आयुष मंत्रालय

आयुष मंत्र्यांनी एआयआयए मधील कोविड केंद्रामधील व्यवस्थांचा घेतला आढावा

Posted On: 28 JUL 2020 11:35PM by PIB Mumbai

 

आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र अधिभार) श्री श्रीपाद येस्सो नाईक यांनी आज नवी दिल्लीतील सरिता विहार मधील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (एआयआयए) येथील कोविड – 19 केंद्राला (सीएचसी) भेट दिली. कोविड – 19 च्या रुग्णांवरील उपचारासाठी असलेल्या या केंद्रातील व्यवस्थेची मंत्र्यांनी पाहणी केली. त्यांनी येथील वैद्यकीय पथकातील डॉक्टरांशी संवाद साधला आणि केंद्रातील रुग्णांच्या आरोग्याविषयी विचारपूस केली. कोविड – 19 आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या सुविधांविषयी आणि आयुर्वेदिक औषधांद्वारे केलेल्या उपचारांच्या परिणामाबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

कोविड – 19 च्या साथीच्या पार्श्वभूमीवर एआयआयएने पुरविलेल्या सेवांबद्दल मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, आयुर्वेदांच्या आधारे कोविड बाधित रुग्णांची काळजी घेण्यासाठी एआयआयएच्या पूर्ण चमूची वृत्ती, उत्साह, धैर्य आणि प्रयत्न कौतुकास्पद आहेत. एआयआयए हे संपूर्ण देशातील कोविड – 19 रुग्णांना वैयक्तिक पातळीवर आयुर्वेद चिकित्सा, आहार, योग आणि विश्रांती या तंत्राच्या माध्यमातून समग्र रुग्णांची काळजी घेण्यात आदर्शवत भूमिका पार पाडीत आहेत.

मंत्री पुढे म्हणाले, संस्थेतील कोविड – 19 रुग्णांचा सकारात्मक अभिप्राय निश्चितच प्रोत्साहनात्मक आहे. कोविड-19 केंद्रातील सगळ्या रुग्णांनी आयुष्याप्रति एक सकारात्मक दृष्टिकोन विकसित केला आहे आणि त्यांच्यात झालेल्या या बदलाबाबता ते अतिशय समाधानी आहे. केवळ या आजारावर मात करण्याबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील इतर टप्प्यांवर देखील त्यांना याचा उपयोग होऊ शकेल. कोविड 19 च्या रुग्णांवर पवित्र आयुर्वेदाच्या पद्धतीचे उपचार करण्यात विशेष परिश्रम घेतल्याबद्दल एआयआयएच्या पूर्ण चमूचे त्यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले की, या पारंपारिक भारतीय आयुर्वेद प्रणालीमध्ये या साथीच्या रोगाचा प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सेवा पुरविण्याची मोठी क्षमता आहे. कोविड – 19 केंद्रात दाखल झालेल्या बहुतांश रुग्णांना केवळ आयुर्वेद उपचार पद्धतीसह आहार आणि योगा याबाबतचे नियम पाळण्यास सूचित करण्यात आले होते. उपाचाराच्या काळात कोणताही त्रास नसलेल्या पूर्ण बरे झालेल्या रुग्णांना ज्यांचा एसपीओ2 पेक्षा अधिक आहे अशांना घरी सोडण्यात आले. कोणत्याही लक्षणांमध्ये तीव्र वाढ दिसून आली नाही. आतापर्यंत दाखल झालेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण शून्य टक्के आहे, असेही आढळले आहे. घरी सोडण्यापूर्वी रुग्णांची चाचणी निगेचिव्ह आली होती. या रोगाचा सामना करण्यासाठी वैद्यकीय चमूचे ज्ञान आणि अनुभव निश्चितच आयुर्वेदाला एक अग्रगण्य आरोग्य उपचार पद्धती म्हणून स्थान निर्माण करून देईल.

मंत्र्यांनी एआयआयए मध्ये असलेल्या कोविड – 19 चाचणी केंद्राची देखील पाहणी केली. एआयआयए ला दिल्ली सरकारने कोविड – 19 चाचणी केंद्र (आरटी-पीसीआर आणि रॅपिड अंटिजेन टेस्टिंग) म्हणून घोषित केले आहे.

..........

B.Gokhale/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1641953) Visitor Counter : 193