अर्थ मंत्रालय

अर्थमंत्री निर्मला सीतारामन  एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या प्रशासक मंडळाच्या 5 व्या वार्षिक बैठकीत सहभागी

Posted On: 28 JUL 2020 7:54PM by PIB Mumbai

 

केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री  निर्मला सीतारामन  आज नवी दिल्ली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) च्या प्रशासक मंडळाच्या 5 व्या वार्षिक बैठकीत सहभागी झाल्या.

दरवर्षी वार्षिक बैठकीत प्रशासक मंडळ बँकेच्या भवितव्यावर प्रभाव टाकणारे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी बैठक घेते. बैठकीत झालेल्या व्यापक चर्चेत एआयआयबी च्या अध्यक्षपदाची निवडणूक आणि ‘एआयआयबी 2030 -पुढल्या दशकात आशियाच्या विकासाला  मदत करणे’ या संकल्पनेवरील गोलमेज चर्चा यासह अधिकृत विषयांचा समावेश होता.

गोलमेज चर्चेत सीतारामन यांची ओळख प्रमुख वक्त्या म्हणून करण्यात आली. आपल्या भाषणात सीतारामन यांनी कोविड -19 महामारीचा  सामना करण्यासाठी भारतासह सदस्य देशांना सुमारे 10 अब्ज डॉलर्स आर्थिक मदतीचा जलद गतीने पाठपुरावा करण्याच्या एआयआयबीच्या प्रयत्नांचे कौतुक केले. सीतारामन यांनी  सार्क राष्ट्रांसाठी कोविड -19 आपत्कालीन निधी तयार करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराचा उल्लेख केला तसेच कोविडचा सामना करण्यासाठी महत्वपूर्ण वैद्यकीय आरोग्य किटचा पुरवठा करण्यासाठी भारत करत असलेले प्रयत्न   आणि कोविड 19 लसीच्या चाचण्यांच्या जागतिक प्रयत्नांना भारताकडून दिला जाणारा पाठिंबा  यांचाही उल्लेख केला. याशिवाय अर्थमंत्र्यांनी “जी -20 ऋण सेवा स्थगिती उपक्रमात”  भारताचा सहभाग अधोरेखित केला.

सीतारामन यांनी केंद्र  सरकारकडून कोविड -19 ला प्रतिसाद देण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिलीज्यात 23  अब्ज अमेरिकी डॉलर्सची  प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना (पीएमजीकेपी) आणि 295 अब्ज डॉलर्सच्या आत्म-निर्भर भारत पॅकेज (एएनबीपी) यांचा समावेश आहे, ज्याचे उद्दीष्ट अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्र आणि घटकांचे  संरक्षण करणे हे आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने  चलनविषयक धोरण शिथिल केले विशेषत: राखीव गरजा  कमी केल्या आणि अर्थव्यवस्थेत जीडीपीच्या सुमारे 3.9%मर्यादेपर्यंत तरलता आणली.

अर्थमंत्र्यांनी नमूद केले की पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी भारताने राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन (एनआयपी)  2020-2025  सुरू केले असून अंदाजे 1.4 ट्रिलियन डॉलर्स खर्चामुळे एआयआयबीच्या भागीदारीसाठी नव्या गुंतवणूकीच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. तसेच त्यांनी कोविड ला प्रतिसाद म्हणून नवीन  वित्तपुरवठा साधने आणणेएसडीजी 2030 साध्य करण्यासाठी सामाजिक पायाभूत सुविधांना अर्थसहाय्य प्रदान करणे आणि हवामानाला अनुकूल विकासाचे एकात्मीकरण आणि शाश्वत उर्जा उपलब्धता संबंधी पायाभूत सुविधांचा विकास  करण्यासह बँकाकडून काही अपेक्षांचा उल्लेख केला. सीतारामन यांनी बँकेला प्रादेशिक अस्तित्व निर्माण करण्याची सूचना केली ज्यामुळे  प्रभावी प्रकल्प व्यवस्थापन आणि अंमलबजावणीला  मदत होईल.

पाच वर्षांच्या अल्प कालावधीत बँकेने साध्य केलेल्या बळकट वाढीबद्दल अर्थमंत्र्यांनी एआयआयबी व्यवस्थापनाची प्रशंसा केली  आणि बँकेच्या भविष्यातील उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.

****

B.Gokhale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1641879) Visitor Counter : 250