आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

मानवी हक्काचा प्रश्न समजून कुटुंब नियोजनावर भर देण्याची आवश्यकता - जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये डॉ. हर्षवर्धन यांचे प्रतिपादन;


बिगर-कोविड रूग्णांना आवश्यक म्हणून सेवा दिली जात असल्याबद्दल कौतुक

‘आरएमएनसीएएच अधिक एन’ आरोग्य कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी ठेवल्यामुळे धोरण यशस्वी

गर्भनिरोधकांच्या वापरामुळे 5.5 कोटी अनपेक्षित गर्भधारणा टाळता आली, एकूण 1.1 कोटी अर्भकांचा असमयी जन्म, तर असुरक्षित गर्भपाताच्या 18 लाख घटना, 30,000 मातामृत्यू 2019 या एका वर्षात टाळणे झाले शक्य

Posted On: 11 JUL 2020 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जुलै 2020

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज एका आभासी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे उपस्थित होते.

या प्रसंगी सर्वांचे स्वागत करताना म्हणाले, ‘‘ लोकसंख्या स्थिरतेचे महत्व आणि ही गोष्ट भविष्यात जनतेच्या आरोग्याविषयी कशी महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहे, हे आजच्या जागतिक लोकसंख्या दिनी सर्वांना पटवून देण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. कोविड-19 महामारीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या आव्हानांमुळे पुनरूत्पादक आरोग्य सेवा पुरवणे अधिक महत्वाचे बनले आहे.’’

डॉ. हर्षवर्धन यांनी कुटुंब नियोजन कार्यक्रमामध्ये ‘आरएमएनसीएएच अधिक एन’ हा प्रकल्प केंद्रस्थानी ठेवल्यामुळे एकूणच कार्यक्रम यशस्वी होत असल्याचे सांगितले. ‘आरएमएनसीएएच अधिक एन’म्हणजेच पुनरूत्पादन, मातृत्व, नवजात अर्भक, बालक आणि पौगंडावस्थेतील मुले यांच्यासाठी जागरूकतेचा, त्यांच्या कल्याणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. केवळ गेल्या दशकामध्ये  असमयी, म्हणजे नऊ महिन्यांच्या आधीच माता होण्याचे प्रमाण (सीबीआर) कमी झाले आहे. 2011 मध्ये हे  प्रमाण 21.8 होते तर 2018मध्ये ते कमी होवून 20 झाले आहे. तसेच एकूण जनन दर कमी झाला आहे. 2011मध्ये जनन दर 2.4 होता  तर 2018 मध्ये जनन दर 2.2 झाला आहे. कुमारवयामध्ये माता होणा-या मुलींचे प्रमाणही आता कमी झाले आहे. आधी ते 16 होते आता 7.9 झाले आहे. भारतामध्ये चालवण्यात येत असलेल्या कुटुंब कल्याण कार्यक्रमामुळे हे शक्य झाले असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. जनन दर कमी करण्याचे उद्दिष्ट 36 पैकी 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी गाठले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा संदर्भ देवून डॉ. हर्षवर्धन यावेळी म्हणाले, या अभियानाचे आता सामाजिक चळवळीत रूपांतर झाले आहे. अशाच प्रकारे सर्वांनी लोकसंख्या स्थिरीकरण ही एक शक्तिशाली लोक चळवळ बनवण्याचे आवाहन केले. कुटुंब नियोजन केले तर गरीब, उपेक्षित महिलांना विशेष सन्मानाचे ठरणार आहे. लैंगिक समानता, माता आणि बालकांचे आरोग्य, दारिद्र्य निर्मूलन आणि मानवी हक्कांचा प्रसार यासाठी आम्ही करीत असलेल्या प्रयत्नांची आधारशिला म्हणजे कुटुंब नियोजन आहे, असे ते म्हणाले.

