रस्त झालेल्या जगासाठी महात्मा गांधींची शिकवण हा एक मोठा दिलासा आहे. न्याय आणि समानतेसाठीचा त्यांचा आग्रह हा आपल्या प्रजासत्ताकासाठीचा मंत्र ठरला आहे. आजची नवी पिढी महात्मा गांधींचा नव्याने शोध घेत आहे, हे पाहून मला अत्यंत आनंद होत आहे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
4. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाचे सोहळे मर्यादित स्वरुपात होणार आहेत. कारण आपल्याला माहितीच आहे. सध्या संपूर्ण जग एका अत्यंत धोकादायक विषाणूचा सामना करत आहे, या विषाणूने आपले जीवनमान विस्कळीत केले आहे, आणि त्याची जबर किंमत सर्वांनाच मोजावी लागते आहे. या विषाणूमुळे, आपले कोरोना साथीच्या पूर्वी असलेले जग बदलून गेले आहे.
5. या अत्यंत मोठ्या आव्हानाचा पूर्व अंदाज घेत, केंद्र सरकारने योग्य वेळी अनेक प्रभावी पावले उचलली ही बाब अत्यंत दिलासादायक आहे. भारतासारख्या इतक्या विशाल आणि वैविध्यपूर्ण, तसेच लोकसंख्येची घनता असलेल्या देशात, अशा आव्हानाचा सामना करण्यासाठी असामान्य प्रयत्नांची गरज आहे. सर्व राज्य सरकारांनी आपापल्या स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक त्या उपाययोजना केल्या. लोकांनीही सरकारच्या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य केले. आपल्या कटिबद्ध प्रयत्नांमुळे, आपण या जागतिक साथीच्या आजाराचा प्रभाव आटोक्यात आणण्यात आणि अनेकांचे प्राण वाचवण्यात यशस्वी ठरलो आहोत, ही जगासाठी देखील अनुकरणीय बाब आहे.
6. या विषाणूविरुद्धच्या आपल्या लढ्यात पहिल्या फळीत राहून अविश्रांत कष्ट करणारे आपले डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी यांचा देश ऋणी आहे. दुर्दैवाने, या महामारीशी लढतांना त्यांच्यापैकी कित्येकांना आपले जीव गमवावे लागले. ते आपल्या देशाचे नायक आहेत. हे सर्व कोरोनायोद्धे मोठ्या कौतुकास पात्र आहेत. त्यांनी आपल्या कर्तव्याच्या कितीतरी पलीकडे जात लोकांचे जीव वाचवण्यासाठी आणि लोकांपर्यंत अत्यावश्यक सेवा पोहोचवण्यासाठी अविरत कष्ट केले. हे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन पथकांतील सदस्य, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, विविध सेवा पुरवठा करणारे लोक, वाहतूक करणारे लोक, रेल्वे आणि विमान वाहतूक कर्मचारी, सरकारी कर्मचारी, समाजसेवी संस्था आणि सुहृद नागरिकांनी या संकट काळात केलेल्या निस्वार्थ आणि साहसी सेवा कार्याच्या गाथा अत्यंत प्रेरणादायी आहेत. जेव्हा शहरे आणि गावे शांत असतात आणि रस्ते ओसाड पडतात, अशावेळी हे लोक अविश्रांत काम करुन कोणीही आरोग्य सुविधा आणि सेवेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतात. पाणी आणि वीज, वाहतूक आणि संपर्क व्यवस्था, दूध आणि भाज्या, अन्न आणि वाणसामान, औषधे आणि इतर आवश्यक वस्तू लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. आपले जीवन आणि जीवनमान सुरक्षित ठेवण्यासाठी ते स्वतःचे जीव धोक्यात घालतात.
7. याच संकटकाळात पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाने धडक दिली. आपत्ती व्यवस्थापन पथक, केंद्र आणि राज्यातील विविध यंत्रणा आणि दक्ष नागरिकांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे कमीतकमी जीवित हानी झाली. ईशान्य भारत आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये सध्या आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा आपत्तींच्या हल्ल्याच्या वेळी समाजातील सर्व घटक एकत्र येऊन आपत्ती ग्रस्तांना सर्वतोपरी मदत करतात, ही अतिशय समाधानाची बाब आहे.
