संरक्षण मंत्रालय
भारतीय तटरक्षक दलाच्या ‘सार्थक’गस्ती नौकेचे जलावतरण
Posted On:
13 AUG 2020 8:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2020
भारतीय तटरक्षक दलाची गस्ती नौका ‘सार्थक’ चे आज संरक्षण सचिव डॉ अजय कुमार यांच्या पत्नी विणा अजय कुमार यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आले. गोवा शिपयार्डमधील हा उद्घाटन सोहळा कोविड-19 संक्रमण परिस्थिती पाहता शासकीय नियमांनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपन्न झाला. यासाठी संरक्षण सचिव डॉ अजय कुमार, तटरक्षक दलाचे महासंचालक के. नटराजन, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि संरक्षणमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
पाच गस्तीनौकांच्या मालिकेतील ‘सार्थक’ ही चौथी गस्तीनौका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ च्या धोरणानुसार गोवा शिपयार्ड लिमिटेडने या नौकेची रचना आणि बांधणी स्वदेशी तंत्रज्ञानाने केली आहे. नौकेत अत्याधुनिक अशी नेव्हिगेशन आणि संचार साधने, सेन्सर आणि मशिनरी उपलब्ध आहे. 105 मीटर जहाजाचे वजन 2350 टन असून जहाजाला 9100 किलोवॅटची दोन इंजिन आहेत, ज्या माध्यमातून 6000 नॉटीकल मैलांपर्यत 26 नॉटस गती मिळेल. अत्याधुनिक साधनांमुळे तटरक्षक दलाची विविध कार्य पार पडू शकतील. शोध आणि तपासकार्यासाठी ट्वीन-इंजिन हेलिकॉप्टर, चार हायस्पीड बोट आणि एक शिडाचे जहाज वाहून नेण्याची क्षमता या नौकेमध्ये आहे. समुद्रातील तेल गळतीमुळे झालेल्या प्रदुषणाविरोधातील मर्यादीत प्रदुषण प्रतिसाद साधने वाहण्याची नौकेची क्षमता आहे.
भारतीय तटरक्षक दल आणि गोवा शिपयार्ड लिमिटेडने डिजीटल माध्यमाचा वापर केल्याबद्दल संरक्षणसचिव डॉ अजय कुमार यांनी प्रशंसा केली, ते म्हणाले, यामुळे भारतीय तटरक्षक दलाचे वाढते सामर्थ्य आणि भारतीय जहाजबांधणी क्षेत्राच्या क्षमतेची प्रचिती आली आहे. कोविड-19 संक्रमण परिस्थितीतही कंत्राट निर्धारीत वेळेत पूर्ण केल्याबद्दल त्यांनी गोवा शिपयार्डच्या व्यावसायिकतेचे कौतुक केले.
याप्रसंगी बोलताना भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक, के. नटराजन म्हणाले, भारतीय तटरक्षक दलाची समुद्रातील उपस्थिती आश्वस्त करणारी असते. दुष्प्रवृतींसाठी रोधक तर, सागरी समुदायासाठी आश्वस्त करणारी असते. भारतीय तटरक्षक दल समुद्रात जीवनावर बेतलेल्यांच्या मदतीला तातडीने प्रतिसाद देते.
भारतीय तटरक्षक दल वर्षभर कार्यरत राहणारे स्वदेशी तंत्रज्ञान सामील करुन घेण्यात आघाडीवर आहे. आज जलावतरण करण्यात आलेल्या जहाजात 70% स्वदेशी तंत्रज्ञान आहे, यामुळे जहाजबांधणी उद्योगाला चालना मिळाली असून ‘आत्मनिर्भर भारताच्या’ दिशेने मोठी झेप घेतली आहे.
हे जहाज विशेष आर्थिक क्षेत्राची गस्त, सागरी सुरक्षा आणि भारतीय तटरक्षक दलाच्या राष्ट्रहितासंबंधीच्या इतर कर्तव्यांची पूर्ती करेल. 05 ओपीव्ही प्रकल्पांसह, भारतीय तटरक्षक दलाची 52 जहाजे देशातील विविध शिपयार्डमध्ये निर्माणाधीन आहेत आणि 16 प्रगत कमी वजनाची हेलिकॉप्टर्स एचएल बेंगळुरु येथे निर्माणाधीन आहेत.
“वयम रक्षम” हे ब्रीद सार्थ ठरवत भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात 9730 जणांचे प्राण वाचवले आहेत, विविध मोहिमांमध्ये सहाय्य करुन 12500 जणांचे प्राण वाचवले आहेत, तर 400 वैद्यकीय तातडीच्या गरजा भागवल्या आहेत. भारतीय तटरक्षक दलाकडून समुद्रात दररोज प्रतिसेकंद एक जीव वाचवला जातो.
भारतीय तटरक्षक दलाने आतापर्यंत 6800 कोटी रुपये किंमतीचा तस्करीमाल हस्तगत केला आहे.
B.Gokhale/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1645608)
Visitor Counter : 313