शिक्षण मंत्रालय

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 देशातल्या शालेय आणि उच्च शिक्षण प्रणालीमध्ये कायाकल्प घडवून आणणाऱ्या सुधारणा करेल - मनुष्यबळ विकास मंत्री


देशामध्ये सर्वात व्यापक सल्लामसलत आणि चर्चा घडवून आणल्यानंतर केलेल्या प्रक्रियेचा परिणाम म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 - रमेश पोखरियाल ‘निशंक’

एनईपी 2020 हा या देशाच्या शैक्षणिक इतिहासातला सर्वंकष, मूलगामी आणि भविष्याच्या दृष्टीने धोरणात्मक दस्तऐवज - संजय धोत्रे

Posted On: 29 JUL 2020 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जुलै 2020

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 देशातल्या शालेय आणि उच्च शिक्षण प्रणालीमध्ये कायाकल्प घडवून आणून शिक्षणामध्ये सुधारणा  करेल. आज नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ‘‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’’ला मान्यता देण्यात आली. त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी रमेश पोखरियाल यांनी संवाद साधून या धोरणाची थोडक्यात माहिती दिली. या पत्रकार परिषदेत बोलताना मनुष्यबळ विकास मंत्री म्हणाले, देशामध्ये सर्वात व्यापक अगदी सर्व स्तरांचा समावेश करून सल्लामसलत आणि चर्चा घडवून आणल्यानंतर या शैक्षणिक धोरणाचा मसूदा तयार करण्यात आला आहे. यासाठी 2.25 लाख सल्ले, शिफारसी, सूचना आल्या, त्या सर्वांचा विचार करण्याची प्रक्रिया करूनच हे धोरण निश्चित करण्यात आले. हे धोरण निश्चित करताना सार्वजनिक डोमेनमध्ये सल्लामसलतीसाठी मंच मुक्त ठेवण्यात आला होता.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे नवभारताच्या जडणघडणीमध्ये महत्वाची भूमिका निभावेल, असे मत व्यक्त करून केंद्रीय मंत्री निशंक यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि या क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्व भागीदारांचे अभिनंदन केले. आज देशाच्या शैक्षणिक क्षेत्रातला हा ऐतिहासिक क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले. एनईपी 2020 मुळे बाल्यकाळात, मुलांच्या जडणघडणीच्या महत्वाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने काळजी आणि शिक्षण घेतले पाहिजे त्यामध्ये उच्च दर्जाच्या  शैक्षणिक सुविधांची संपूर्ण देशभर सुनिश्चिती  होईल. आम्ही सामाजिक क्षमता आणि संवेदनशीलता, चांगले वर्तन, नीतिशास्त्र, सामुहिक कार्य आणि सहकार्य भावना मुलांमध्ये वाढीस लागेल, याकडे लक्ष केंद्रित करणार आहोत, असेही निशंक यांनी सांगितले.

आज जाहीर करण्यात आलेले शैक्षणिक धोरण हे 21 व्या शतकातले पहिले धोरण आहे. यापूर्वी 1986 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झाले होते. म्हणजे 34 वर्षांनी आता या नव्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. समानता, गुणवत्ता, सर्वांना परवडणारे आणि उत्तरदायित्व या पायाभूत स्तंभांच्या आधारे हे शैक्षणिक धोरण निश्चित करण्यात आले आहे. सन 2030 पर्यंत देशाचा कायाकल्प घडवून, शाश्वत विकास करण्यासाठी कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे, त्याचा आणि 21 व्या शतकातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक घटकांचा या धोरणात विचार केला आहे. शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण अधिकाधिक सर्वंकष, लवचिक, बहुमुखी असावे, मुलांमध्ये असलेल्या अव्दितीय क्षमता, प्रतिभा बाहेर येवून त्यांचा विकास व्हावा, याचा धोरण तयार करताना विचार केला आहे.

मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यावेळी म्हणाले, एनईपी 2020 हा या देशाच्या शैक्षणिक इतिहासातला सर्वंकष, मूलगामी  आणि भविष्याच्या दृष्टीने धोरणात्मक दस्तऐवज आहे. प्रत्येकामध्ये असलेली गुणवत्ता आणि त्याला वाव मिळाल्यानंतर मिळणारे परिणाम, याचा विचार करून कोणालाही शिक्षण घेण्यामध्ये कोणताही अडथळा येवू नये, असा विचार हे धोरण निश्चित करताना केला आहे. समीक्षणात्मक विचारसरणी, घेतलेले अनुभव आणि प्रयोग यांच्यावर पाठांचे शिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे शिकवताना लवचिक धोरण असेल आणि जीवनासाठी उपयुक्त कौशल्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. बहुमुखी आणि निरंतर अवलोकन करण्यात येणार आहे, ही या नवीन शैक्षणिक धोरणाची काही वैशिष्ट्ये आहेत. अद्याप शाळेबाहेर राहिलेल्या आणि ज्यांना शाळा सोडावी लागली आहे, अशा दोन कोटी मुलांना पुन्हा शाळेमध्ये आणण्यासाठी या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यात येणार आहे. यामागे ‘कोणीही मागे राहू नये’, या तत्वज्ञानाशी आमची बांधिलकी असणार आहे. ‘अॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट’, राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान आणि ‘राष्ट्रीय मूलभूत साक्षरता आणि अंक मोहीम’ या काही महत्वपूर्ण धोरणांच्या माध्यमांतून आपल्या शैक्षणिक कार्यक्रमामध्ये मूलगामी परिवर्तन होवू शकणार आहे, असेही संजय धोत्रे यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करावे.

 

G.Chippalkatti/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1642202) Visitor Counter : 531