माझ्या प्रिय देशबांधवानो,
8. या आजाराचा सर्वात मोठा फटका गरीब आणि रोजंदारीवर जगणाऱ्या लोकांना बसला आहे. या संकटकाळात या सर्वांना आधार देण्यासाठी, विषाणू प्रतिबंधक उपाययोजनांसह, सरकारने काही कल्याणकरी उपक्रमही हाती घेतले आहेत. ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची’ घोषणा करत, केंद्र सरकारने कोट्यवधी लोकांची उपजीविका चालेल अशी व्यवस्था करत बेरोजगारीचे संकट आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सरकारने इतर अनेक उपक्रमातून या घटकांना मदतीचा हात दिला. सरकारच्या या प्रयत्नांना कॉर्पोरेट क्षेत्र, नागरी समाज आणि नागरिकांचाही मोठा हातभार लागला.
9. गरजूंना मोफत अन्नधान्य वितरीत केले जात आहे, जेणेकरुन कोणतेही कुटुंब उपाशी राहणार नाही. जगातील सर्वात मोठ्या मोफत अन्नवाटप योजनेला आता नोव्हेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ मिळाली असून दरमहा 80 कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळतो आहे. शिधापत्रिकाधारक स्थलांतरित मजुरांना देशात कुठेही स्वस्त धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी सर्व राज्यांना ‘एक देश-एक शिधापत्रिका’ योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात येत आहे.
10.जगभरात विविध ठिकाणी अडकलेल्या आपल्या सर्व नागरिकांची काळजी घेत सरकारने “वंदे भारत’ अभियानाअंतर्गत आतापर्यंत 10 लाख भारतीयांना मायदेशी परत आणले आहे. भारतीय रेल्वे देखील, या आव्हानात्मक परिस्थितीत लोकांना वाहतूक सेवा आणि मालवाहतूक सेवा देत आहे.
11. आपल्या शक्तींच्या जोरावर, आपण कोविड-19 च्या या लढ्यात इतर देशांचीही मदत केली. औषधांचा पुरवठा करण्याविषयी इतर देशांनी केलेल्या विनंतीला प्रतिसाद देत, भारताने पुन्हा एकदा सिध्द केले की अशा संकटकाळात, भारत जागतिक समुदायासोबत खंबीरपणे उभा आहे. या आजाराचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जागतिक आणि प्रादेशिक पातळीवर जी धोरणे आखली गेली, त्यातही आपला पुढाकार होता. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यत्वासाठी भारताला विविध देशांकडून मिळालेला अभूतपूर्व पाठींबा म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पत दर्शवणारा दाखलाच आहे.
12. भारताची ही परंपरा आहे की आपण केवळ स्वतःसाठी जगत नाही, तर संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी कष्ट करतो. भारतासाठी आत्मनिर्भर होण्याचा अर्थ म्हणजे, इतर जगापासून विलग न होता किंवा अंतर न राखता, स्वयंपूर्ण होणे. भारत आता आपले वेगळे अस्तित्व कायम राखत, संपूर्ण जगाशी व्यवहार करेल, असे यात अभिप्रेत आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
13 आपल्या ऋषीमुनींनी जे अनेक वर्षांपूर्वी सांगितले होते,ते, म्हणजे संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, “वसुधैव कुटुंबकम” हे तत्वज्ञान जगाला आज समजले आहे. मात्र, जेव्हा संपूर्ण जागतिक समुदाय आज मानवतेपुढच्या या सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करण्यासाठी एकत्र आला आहे, अशा वेळी देखील, आपल्या काही शेजारी देशांनी विस्तारवादाचे दुःसाहस करण्याचा प्रयत्न केला. आपल्या सीमांचे रक्षण करतांना आपल्या वीर जवानांनी प्राणांचे बलिदान दिले. गलवान खोऱ्यात हुतात्मा झालेल्या आपल्या जवानांना संपूर्ण देश सलाम करतो आहे. प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या मनात या जवानांच्या कुटुंबियांप्रति कृतज्ञता आहे. या लढाईत त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे जगाला दिसले की जरी आपला शांततेवर विश्वास असला तरीही आमच्यावर होणाऱ्या कोणत्याही आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अंतर्गत सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी आमच्या तिन्ही सैन्यदलातील जवान, निमलष्करी दले आणि पोलीस कर्मचारी करत असलेल्या कर्तव्यांचा आम्हाला अभिमान आहे.
