विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

‘‘महामारी जागतिक असली तरी या आव्हानाला स्थानिक उपाय शोधले पाहिजेत’’ डॉ. हर्षवर्धन


‘‘अर्थव्यवस्थेच्या उन्नतीचा मार्ग तयार करण्यासाठी उद्योजक मित्रांनी, संशोधन आणि धोरण तयार करणाऱ्यांनी या श्वेत पत्रिकेचा संदर्भ घेण्याची विनंती ’’डॉ. हर्षवर्धन

भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी तंत्रज्ञान आणि धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक शिफारसींचा श्वेत पत्रिकेत समावेश

कोविड-19 नंतर ‘मेक इन इंडिया‘वर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ‘टीआयएफएसी’च्या वतीने श्वेत पत्रिका

Posted On: 10 JUL 2020 6:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जुलै 2020

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच भूविज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज कोविड-19 नंतर ‘मेक इन इंडिया‘वर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ‘टीआयएफएसी’च्यावतीने तयार करण्यात आलेली श्वेत पत्रिका प्रसिद्ध केली. त्याचबरोबर ‘‘क्टिव फार्मास्युटिकल इनग्रेडियन्टस : स्टेटस, इश्यूज, टेक्नॉलॉजी रेडिनेस अँड चॅलेंजेस’’ याविषयी माहिती प्रसिद्ध करण्यात आली. प्रस्तूत श्वेत पत्रिका टीआयएफएसी म्हणजेच टेक्नॉलॉजी, फॉरकास्टिंग अँड असेसमेंट कौन्सिलच्यावतीने तयार करण्यात आली आहे. या आभासी कार्यक्रमामध्ये टीआयएफएसीचे अध्यक्ष तसेच कार्यकारी संचालक डॉ. व्ही.के. सारस्वत, संशोधक डॉ. संजय सिंग, टीआयएफएसीचे (एफ आणि ए) विभाग प्रमुख मुकेश माथूर सहभागी झाले होते.

या उपयुक्त श्वेत पत्रिकेबद्दल डॉ. हर्षवर्धन यांनी टीआयएफएसीचे अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले, ‘‘सध्याच्या काळामध्ये अशा प्रकारच्या श्वेत पत्रिकेची अत्यंत गरज आहे. कोविड-19 महामारी म्हणजे जागतिक आव्हान आहे. मात्र त्याला स्थानिक निराकरण हवे आहे. ‘‘वैश्विक आव्हानांना स्थानिक पर्याय - धोरण आणि तंत्रज्ञानाची अनिवार्यता’’ हा आपल्या अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी नवा मंत्र बनला पाहिजे.’’ देशाच्या आर्थिक व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी अपारंपरिक धोरणांना पाठबळ देणे, कृषी, इलक्ट्रॉनिक्स, आरोग्य, आयसीटी आणि उत्पादने या क्षेत्रातल्या नवीन आंतरराष्ट्रीय भागीदारी महत्वपूर्ण ठरणार आहे. तसेच तंत्रज्ञानाला उत्तेजन देणे यासारख्या उपाय योजना करण्याची आवश्यक आहे, असे सांगून डॉ. हर्षवर्धन म्हणाले, ‘‘अर्थव्यवस्थेच्या उन्नतीचा मार्ग तयार करण्यासाठी  उद्योजक मित्रांनी, संशोधन आणि धोरण तयार करणा-यांनी या श्वेत पत्रिकेचा संदर्भ म्हणून वापर करावा, अशी माझी विनंती आहे.’’

‘‘कोविड-19 मुळे झालेले परिणाम मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात भारताने यश मिळवले आहे.  अर्थव्यवस्था सावरत आहे, पुढे काय करता येवू शकते, याचा आराखडा तयार आहे, असे सांगून डॉ. हर्षवर्धन म्हणाले, ‘‘आपल्याला ‘मेक इन इंडिया’अंतर्गत उत्पादन करताना  उत्पादनाचे वैश्विक केंद्र बनण्याची संधी मिळत आहे. योग्य तंत्रज्ञान वापरून आणि धोरणांमध्ये केलेल्या सुधारणांचा अवलंब करून काही विशिष्ट क्षेत्रांकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे’’. पायाभूत सुविधा विकसित करणे, औद्योगिकीकरण तसेच पुरवठा साखळी यंत्रणा, वस्तू आणि सेवा यांना मागणी निर्माण करणे, शेतीचे व्यवसायामध्ये रूपांतर करणे, यावर भर देण्याची आवश्यकता आहे, असेही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. सध्याची महामारी ही जागतिक आहे, परंतु या आव्हानाला स्थानिक उत्तर शोधले पाहिजे, असेही ते म्हणाले.

