ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

पीएमजीकेएवाय-2 अंतर्गत अन्नधान्याचे वितरण सुरू; आतापर्यंत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून एकूण 33.40 लाख मेट्रिक टन धान्याची उचल


भारतीय अन्न महामंडळाने अन्नधान्याच्या खरेदीत नवे विक्रम नोंदवले; नुकत्याच संपलेल्या पीक हंगामात 388.76 लाख मेट्रिक टन गहू आणि 504.91 लाख मेट्रिक टन तांदळाची खरेदी

Posted On: 28 JUL 2020 9:39PM by PIB Mumbai

 

एप्रिल ते जून 2020 या कालावधीत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या (पीएमजीकेएवाय) यशस्वी अंमलबजावणीनंतर भारत सरकारने आणखी पुढील 5 महिन्यांसाठी म्हणजेच जुलै ते नोव्हेंबर 2020 या कालावधीसाठी ही योजना वाढविली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम (एनएफएसए) आणि अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत सुमारे 81 कोटी लाभार्थी असून त्यांना या योजनेअंतर्गत 5 किलो तांदूळ / गहू मोफत देण्यात येत आहे. जुलै ते नोव्हेंबर 2020 पर्यंत पीएमजीकेएवाय 2 साठी एकूण 200.19 लाख मेट्रिक टन अर्थात एलएमटी धान्य (91.33 एलएमटी गहू आणि 109.96 एलएमटी तांदूळ) वितरित करण्यात आले आहे. या योजनेस राज्य सरकार तसेच लाभार्थींकडून खूप उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला आहे. ही योजना 08.07.20 रोजी सुरू करण्यात आली  आणि 27.07.20 पर्यंत 33.40 एलएमटी धान्य (13.42 एलएमटी गहू आणि 19.98 एलएमटी तांदूळ) लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी राज्य सरकारांना देण्यात आले, जे जुलै 2020 च्या पूर्ण महिन्याच्या वितरणाच्या 83 टक्के आहे.

पीएमजीकेएवाय 2 साठी 200.19 एलएमटीच्या अतिरिक्त वाटपासह, 5 महिन्यांत भारत सरकार समाजातील असुरक्षित घटकांना एकूण सुमारे 455 एलएमटी धान्य वितरित करेल. एनएफएसए आणि एएवाय अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांना अनुदानित किंमतींवर नियमितपणे मिळणाऱ्या धान्याव्यतिरिक्त 5 किलो गहू किंवा तांदूळ पूर्णपणे विनामूल्य मिळणार आहे.

या अन्नधान्याचा साठा या 5 महिन्यांच्या कालावधीतील वाटपाप्रमाणे देशाच्या प्रत्येक भागात पोचता यावा यासाठी भारतीय खाद्य महामंडळाने (एफसीआय) व्यापक आणि सविस्तर नियोजन यापूर्वीच केले आहे. हे एक मोठं आव्हान आहे. कारण नेहमीपेक्षा हे वितरण दुप्पट आहे तसेच साठवणूक क्षमता आणि वाहतूक व्यवस्था देखील नेहमीच्या वितरणाच्या आधारावर आहे. असे असले तरी भारतीय अन्न महामंडळ हे आव्हान पेलण्यास पूर्णपणे तयार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात निश्चित केल्याप्रमाणे धान्य पोहचवले जाईल आणि कुणीही गरीब व्यक्ती अन्नापासून वंचित राहू नये हा या योजनेचा उद्देश सफल होईल, याची खातरजमा केली जाईल.

एफसीआयने चालू हंगामातील खरेदीची कामे पूर्ण केली असून गहू आणि तांदूळ या दोन्ही खरेदीत नवा विक्रम नोंदविला आहे. नुकत्याच संपलेल्या पीक हंगामात एफसीआयने 389.76 एलएमटी गहू आणि 504.91 एलएमटी तांदूळ यांची खरेदी केली आहे. सध्या मान्सूनचे चांगले वातावरण बागायत येणार खरीप हंगाम देखील चांगला असेल अशी आशा आहे.

****

B.Gokhale/S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1641941) Visitor Counter : 181