14. कोविड-19 विरुद्धच्या आपल्या लढाईत, जीव आणि जीवनमान दोन्हीही महत्वाचे आहे, असा मला विश्वास आहे. सध्या आलेल्या या संकटाचा एक संधी म्हणून उपयोग करुन घेत, अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी ,आम्ही सर्वांच्या हितासाठी आवश्यक अशा आर्थिक सुधारणा केल्या. विशेषतः शेतकरी आणि लघुउद्योजकांसाठी या सुधारणा अत्यंत महत्वाच्या आहेत. कृषी क्षेत्रात अत्यंत महत्वाच्या सुधारणा करण्यात आल्या. आता शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल देशात कुठेही उत्तम किमतीला कुठल्याही बंधनाविना विक्रीसाठी नेता येणार आहे. अत्यावश्यक वस्तू सेवा कायद्यात सुधारणा करत, शेतकऱ्यांसाठी जाचक असलेले काही नियमन रद्द करण्यात आले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
15. 2020 या वर्षात आपण काही कठीण धडे शिकलो आहोत. आपण निसर्गाचे स्वामी आहोत, हा मानवाचा भ्रम एका अदृश्य विषाणुने दूर केला आहे. आपली चूक सुधारून निसर्गासोबत सलोख्याने राहायला अजून फार उशीर झालेला नाही, यावर माझा विश्वास आहे. हवामानातील बदलाप्रमाणेच या साथीच्या आजाराने अवघ्या जगाला आपल्या समान भविष्याची जाणीव करून दिली आहे. सद्यस्थितीत अर्थकेंद्रित समावेशापेक्षा मानवकेंद्रित सहकार्य जास्त महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. हा बदल जितक्या व्यापक स्वरूपात होईल, तितकाच तो मानवतेसाठी कल्याणकारक असेल. आपसातले सर्व मतभेद बाजूला ठेवून आपला ग्रह वाचवण्यासाठी प्रयत्न करणारे मानवतेचे शतक, अशी एकविसाव्या शतकाची ओळख निर्माण झाली पाहिजे.
16. निसर्ग मातेसमोर आपण सगळे समान आहोत आणि आपले अस्तित्व टिकवून विकास साध्य करण्यासाठी आपण आपल्या सोबतच्या इतर रहिवाशांवर अवलंबून आहोत, हा दुसरा महत्त्वाचा धडा आपण शिकलो आहोत. मानवी समाजाने तयार केलेली कोणतीही कृत्रिम विभागणी कोरोना विषाणू जाणत नाही. आपण सर्व प्रकारचे मानवी मतभेद, पूर्वग्रह आणि अडथळ्यांमधून बाहेर पडण्याची गरज आहे, यावरचा विश्वास यातून दृढ होतो. करुणा आणि परस्पर सहकार्य, ही मुल्ये भारतीय नागरिकांनी मूलभूत मुल्ये म्हणून स्वीकारली आहेत. आपल्या आचरणामध्ये हे गुण जास्त प्रमाणात सामावून घेण्याची आवश्यकता आहे. असे झाले तरच आपण आपल्या सर्वांसाठी उत्तम भविष्य घडवू शकू.
