संरक्षण मंत्रालय
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने 'डेअर टू ड्रीम 2.0' ही संशोधक व नव उद्योजकांसाठीची स्पर्धा माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त जाहीर
Posted On:
27 JUL 2020 9:59PM by PIB Mumbai
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने संशोधन कार्यासंबंधी डेअर टू ड्रीम 2.00 ही स्पर्धा माजी राष्ट्रपती आणि नामांकित वैज्ञानिक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आज जाहीर केली. आत्मनिर्भरतेची दूरदृष्टी असणारे डॉक्टर कलाम हे मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जातात. नव्याने उदयाला येत असलेले तंत्रज्ञान लक्षात घेऊन ही योजना आणण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ होण्यासाठी देशाला केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्तिगत पातळीवर संशोधन करणारे संशोधक आणि नवउद्योजक यांच्या संरक्षण आणि हवाई तंत्रज्ञानातील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे.
'डेअर टू ड्रीम 2.00' हे देशातील संशोधक व नवउद्योजकांसाठी प्रोत्साहनपर खुले आव्हान आहे. तज्ञ समितीकडून योग्य परीक्षणानंतर विजेते निवडले जातील. नवउद्योजकांना 10 लाखांपर्यंत तर व्यक्तिगत गटात पाच लाख रुपये अशी रोख बक्षिसे विजेत्यांसाठी जाहीर करण्यात आली आहेत.
वैयक्तिक गटातील संशोधक असो की नवउद्योजक , सर्वांमधील सुपीक मेंदूसाठी खुराक देणारी ही स्पर्धा जाहीर झाल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आनंद व्यक्त केला आहे. यासंबंधीची अधिक माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या www.drdo.gov.in या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होईल.
U.Ujgare/V.Sahajrao/P.Kor
(Release ID: 1641765)
Visitor Counter : 294