जलशक्ती मंत्रालय

जल जीवन अभियान : 2023 पर्यंत 100 टक्के जनतेला नळाने पाणीपुरवठा करण्याची अरुणाचल प्रदेश सरकारची योजना


अरुणाचल प्रदेशच्या दुर्गम आदिवासी भागात नळजोडण्या

Posted On: 18 JUL 2020 11:03PM by PIB Mumbai

 

अरुणाचल प्रदेशातील, 2000 फूट उंचीवरील शांत, हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेल्या ‘सिरीन’ या छोट्याश्या गावातल्या लोकांच्या चेहऱ्यावर आता आनंद पसरला आहे. याआधी, इथल्या लोकांना दुरून पाणी आणण्याचे कष्टप्रद काम रोज करावे लागत असे, विशेषतः गावातल्या जेष्ठ नागरिकांना बरेच लांब चालत जाऊन दूरच्या झऱ्यावरुन पाणी भरुन आणावे लागे. मात्र, आता सिरीन जलपुरवठा योजनेमुळे या गावातील प्रत्येक घरात पाण्याचा नळ लावण्यात आला आहे.

सिरीन गावात पाणीपुरवठा करणे, हे अत्यंत कठीण काम होते. हे गाव डोंगराच्या माथ्यावर वसलेले आहे., त्यामुळे वाळू, खडे, दगड आजूबाजूला असलेल्या नदीखोऱ्यातून जमा करावे लागले. त्याशिवाय, पोलाद, सिमेंट, पाईप्स असे अवजड समान देखील जवळच्या रस्त्यांनी या गावांपर्यंत पोहचवणे अत्यंत कठीण होते. दुर्गम भागामुळे या प्रकल्पाच्या कामाचा खर्चही खूप वाढला होता, त्याशिवाय कुशल मनुष्यबळाचा अभाव, यामुळे हे एक मोठे आव्हान होते. मात्र अविरत प्रयत्न करुन ही योजना आखणे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे काम, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी (Public Health Engineering Department) विभागाने केले.

अरुणाचल प्रदेशात डोंगराळ भाग असल्याने या भागात गुरुत्वाकर्षण तत्वावर आधारित पाणीपुरवठा योजना राबवली जाते. म्हणजेच गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीचा वापर करुन पाणी वरुन खाली गावात पोहचवले जाते. जलस्त्रोतापासून पाणी खेचून घेण्यासाठी, तशी यंत्रणा उभारली जाते, व त्याद्वारे गावात पाईपलाईन्स द्वारे जलपुरवठा केला जातो. आधी, खर्चाच्या दृष्टीने, जलप्रक्रिया प्रकल्प बांधण्याचा विचार केला जात नसे. मात्र आता, जलजीवन अभियानामुळे जलप्रक्रिया केंद्र त्याचाच भाग झाले आहे. प्रक्रिया केल्यानंतरहे पाणी गावाच्या वर बांधलेल्या स्वच्छ जलाशयात संकलित केले जाते. तिथून हे पाणी कार्यान्वित घरगुती नळ जोडणीच्या माध्यमातून गावात पोहचवले जाते. सगळीकडे पाण्याचे सामान वाटप व्हावे, यासाठी काही गावात पाण्याच्या टाक्या बसवलेल्या आहेत.

अरुणाचल प्रदेश सरकारने, जलजीवन अभियानाअंतर्गत, 2023 पर्यंत राज्यातील सर्व घरात नळाने पाणीपुरवठा करण्याचा संकल्प केला आहे. केंद्र सरकारच्या या पथदर्शी योजनेमुळे देशातील सर्व कुटुंबाना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे. देशातील सर्व जनतेचे, विशेषतः ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पानुसार ही योजना आखण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून गावागावांमध्ये होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे लोकांच्या विशेषतः महिलांच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल झाले आहेत.

****

S.Pophale/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1639726) Visitor Counter : 227