जागतिक स्तरावर ‘कुटुंब नियोजन 2020’याविषयी सुरू करण्यात आलेल्या चळवळीमध्ये मूलभूत आवश्यकता म्हणून भारताचाही सहभाग आहे. सरकारने या महत्वाकांक्षी चळवळीचे उद्देश साध्य करण्यासाठी मोठ्या निधीची गुंतवणूक केली आहे.  यानुसार कुटुंब नियोजनामध्ये मिशन परिवार विकास, गर्भरोधक इंजक्शन, कुटुंब नियोजन- तर्कसंगत व्यवस्थापन माहिती कार्यप्रणाली (एलएमआयएस), कुटुंब नियोजन जनसंपर्क जाहिरात यांच्यावर हा खर्च करण्यात येत आहे. राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमात गर्भरोधक इंजक्शन सार्वजनिक आरोग्य यंत्रणेमार्फत ‘‘अंतरा’’ कार्यक्रमाअंतर्गत सादर करण्यात आले आहे. हे गर्भनिरोधक साधन अतिशय प्रभावी असून बदलत्या काळात दापंत्यांच्या गरजांची पूर्तता करणारे आहे तसेच महिलांना दोन गर्भारपणामध्ये अंतर ठेवणे शक्य होणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर सरकारने कुटुंब कल्याण कार्यक्रमासाठी गुंतवणूक केली आहे, त्याचा लाभ म्हणजे जवळपास 5.5 कोटी अनपेक्षित गर्भधारणा होणे टाळता आले, एकूण 1.1 कोटी अर्भकांचा असमयी होणारा जन्म, तर असुरक्षित गर्भपाताच्या 18 लाख घटना, 30,000 मातामृत्यू 2019 या एका वर्षात टाळणे शक्य झाले, असे त्यांनी यावेळी सांगितले.

कुटुंब नियोजन कार्यक्रमामुळे झालेल्या फायद्यांविषयी बोलताना अश्विनी कुमार म्हणाले, ‘‘ कुटुंब नियोजनामुळे केवळ लोकसंख्या स्थिर राहते, असे नाही. तर त्यामुळे महिलेचे आणि समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. लोकसंख्येच्या स्थिर राहिल्यामुळे जास्तीत लोकांपर्यंत विकासाची साधने पोहोचवणे शक्य होते. भारतासाठी ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. कारण सध्याच्या काळात देशाची जवळपास 50 टक्के लोकसंख्या ही प्रजनन वयोगटातली म्हणजे 15 ते 49 मधली आहे.

आरोग्य मंत्र्यांनी यावेळी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेल्या ‘एबी-एचडब्ल्यूसी’ या मोबाईल अॅप्लिकेशनचा प्रारंभ केला. एबी- आरोग्य आणि कल्याण केंद्रामध्ये डेटा अहवालाची प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे. एबी-एचडब्ल्यूसीच्या पोर्टलवर राज्य, जिल्हा आणि आरोग्य सुविधा केंद्रांचा तपशील यामध्ये असणार आहे. ‘रिअल टाईम’  माहिती, कार्य यांचा तपशील मिळू शकणार आहे. आरोग्य सेवा, औषधांचे वितरण यांची माहिती मिळू शकणार आहे.

संपूर्ण देशभर कोविड-19चा उद्रेक झालेला असल्यामुळे आघाडीवर कार्यरत असलेल्या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाची जबाबदारी आणि ताण आलेला आहे. अशाही स्थितीत सर्व आरोग्य कर्मचारी अथक परिश्रम करून सेवा देत आहेत, याबद्दल डॉ. हर्षवर्धन यांनी सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. मात्र कोविड-19 महामारीचा गैर-कोविड रूग्णांना सेवा देण्यावर विपरित परिणाम होत नसल्याची खात्री करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमाला आरोग्य, कुटुंब कल्याण विभागाच्या सचिव प्रीती सुदन, मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी राजेश भूषण, अतिरिक्त सचिव आणि मोहीम संचालक वंदना गरनानी, सह सचिव मनोहर अगनानी, आणि इतर वरिष्ठ अधिकारी या आभासी बैठकीला उपस्थित होते. तसेच या संबंधित विभागाचे प्रतिनिधी आभासी माध्यमातून सहभागी झाले होते.

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1638076) Visitor Counter : 309