आयुष मंत्रालय

आयुष मंत्रालयाने सुरू केलेल्या रोगप्रतिकारक्षमतेसाठी आयुष मोहिमेला डिजिटल अवकाशात उत्तम प्रतिसाद

Posted On: 14 AUG 2020 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्‍ट 2020


आयुष मंत्रालयाने आज “ रोगप्रतिकारक्षमतेसाठी आयुष” या तीन महिन्यांच्या मोहिमेची वेबिनारच्या माध्यमातून सुरुवात केली. या वेबिनारमध्ये 50 हजारांहून जास्त लोक सहभागी झाले होते. आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांनी उद्घाटनाचे भाषण केले. ‘आयुष’ चे उपाय संपूर्ण जगाला निरोगी आणि आनंदी जीवनाचा मार्ग दाखवतील असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे हे ठळक वैशिष्ट्य होते.

आयुष व्हर्चुअल कन्वेन्शन सेंटर या आयुष मंत्रालयाच्या नव्या डिजिटल मंचावर या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. आयुष मंत्रालयाच्या अधिकृत फेसबुक हँडलवर या कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले आणि एकूण 60,000 लोकांनी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिले.

या कार्यक्रमात आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राकेश कोटेचा, सेलेब्रिटी आणि फिटनेस आयकॉन बनलेले मिलिंद सोमण, जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक अधिकारी डॉ. गीता कृष्णन आणि एआयआयएच्या संचालक प्रा. तनुजा नेसरी हे इतर मान्यवर सहभागी झाले होते.

सध्याच्या काळात आपल्या रोगप्रतिकार क्षमतेत वाढ करण्याच्या आणि आपल्या जीवनशैलीत बदल करण्याच्या आवश्यकतेवर गुरुदेव श्री श्री रवीशंकर यांनी भर दिला. आयुर्वेदिक आणि आयुषच्या इतर उपचारपद्धतींमध्ये असलेल्या आयुर्मानवाढीच्या क्षमतेबाबत त्यांनी एक विस्तृत दृष्टीकोन मांडला. आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा यांनी आयुष उपाययोजनांच्या माध्यमातून सहज उपलब्ध होणाऱ्या आणि परवडणाऱ्या आरोग्यसुविधा ही  या कार्यक्रमाची संकल्पना विषद केली. रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी लोकांच्या वर्तनात बदल आवश्यक असण्यावर त्यांनी भर दिला आणि पारंपरिक औषधे आणि उपचारपद्धतींची रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यामध्ये असलेली सकारात्मक भूमिका अधोरेखित केली. रोगप्रतिकारक्षमतेसाठी आयुष या मोहिमेच्या छत्राखाली आयुष मंत्रालय राबवणार असलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली.

मिलिंद सोमण यांनी आरोग्य आणि तंदुरुस्ती संदर्भात आपला दृष्टीकोन मांडला आणि निरोगी जीवनशैली आत्मसात करण्यासाठी लोकांना प्रेरित केले. यासाठी अगदी कमीतकमी परंतु सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

कोविड-19 विरोधातील संघर्षामध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या प्रतिबंधात्मक आणि सुधारणात्मक उपाययोजनांबाबतचे अनुभव यावेळी प्राध्यापक तनुजा नेसरी यांनी सांगितले. त्यांनी सांगितलेले अनुभव श्रोत्यांसाठी खूपच मार्गदर्शक होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक अधिकारी डॉ. गीता कृष्णन या महामारीच्या संदर्भात आरोग्याचा संबंध ही संकल्पना स्पष्ट केली. आजार आणि अनारोग्याचा फैलाव टाळण्यासाठी चांगल्या पायाभूत सुविधांची उभारणी करणे आणि प्रभावी संवादाचा अंगिकार करणे किती आवश्यक आहे त्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. 

या वेबिनारमध्ये जनतेचा सहभाग लक्षणीय होता आणि प्रश्नोत्तरे आणि त्यांच्या जोडीला होणाऱ्या सादरीकरणांच्या माध्यमातून परस्परांशी मोठ्या प्रमाणात संवाद झाला. वेबिनारमध्ये सहभागी झालेल्यांनी विचारलेल्या प्रश्नांना या कार्यक्रमातील तज्ञांच्या पॅनेलने उत्तरे दिली. या पॅनेलमध्ये सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस(सीसीआरएएस) चे महासंचालक, प्रा. वैद्य के एस धीमन, मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा(एमडीएनआयवाय) चे संचालक डॉ. ईश्वर व्ही बसवरेड्डी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी(एनआयएन) च्या संचालक डॉ. सत्यलक्ष्मी कोमारज्जू, नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सोवा रिग्पा(एनआयएसआर)चे संचालक डॉ. पद्म गुर्मेत, सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन योगा अँड नॅचरोपॅथी(सीसीआरवायएन) चे संचालक डॉ. राघवेंद्र एम राव, सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन( सीसीआरयूएम) चे महासंचालक प्रो. असिम अली खान, सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन सिद्धा( सीसीआरएस) चे महासंचालक डॉ. के कनकवल्ली आणि सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी(सीसीआरएच)चे महासंचालक डॉ. अनिल खुराना यांचा समावेश होता. या तज्ञांनी वेबिनारमध्ये सहभागी दर्शकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि साध्या साध्या परंतु महत्त्वाच्या उपायांमधून कशा प्रकारे निरोगी राहाता येईल त्याची माहिती दिली. त्यांनी जनतेशी संवाद साधताना वैज्ञानिक दृष्टीकोनातून त्यांचे अनुभव आणि निष्कर्ष यांचे कथन केले. 

रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिबंधासाठी आयुष आधारित उपायांच्या सामर्थ्याबाबत  जनतेला महत्त्वाची माहिती देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. प्रत्येक तज्ञाकडून रोगप्रतिकारक्षमताविषयक संदेश देऊन या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. दैनंदिन जीवनात अंगिकार केलेल्या अतिशय साध्या उपायांमुळे कशा प्रकारे दीर्घकाळ रोगप्रतिबंध करता येतात हे संदेशांतून दिसून आले.


* * *

B.Gokhale/S.Patil//D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1645887) Visitor Counter : 203