युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
तळागाळातील क्रीडा गुणवत्तांना वाव देण्यासाठी वार्षिक ‘खेलो इंडिया’ स्पर्धा आयोजित करण्याचे केंद्रीय क्रीडामंत्र्यांचे सर्व राज्यांना आवाहन
Posted On:
04 AUG 2020 11:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2020
केंद्रीय क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री, किरेन रीजीजू यांच्या अध्यक्षतेखाली, आज ‘खेलो इंडिया’योजनेच्या सर्वसाधारण परिषदेची पहिली बैठक झाली. क्रीडा आणि इतर मंत्रालयाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. तळागाळातील क्रीडा कौशल्याला वाव मिळावा, यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा आयोजित कराव्या, अशी विनंती रीजीजू यांनी केली.केंद्रीय क्रीडा सचिव रवी मित्तल आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
“खेलो इंडिया योजनेअंतर्गत, राष्ट्रीय स्तरावर, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आणि विद्यापीठ स्तरावरील वार्षिक स्पर्धा आयोजित केल्या जातात, या स्पर्धांमधून सर्व राज्यांतील क्रीडा कौशल्याला वाव मिळतो. मात्र तेवढे पुरेसे नाही. प्रत्येक राज्याने जर अशा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या तर त्यात तळागाळातील खेळाडूंना आपली क्रीडा कौशल्ये दाखवण्यास संधी मिळेल”, असे रीजीजू यावेळी म्हणाले. सध्या राज्यांमध्ये सुरु असलेल्या विविध क्रीडा स्पर्धांची खेलो इंडियाशी सांगड घालता येईल, असेही त्यांनी सांगितले. अशा स्पर्धा आयोजित करण्यासाठी केंद्र सरकार पाठींबा देईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
भारताला, क्रीडा क्षेत्रातील महासत्ता बनवायचे असेल, तर आपल्याला 5 ते 10 वर्षे या वयोगटातील क्रीडा कौशल्यांना ओळखून त्यांच्यातल्या क्रीडा नैपुण्य वाढवायला हवे, त्यातूनच, नवे खेळाडू तयार होतील. ऑलिम्पिकसाठी खेळाडू तयार करायला किमान आठ वर्षे लागतात, आणि जर आपल्याला विद्यार्थ्यांमधल्या क्रीडा कौशल्याची उशीरा पारख झाली, तर त्यावेळी त्यांना स्पर्धेसाठी तयार व्हायला कमी वेळ लागतो. हे टाळण्यासाठी लवकर त्यांची क्रीडाकौशल्ये ओळखून, त्यांना पैलू पाडणे आवश्यक आहे, असे रीजीजू म्हणाले . राज्य, जिल्हा, तालुका, ग्राम पातळीवर जाऊन हे खेळाडू हेरले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
क्रीडा मंत्र्यांनी या बैठकीत पाच क्षेत्रीय नैपुण्य निवड समित्यांची स्थापना करण्याबाबत चर्चा केली. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि ईशान्य भागांसाठी या समित्या तयार करण्याचा प्रस्ताव आहे. या समित्यांच्या कामात राज्यांचाही सहभाग आवश्यक ठरेल,असे ते म्हणाले. राज्यांनी पारख केलेल्या खेळाडूंना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षण दिले जाऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.
खेलो इंडिया सारख्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी राज्यांनी आवश्यक त्या पायाभूत सुविधा देखील उभाराव्यात असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी राज्यांच्या प्रतिनिधींनी देखील केंद्रीय क्रीडा मंत्रालयासोबत काम करण्यास उत्सुकता दर्शवली.
* * *
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1643477)
Visitor Counter : 199