17. आरोग्य विषयक पायाभूत सुविधांची वाढ करण्याची आवश्यकता, हा तिसरा धडा आपण शिकलो आहोत. आपली सार्वजनिक रुग्णालये आणि प्रयोगशाळा कोवीड - 19 विरुद्धच्या लढ्यात मोलाची भूमिका बजावत आहेत. सार्वजनिक आरोग्यसेवांमुळेच गरिबांना या साथीच्या रोगाचा मुकाबला करणे शक्य झाले आहे. हे लक्षात घेता, सार्वजनिक आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सक्षमीकरण गरजेचे आहे.
18. चौथा धडा विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या साथीने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक वेगाने विकास होण्याच्या आवश्यकतेला अधोरेखित केले आहे. टाळेबंदी आणि त्यानंतर टाळेबंदीचे नियम शिथिल करताना, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान हे प्रशासन, शिक्षण, उद्योग, कार्यालयीन कामकाज आणि सामाजिक संपर्क या बाबींसाठी प्रभावी साधन म्हणून समोर आले आहे. या तंत्रज्ञानामुळे आयुष्ये वाचवण्याबरोबरच कामकाज पुन्हा सुरु करण्याचा दुहेरी हेतू साध्य होऊ शकला आहे.
19. केंद्र सरकार आणि राज्य सरकारची कार्यालये आपली कामे पूर्ण करण्यासाठी सातत्याने आभासी मंचाचा वापर करत आहेत. न्यायसंस्था सुद्धा न्यायदानासाठी आभासी पद्धतीने न्यायालयीन कामकाज करीत आहेत. राष्ट्रपती भवनात सुद्धा आम्ही आभासी परिषदा आयोजित करण्यासाठी आणि इतर अनेक उपक्रम राबविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतो. माहिती तंत्रज्ञान आणि संप्रेषण साधनांनी, शिक्षण आणि दूरस्थ शिक्षणाला प्रोत्साहन दिले आहे. अनेक क्षेत्रांमध्ये घरून काम करण्याची पद्धत सध्या सुरू आहे. अर्थव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील काही आस्थापनांना अतिरिक्त काम करणे तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. अशाप्रकारे निसर्गाशी सलोखा साधताना आपण आपले अस्तित्व जपत विकास साध्य करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचा धडा शिकलो आहोत.
20. हे धडे मानवतेसाठी उपयुक्त ठरणार आहेत. युवा पिढीने सुद्धा यातून बोध घेतला आहे आणि त्यांच्या हातात भारताचे भविष्य सुरक्षित आहे, याची खात्री मला वाटते. आपल्या सर्वांसाठीच हा कठीण काळ आहे आणि युवा पिढीसाठी तो जास्तच कसोटीचा आहे. शैक्षणिक संस्था बंद असल्यामुळे आमच्या देशातील मुलामुलींच्या मनात काळजीचे वातावरण निर्माण झाले असेल आणि त्यामुळे काही काळासाठी त्यांची स्वप्ने आणि आकांक्षा झाकोळून गेल्या असतील. मात्र या सर्वांना मला सांगावेसे वाटते की कसोटीचा हा काळ कायम राहणार नाही. त्यामुळे त्यांनी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आवश्यक मेहनत करणे थांबवू नये. अशा प्रकारच्या विनाशक काळानंतर समाजाने, अर्थव्यवस्थेने आणि देशांनी नवी भरारी घेतल्याची असंख्य प्रेरणादायी उदाहरणे आपल्याला भूतकाळात सापडतील. आमच्या देशाचे आणि युवा वर्गाचे भवितव्य उज्वल आहे, अशी खात्री मला वाटते.
21. आपल्या बालकांना आणि युवकांना भविष्यासाठी उपयुक्त शिक्षण प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हे धोरण राबविल्यामुळे एक नवी दर्जेदार शिक्षण व्यवस्था विकसित होईल आणि त्यामुळे भविष्यातील आव्हानांचे रूपांतर संधीत होईल आणि त्यायोगे नव भारताच्या निर्मितीचा मार्ग सुकर होईल. आमच्या युवकांना मुक्तपणे आपल्या आवडीनुसार आणि बुद्धिमत्तेनुसार विषयांची निवड करता येईल. आपली क्षमता जोखण्याची संधी त्यांना मिळू शकेल. आमच्या भावी पिढ्या आपल्या क्षमतेच्या बळावर रोजगार मिळवतील आणि त्याच बरोबर इतरांसाठीही रोजगार संधी निर्माण करतील.
