आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड रुग्णसंख्या अधिक असलेल्या नऊ राज्यांतील कोविड व्यवस्थापनाचा कॅबिनेट सचिवांकडून आढावा


तेलंगणा, आंध्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांनी चाचण्यांचा वेग वाढवावा, प्रतिबंधक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी आणि आरोग्य सुविधांची व्यवस्था तसेच योग्य उपचारांवर भर देण्याची केंद्र सरकारची सूचना

Posted On: 24 JUL 2020 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जुलै 2020


केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशात समन्वय ठेवून कोविड-19 च्या प्रतिबंधनासाठी केलेल्या उपाययोजना आणि नियोजनबद्ध, वर्गीकृत आणि समन्वयाच्या धोरणामुळे देशात कोविडचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढते आहे, तसेच मृत्यूदर देखील घटतो आहे.  मात्र, काही ठिकाणी गेल्या काही काळात कोविडचे रुग्ण वाढत असल्यामुळे, कोविड व्यवस्थापनाविषयीच्या नव्या चिंता निर्माण झाल्या आहेत.

कोविड व्यवस्थापन आणि प्रतिबंधनासाठी, केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयीत धोरणाचा भाग म्हणून आज कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली, कोविडचे प्रमाण अधिक असलेल्या नऊ राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांची उच्चस्तरीय आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आली. कोविडचे रुग्ण अधिक असलेल्या तेलंगणा, आंध्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांचे सचिव या बैठकीत सहभागी झाले होते.

यावेळी कॅबिनेट सचिवांनी कोविड प्रतिसाद धोरणाचा राज्यनिहाय आढावा घेतला. आरोग्य सचिव आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून गेल्या काही काळात रुग्ण वाढत जाण्यामागची कारणे जाणून घेतली. सर्व राज्यांनी टेस्ट ट्रॅक ट्रॅक या धोरणाचा अवलंब करत, चाचण्यांची संख्या, विशेषतः प्रतिबंधित क्षेत्रात अधिक चाचण्या करण्यावर भर द्यावा अशी सूचना केंद्राने केली. काही राज्यात चाचण्यांचे प्रमाण कमी असल्याबद्द्ल यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली.रुग्ण लवकर सापडण्यासाठी तसेच संक्रमण रोखण्यासाठी सातत्यपूर्ण आणि आक्रमक वेगाने चाचण्या करणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांनुसार प्रतिबंधित क्षेत्रांची योग्य आखणी करावी, यावर कॅबिनेट सचिवांनी भर दिला.प्रतिबंधित क्षेत्रात, रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे आणि घरोघरी जाऊन रुग्णांचे सर्वेक्षण यातून संक्रमण साखळी तोडता येईल, असे या बैठकीत सांगण्यात आले. प्रतिबंधित क्षेत्रांच्या बाहेर बफर क्षेत्र तयार करावे तसेच SARI/ILI या फ्लू सदृश तापाची साथ असलेल्या क्षेत्रांमध्ये सर्वेक्षण केले जावे, असेही सांगण्यात आले.

आरोग्याच्या सुविधा पुरेशा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला जावा, असा सल्ला या राज्यांना देण्यात आला. त्यात, खाटांची संख्या, ऑक्सिजन, आणि व्हेंटीलेटर्सची उपलब्धता याकडे लक्ष दिले जावे, असे सांगण्यात आले. रुग्णांवर उपचार करतांना आरोग्य मंत्रालयाने सांगितलेल्या प्रोटोकॉलचे पालन केले जावे. तसेच रुग्णवाहिकांचे व्यवस्थापन करुन एकही रुग्ण, रुग्णवाहिकेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही बैठकीत सांगण्यात आले.कोविड रुग्णांचा मृत्यूदर कमी राखण्यासाठीच्या प्रयत्नांवर देखील कॅबिनेट सचिवानी भर दिला. त्यासाठी अधिक धोका असलेल्या लोकांची विशेष काळजी घेतली जावी, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्या लोकांकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

लवकर रुग्ण ओळखणे आणि त्यांच्यावर प्रभावी उपचार व्यवस्थापन हीच कोविडचे संक्रमण रोखण्याची गुरुकिल्ली आहे, याकडे या सर्व राज्यांचे लक्ष वेधण्यात आले.

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी  : https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in .

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. 

https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf

 

* * *

B.Gokhale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1641075) Visitor Counter : 174