वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भक्कम, लवचिक आणि 'आत्मनिर्भर भारता'च्या निर्मितीसाठी व्यापारी संघटनांची भूमिका महत्वाची: पियुष गोयल


बॉम्बे चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या 184व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचे भाषण

Posted On: 13 JUL 2020 4:44PM by PIB Mumbai

 

कोविड-19 मुळे आज संपूर्ण जग बदलले आहे; मात्र, भारतीय जनता, व्यवसाय आणि उद्योग या संकटाला बळी पडलेले नाहीत, परिस्थितीशी जुळवून घेण्याचा लवचिकपणा, तसेच संकटातून नवे मार्ग शोधण्याची वृत्ती या उपजत गुणांमुळे आपण संकटाचे रुपांतर संधीत केले आहे, असे मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केले.  

'बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री'च्या 184व्या सर्वसाधारण सभेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यामातून त्यांनी आपले विचार मांडले. देशातल्या सर्वात जुन्या चेंबर्सपैकी एक असलेल्या या संस्थेचे प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते.

भारताला आत्मनिर्भर करण्यात आणि कोविडच्या संकटाशी लढा देण्यास सक्षम करण्यास, उद्योग आणि व्यापारी संघटनांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे, असे गोयल यावेळी म्हणाले. PPE किट्स तयार करणे, अतिदक्षता खाटांसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा पुरवणे, विलगीकरण सुविधा, मास्क तसेच इतर सुरक्षिततेच्या साधनांची भारतातच निर्मिती करण्यासाठी या उद्योग संस्थांनी मोठे योगदान दिले, ज्यामुळे आज भारत PPE किट्स निर्यात करण्याच्या स्थितीत आहे, असे त्यांनी सांगितले. 

अनलॉकची जशी सुरुवात झाली, तशी देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होऊ लागली आहे; वाहतूक, विजेचा वाढता वापर हे त्याचेच निदर्शक आहे.

उत्पादनाला सुरुवात झाली आहे. निर्यात वाढते आहे. कोविडपूर्वी आणि कोविड नंतरचे संपूर्ण जग वेगळे असणार आहे. मात्र आपण आज कोविड नंतरचे जग अधिक उत्तम करण्यासाठी तयारी करतो आहोत, असे गोयल यांनी सांगितले. 

कोविडनंतरच्या जगात, एक देश म्हणून भारताने, गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि संशोधनावर भर द्यायला हवा, त्यासाठी उत्पादन वाढवणे, उत्पादनांचा दर्जा सुधारणे, मोठ्या अर्थव्यवस्थांशी व्यापाराचा प्रयत्न करणे, लॉजिस्टिक साखळ्या सुदृढ करणे, स्पर्धात्मक किमती आणि नवनव्या कल्पनांवर काम करण्याची गरज आहे. वृद्धीदर वाढवण्यासाठी सरकार आणि व्यापारी संघटनांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे, ज्यातून रोजगार निर्मिती, युवकांसाठी नोकऱ्या आणि जगासाठी दारे बंद न करता, आधी सक्षम होऊन, “आत्मनिर्भर भारत” बनून जगाच्या स्पर्धेत उतरायचे आहे, असे गोयल म्हणाले.

काही क्षेत्रात भारतीय उद्योगांचे कौशल्य विशेष आहे, जसे की वाहनांचे सुटे भाग, चामड्याच्या वस्तू, औषधनिर्माण, पादत्राणे आणि सागरी उत्पादने या सर्व क्षेत्रांमध्ये भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारात स्थान मिळवून देण्याची क्षमता आहे. “मी 'बॉम्बे चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री'ला आव्हान करतो की, त्यांनी पुढे यावे आणि उद्योग सुलभ वातावरण निर्माण करण्यास मदत करावी, एकल खिडकी परवाने यंत्रणा उभारणे, तसेच स्वयंनियमाची व्यवस्था या सगळ्यासाठी सहकार्य करावे” असे आवाहन गोयल यांनी यावेळी केले.

भक्कम आणि लवचिक भारतासाठी, व्यापारी संघटनांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, असे गोयल म्हणाले. 'बॉम्बे चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज'ची 184वी सर्वसाधारण सभा, या अत्यंत जुन्या संस्थेच्या प्रवासातील महत्वाचा टप्पा आहे, असे गोयल म्हणाले. आपल्या भाषणाच्या शेवटी, गोयल यांनी सांगितले की, देशातील प्रचंड अशा युवाशक्तीचा वापर करुन, भारत जगात अत्यंत प्रभावशाली देश ठरु शकतो. या कसोटीच्या काळात, 130 कोटी भारतीयांनी परिस्थितीत टिकून राहण्यासाठी दाखवलेल्या लवचिकतेचे त्यांनी कौतुक केले.

 

S.Pophale/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1638305) Visitor Counter : 217