यावेळी डॉ. व्ही.के सारस्वत आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘या श्वेत पत्रिकेमध्ये पाच क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे. ज्या क्षेत्रांमुळे भारताच्या आर्थिक वृद्धीवर सकारात्मक परिणाम होईल, तसेच तंत्रज्ञानाच्या वापराला उत्तेजन मिळेल, अशा महत्वपूर्ण क्षेत्रांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या विशिष्ट क्षेत्राचे सर्वंकष धोरण आणि तंत्रज्ञान यांच्याविषयी शिफारसी देण्यात आलेल्या आहेत. तसेच यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला नव्याने झळाळी प्राप्त करण्यासाठी कोणते ‘माॅडेल’ वापरण्याची गरज आहे, याचे सादरीकरण केले आहे. तसेच राष्ट्रीय प्राधान्य असलेल्या आणि तंत्रज्ञानाची आपली क्षमता लक्षात घेवून  आंतरराष्ट्रीय भागीदारीसाठी कोणत्या क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध आहेत, याचाही विचार करण्यात आला आहे.’’

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्राध्यापक आशुतोष शर्मा म्हणाले, ‘‘टीआयएफएसीने तयार केलेली श्वेत पत्रिका म्हणजे एक प्रकारे नकाशा आहे. कोविड-19 नंतरच्या काळात आर्थिक क्षेत्रांची वृद्धी लवकर व्हावी यासाठी उच्च प्राथमिकता असलेली क्षेत्रे, तंत्रज्ञान आणि धोरण यांच्यासाठी हा मार्गदर्शक नकाशा एक प्रकारे इंधन पुरवणार आहे.’’

टीआयएफएसीचे कार्यकारी संचालक प्रा. प्रदीप श्रीवास्तव यांनी यावेळी ‘पॉवर पॉईंट’ सादरीकरण केले. या श्वेत पत्रिकेमुळे कोविड-19 चे भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम झाला आहे. आणि आता त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण धोरण तयार करताना नेमके काय केले पाहिजे, हे समजू शकणार आहे. कोणत्याही क्षेत्रात उत्पादन घेण्यासाठी उद्योजकांना, जनतेला मदत कशी करता येईल, याचा विचार केला आहे. आत्मनिर्भर होण्यासाठी मूळ जमीन तयार करण्याचे काम या श्वेत पत्रिकेने केले आहे, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.

या श्वेत पत्रिकेमध्ये विशिष्ट क्षेत्रांची बलस्थाने, बाजारपेठेचा कल आणि मुख्य पाच क्षेत्रातल्या संधी स्पष्ट करताना देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय गंभीर, आवश्यक क्षेत्रांचा विचार केला आहे. त्यामध्ये आरोग्य सुविधा, यंत्र सामुग्री, आयसीटी, कृषी, उत्पादन आणि इलेक्ट्रॉनिक्स यांचा समावेश आहे. यामध्ये या क्षेत्रांना असलेली मागणी आणि पुरवठा यांचा प्रामुख्याने विचार केला आहे. यामध्ये कशा पद्धतीने आपण आत्मनिर्भर होवू शकतो, याचा विचार केला आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा, एमएसएमई क्षेत्र याचबरोबर थेट परकीय गुंतवणूक, व्यापारी संबंध, नवीन युगातले तंत्रज्ञान यांच्याशी असलेले जागतिक संबंध यांचे धोरणात्मक पर्याय चिन्हीत करण्यात आले आहेत. इस्त्राइल, जर्मनी या देशांच्या तंत्रज्ञानाच्या सहयोगातून देशात तंत्रज्ञानाचा नवीन पाया विकसित करण्यासाठी गती देण्याचे पर्याय श्वेत पत्रिकेत सुचवण्यात आले आहेत. या तंत्रज्ञान आणि धोरणांच्या अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले आहेत. विविध क्षेत्रांचा परस्परांशी असलेला संबंध लक्षात घेवून उत्पादनांचा विचार करण्यात आला आहे.

या श्वेत पत्रिकाचा अधिक तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करावे.

पॉवर पॉइंट सादरीकरण –

पूर्ण दस्तऐवज –

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1637934) Visitor Counter : 448