22. राष्ट्रीय शिक्षण धोरणात दीर्घकालीन प्रभाव करणारा दूरगामी दृष्टीकोनही समाविष्ट आहे. या धोरणामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात “समावेशकता, नाविन्यता आणि संस्था” संस्कृती सक्षम होईल. कोवळ्या मनांना उन्मुक्तपणे विकास साधता यावा, यासाठी मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आला आहे. यामुळे भारतीय भाषांबरोबरच देशाची एकताही अधिक दृढ होईल. सक्षम देश घडविण्यासाठी युवांचे सक्षमीकरण आवश्यक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण हे त्या दिशेने टाकलेले एक योग्य पाऊल आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
23. अवघ्या दहा दिवसांपूर्वी अयोध्येत श्री राम जन्मभूमी येथे मंदिराचे बांधकाम सुरू झाले. हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण होता. देशातील नागरिकांनी याबाबतीत दीर्घकाळ संयम राखला आणि न्यायव्यवस्थेवर अखंड विश्वास दाखवला. रामजन्मभूमीचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातूनच सोडविण्यात आला. सर्व संबंधित पक्षांनी आणि जनतेने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदराने स्वीकार केला आणि अवघ्या जगासमोर शांतता, अहिंसा, प्रेम आणि सलोखा या भारतीय मूल्यांचा आदर्श ठेवला. या स्तुत्य आचरणाबद्दल मी सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
24. जेव्हा भारताने स्वातंत्र्य प्राप्त केले, तेव्हा लोकशाहीचा प्रयोग आपल्या देशात फार काळ चालणार नाही, असा अनेकांचा अंदाज होता. आपल्या प्राचीन परंपरा आणि समृद्ध विविधता, हे आपल्या राजकीय व्यवस्थेच्या लोकशाहीकरणातले अडथळे ठरतील, असा त्यांचा कयास होता. आपण मात्र आपली ही बलस्थाने जपली आणि त्याचमुळे जगातला सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश एवढा जिवंत ठरला आहे. मानवतेच्या कल्याणासाठी भारताने आपली ही अग्रणी भूमिका कायम ठेवणे गरजेचे आहे.
25. कोरोनाच्या या साथीच्या रोगाच्या काळात आपण सर्वांनी दाखविलेल्या संयमाचे आणि शहाणपणाचे जगभरात कौतुक झाले आहे. यापुढेही आपण अशाच प्रकारे काळजी घ्याल आणि जबाबदारीने वागाल, याची मला खात्री वाटते.
26. बौद्धिक आणि अध्यात्मिक समृद्धी आणि जागतिक शांततेसाठी प्रोत्साहक ठरेल, असे बरेच काही आपण जगाला देऊ शकतो. याच भावनेसह मी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखभाग् भवेत् ॥
अर्थात
सर्व आनंदात राहोत,
सर्व आजारांपासून मुक्त राहोत,
जे काही पवित्र आहे, त्याचे सर्वांना दर्शन व्हावे,
कोणालाही दुःख होऊ नये.
या प्रार्थनेतून सर्वांच्या कल्याणासाठी दिलेला संदेश, ही मानवतेसाठी भारतातर्फे एक अनोखी भेट आहे.
27. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मी पुन्हा एकदा आपले सर्वांचे अभिनंदन करतो. आपणा सर्वांना उत्तम आरोग्यासाठी आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.
धन्यवाद. जय हिंद !
* * *
MC/RA/MP/DR
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1645901)
Visitor Counter : 284
Read this release in:
Odia
,
Telugu
,
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Kannada
,
Malayalam