शिक्षण मंत्रालय
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी भारतीय व्यवस्थापन संस्था सिरमौर (हिमाचल प्रदेश) ची केली पायाभरणी
Posted On:
04 AUG 2020 9:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2020
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर, अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर आणि शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यासह हिमाचल प्रदेशातील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) सिरमौर ची ऑनलाइन पद्धतीने पायाभरणी केली.
यावेळी बोलताना शिक्षण मंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने 2014 मध्ये तत्कालीन विद्यमान आयआयएमनी तयार केलेल्या कॉर्पोरेट नेत्यांची मागणी व पुरवठा यातील तफावत भरून काढण्यासाठी आयआयएम सिरमौरसह सात नवीन आयआयएम स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. ते पुढे म्हणाले की, 15 ऑगस्ट 2014 रोजी घोषणा करण्यात आली होती कि सिरमौर जिल्ह्यातील धौलाकुआन येथे हिमाचल प्रदेशसाठी आयआयएम स्थापन केले जाईल. 12 मार्च 2015 रोजी राज्य सरकारने धौलाकुआन येथे 210 एकर जमीन संस्थेच्या कायमस्वरुपी संकुलाच्या विकासासाठी दिली.
ते म्हणाले कि आयआयएम लखनौ ने ऑगस्टमध्ये मार्गदर्शक संस्था म्हणून आयआयएम सिरमौर कार्यान्वित केले होते आणि हिमाचल प्रदेशच्या सिरमौर येथील पाओता साहिब येथील तात्पुरत्या संकुलातून 20 विद्यार्थ्यांच्या पीजीपीच्या पहिल्या तुकडीला सुरुवात झाली. आणि तेव्हापासून संस्था चांगली प्रगती करत आहे आणि शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने नवीन शिखरे सर करत आहे. सध्याचे शैक्षणिक उपक्रम तात्पुरत्या संकुलातून सुरू केले गेले, हे विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे निवासी संकुल असून सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. विद्यार्थी केवळ अभ्यास करत नाहीत तर विविध सांस्कृतिक, क्रीडा आणि सीएसआर आणि सामुदायिक संपर्क उपक्रमांमध्येही सहभागी झाले आहेत.
धौलाकुआन येथील 210 एकर जमिनीवरील सर्व सुविधांनी युक्त कायमस्वरूपी संकुलाची क्षमता 1170 विद्यार्थ्यांसाठी आहे. केंद्र सरकारने 531.75 कोटी रुपये मंजूर केले असून पहिल्या टप्प्यात 60384 चौरस मीटर क्षेत्रावर बांधकामासाठी 392.51 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
पोखरीयाल म्हणाले की एमबीएचे विद्यार्थी हे भविष्यातील कॉर्पोरेट नेते, संपत्ती निर्माते आहेत आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार आत्म-निर्भर भारत निर्मितीसाठी व्यवसायाला व उद्योगास योग्य दिशा देण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. राष्ट्र निर्मितीच्या कार्याची गुरुकिल्ली म्हणजे शिक्षण आहे. आपण आपल्या संस्थांमध्ये संशोधन आणि नावीन्यतेला प्रोत्साहन देण्याची आणि उत्कृष्टतेची परिसंस्था तयार करणे आवश्यक आहे. आयआयएम सिरमौरला जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा स्थापन करण्यात मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आयआयएम सिरमौर व्यवस्थापन शिक्षण आणि संबंधित क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करेल आणि “व्यवस्थापन उत्कृष्टतेसाठी जागतिक दर्जाची संस्था” बनण्याचे आपले स्वप्न साकार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपस्थितांना संबोधित करताना धोत्रे म्हणाले की, केंद्र सरकारने स्थापन केलेल्या प्रतिष्ठित आयआयएम कुटुंबातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सिरमौर ही एक नवीन आयआयएम आहे. आयआयएम सिरमौरने सप्टेंबर 2015 मध्ये हिमाचल प्रदेशच्या सिरमौरच्या पाँता साहिब येथे तात्पुरत्या संकुलातून 20 विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या पहिल्या तुकडीसह आपले कामकाज सुरु केले. ते पुढे म्हणाले की, 5 वर्षापेक्षा कमी कालावधीत येथील विद्यार्थ्यांची संख्या 300 पेक्षा जास्त आहे. व्यवस्थापन, संचालक, मंडळाने आवश्यक दिशेने शिक्षणासाठी केलेले कठोर परिश्रम यातून दिसत आहेत. राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून आणि आयआयएमशी संबंधित म्हणून संस्थेने अल्पावधीत केलेली प्रगती लक्षणीय आहे . येथील माजी विद्यार्थीना कॉर्पोरेट भूमिकेत योग्य स्थान आहे. आयआयएम सिरमौर समुदायाने निसर्गाच्या कुशीतील धौला कुआन येथील कायमस्वरूपी संकुलातून लवकरच काम सुरु करावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1643414)
Visitor Counter : 238