उपराष्ट्रपती कार्यालय

मुलांना चुकीची माहिती आणि बनावट बातम्या ओळखायला शिकवा – उपराष्ट्रपती


मुलांची वाचनाची आवड कमी होण्याबद्दल उपराष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली

कोविडमुळे शैक्षणिक सत्रात आलेल्या व्यत्ययाबद्दल विद्यार्थ्यांनी काळजी करू नये: उपराष्ट्रपती

Posted On: 27 JUL 2020 9:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 जुलै 2020


प्रसारमाध्यमे आणि विशेषत: सध्याच्या नवीन मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित होणारी चुकीची माहिती आणि बनावट बातम्यांची ओळख मुलांना करून देण्याच्या आवश्यकतेवर जोर देत उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू म्हणाले मुलांना अशा बनावट बातम्या ओळखता येतील असे शिक्षण दिले पाहिजे.

आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'टाइम्स स्कॉलर्स इव्हेंट' मध्ये 200 हून अधिक तरुणांना संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी त्यांना विश्लेषण करण्याची व सत्य स्वीकारण्याची तसेच खोट्या गोष्टींपासून दूर राहण्याची क्षमता विकसित करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने टाईम्स ऑफ इंडियाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

मुलांमधील वाचनाची सवय कमी झाल्याबद्दल निराशा व्यक्त करत उपराष्ट्रपतींनी त्यांना आज उपलब्ध असलेल्या असीम माहितीच्या माध्यमातून हुशार व विवेकी वाचक बनण्याच्या आवश्यकतेवर प्रकाश टाकला.

“वाचनाची सवय असलेला एक चांगला विद्यार्थी जीवनातील आव्हानांवर मात करण्यासाठी योग्य प्रकारे सज्ज असतो”, असे ते म्हणाले.

माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांचा उल्लेख करीत उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना "उंच ध्येये ठेवून उच्च स्वप्न पाहायला" सांगितले. स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांचे वर्णन करताना उपराष्ट्रपतींनी स्वयंशिस्त, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, चिकाटी आणि स्थितप्रज्ञता  टिकवून ठेवण्याची क्षमता हे महत्त्वपूर्ण गुण सूचीबद्ध केले.

कोविडमुळे शिक्षण सत्रात आलेल्या व्यत्ययांमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंता आणि तणाव निर्माण झाल्याचे लक्षात घेत उपराष्ट्रपतींनी ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात त्या घटनांचा त्रास करून घेऊ नये असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

“तुम्ही सर्व तरुण आहात आणि जीवनातील उतार-चढाव यांचा सामना करण्यासाठी दृढ भावनिक क्षमता विकसित करण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.

विद्यार्थ्यांनी त्यांची शारीरिक आरोग्य, मानसिक संतुलन सुधारण्यासाठी आणि तणाव व चिंता यावर मात करण्यासाठी नियमितपणे योगाभ्यास करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योगाचे महत्त्व आणि चिंतनावर भर देताना नायडू यांनी या सर्व बाबी अगदी लहानपणापासूनच शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट कराव्यात अशी इच्छा व्यक्त केली.

“योगामुळे तरूणांमधील एकाग्रता पातळी सुधारण्यास आणि शिस्त लागण्यास मदत होईल”, असे ते म्हणाले.

सध्याच्या काळात प्रत्येक क्षेत्रात असलेल्या कठीण स्पर्धेकडे लक्ष वेधून घेताना उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवून आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करून सर्व शक्यतांवर मात करण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला दिला.

कृपया लक्षात ठेवा की यशासाठी कोणतेही शॉर्टकट नाहीत, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे केवळ पदवी किंवा रोजगार मिळवून देण्याचे एक साधन म्हणून बघू नये तर शिक्षण हे व्यक्तीला ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी आणि त्याच्या सशक्तीकरणासाठी आहे.

“शिक्षण केवळ आवश्यक माहितीच देत नाही तर आपल्याला एक चांगली व्यक्ती बनवते”, असे ते म्हणाले.

आपल्या प्राचीन शिक्षण प्रणालीने नैतिक मूल्यांवर खूप जोर दिला आहे हे लक्षात ठेवून, उपराष्ट्रपतींनी मुलांमधील सहानुभूती, प्रामाणिकपणा, नम्रता, कृतज्ञता, क्षमा आणि आदर यासारख्या मानवी मूल्यांना विकसित करण्याचे आवाहन केले.

तरुणांना भारताच्या गौरवशाली भूतकाळाविषयी जागरूक करण्याची गरज व्यक्त करताना उपराष्ट्रपतींनी त्यांना आपल्या वारसा आणि इतिहासाचा अभिमान बाळगला पाहिजे आणि भारताच्या उदात्त सांस्कृतिक आणि संस्कृतीवादी आदर्शांचे राजदूत म्हणून काम करावे अशी इच्छा व्यक्त केली.

त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या करियरमध्ये उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यास आणि त्यांच्या सीमांचे उल्लंघन करून नवीन सीमा शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

“कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहू नका. नेहमीच उच्च मापदंड स्थापित करा आणि जिथे जाल तिथे नवीन आणि उत्कृष्ट प्रणाली तयार करा”, असे ते म्हणाले.

उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या दारिद्र्य, असमानता, हिंसाचार आणि हवामान बदल यासारख्या समस्या समजून घेऊन त्यासाठी नवीन उपाययोजना शोधण्याची इच्छा व्यक्त केली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेल्या मंत्राचा संदर्भ देताना उपराष्ट्रपतींनी तरुण विद्यार्थ्यांना नेहमीच स्वतःपेक्षा कमी नशीबवान असलेल्यांच्या परिस्थितीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले.

सर्वोदय आणि अंत्योदय ही तुमची मार्गदर्शक तत्त्वे होऊ द्या, असे ते म्हणाले.

त्यांनी भारताच्या युवा शक्तीला आजचे सर्वात मोठे संसाधन म्हणून संबोधताना देशाला अधिकाधिक उंचावर नेण्याच्या तरुणांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला.

टाइम्स ऑफ इंडिया आणि मिरर ब्रँड्सचे संचालक संजीव भार्गव, टाईम्स ऑफ इंडियाचे सहयोगी कार्यकारी संपादक विकास सिंह, आणि इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
 

* * *

M.Chopade/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1641654) Visitor Counter : 297