रसायन आणि खते मंत्रालय

या वर्षी जुलै महिन्यापर्यंत जम्मू-काश्मीर आणि लदाख भागात 94 जनऔषधी केंद्र सुरु, आणखी 73 केंद्रे प्रस्तावित

जनऔषधी केंद्रातून 5 ऑगस्ट 2019 पासून 4.39 कोटी रुपयांच्या औषधांची विक्री, नागरिकांच्या 31 कोटी रुपयांची बचत

BPPI कडून जनऔषधी सुविधा केंद्रात 1.56 कोटी सॅनिटरी पॅडचा पुरवठा; ‘राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम’अंतर्गत युवती आणि महिलांना NHM कडून मोफत पॅड वितरीत

Posted On: 11 AUG 2020 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑगस्‍ट 2020

 

भारतीय सार्वजनिक औषध विभाग, BPPI ने जम्मू काश्मीर भागात 91आणि लदाख भागात 3 जन औषधी केंद्र सुरु केली आहेत. जानेवारी ते जुलै 2020 या कालावधीत सुरु झालेल्या या केंद्रांचा उद्देश या भागातील नागरिकांना उत्तम दर्जाची औषधे स्वस्त दरात उपलब्ध करुन देणे हा आहे.

 केंद्र सरकारच्या औषधनिर्माण विभागाच्या अखत्यारीतील BPPI हा विभाग प्रधान मंत्री भारतीय जनऔषधी प्रकल्पाची अंमलबजावणी करतो.  

जम्मू-काश्मीर मध्ये 9 मे 2011रोजी श्रीनगरच्या लाल चौकात पहिले जन औषधी केंद्र उघडण्यात आले होते. आणि लदाखमध्ये 9 जानेवारी 2012 रोजी, SNM रुग्णालयात पहिले जन औषधी केंद्र उघडण्यात आले.मात्र, गेल्या एका वर्षात, म्हणजेच 5 ऑगस्ट 2019 पासून  BPPI ने जम्मू काश्मीर मध्ये 31 नवी केंद्र तर लदाखमध्ये एक नवे केंद्र सुरु केले. गेल्या वर्षभरात जम्मू-कश्मीर आणि लदाखमध्ये 4.39 कोटी रुपयांच्या औषधांची विक्री झाली, ज्यातून इथल्या नागरिकांच्या सुमारे 31 कोटी रुपयांची बचत झाली.

जम्मू-काश्मीर आणि लदाख भागात 73 नवी जन औषधी केंद्र सुरु करण्याचा निर्णय, जम्मू काश्मीर आणि केंद्र सरकारने घेतला असून त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आला आहे. दोन्ही केंद्रशासित प्रदेशात नवी औषधनिर्माण परिषद स्थापन झाल्यावरच ही नवी केंद्रे सुरु केली जाऊ शकतील.

जन औषधी दिनानिमित्त 7 मार्च रोजी झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला होता. पुलवामा जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक आणि या योजनेचे लाभार्थी, गुलाम नबी दार, यांनी या योजनेचे लाभ यावेळी सांगितले. तसेच या योजनेमुळे झालेल्या बचतीचीही माहिती दिली, कमी किमतीतील औषधांमुळे या प्रदेशातील नागरिकांची बचत होऊन तो पैसा आणखी चांगल्या कामांसाठी वापरला जातो आहे. अशी आणखी केंद्रे सुरु करण्याची विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली.  

या जनऔषधी केंद्रांच्या मार्फत केंद्र सरकारने गरीब आणि वंचित युवती आणि महिलांना देशभर केवळ एका रुपयात जन औषधी सुविधा सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन दिले आहेत. जम्मू काश्मीर प्रशासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत BPPI कडून थेट हे सॅनिटरी पॅड विकत घेतले. आतापर्यंत BPPI ने जम्मू काश्मीर आणि लदाख भागात 1.56 कोटी पॅडचा पुरवठा केला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत, सुरु असलेल्या राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत युवतींना हे पॅड मोफत दिले जातात. 

 

 

* * *

B.Gokhale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1645175) Visitor Counter : 96